गूळ आणि साखरेच्या ९ सहस्र ६२८ किलो साठ्यासह १० लाख रुपयांचा गुटखाही शासनाधीन !

अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई !

भेसळ करणार्‍यांच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्यांचा उत्पादन सिद्ध करण्याचा परवाना रहित केला पाहिजे ! – संपादक

प्रतीकात्मक छायाचित्र

पुणे – हवेली तालुक्यातील कोलवडी येथील बोरमलनाथ उद्योगातील गुर्‍हाळावर अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई करून ९ सहस्र ६२८ किलोंचा गूळ आणि साखरेचा साठा शासनाधीन केला आहे. पुणे विभागाचे सहआयुक्त शि.स. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या गुर्‍हाळावर धाड टाकली. नागरिकांनी १८००२२२३६५ या ‘टोल फ्री’  क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन परिमंडळ ३ चे साहाय्यक आयुक्त (अन्न) सा.ए. देसाई यांनी केले आहे.

यासह परिमंडळ ५ चे साहाय्यक आयुक्त (अन्न), अन्नसुरक्षा अधिकारी श्रीमती बारवकर आणि रा.भि. कुलकर्णी यांच्या पथकाने गुटका विक्रेत्याकडून १० लाख ४४ सहस्र ४०० रुपयांच्या साठ्यासह ७ लाख रुपये किमतीचे वाहनसुद्धा शासनाधीन केले आहे. या प्रकरणी संबंधितांवर यवत पोलीस ठाणे येथे भारतीय दंड विधान कलम ३२८ अन्वये तक्रार दिली आहे.