७.१२.२०२१ या दिवशी साधक कुटुंबियांसाठी एका सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. त्या सत्संगात सनातनच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ‘साधकांनी कुटुंबियांच्या सहवासात साधनेचे प्रयत्न कसे करावे ?’, यासंदर्भात मार्गदर्शन केले. त्यातील निवडक सूत्रे सर्वत्रच्या साधकांसाठी येथे प्रसिद्ध करत आहोत.
१. ‘२४ घंटे भगवंताला अपेक्षित अशी कृती करणे म्हणजे साधना’, हे लक्षात घ्या !
‘कलियुग हे विज्ञानयुग आहे. या कलियुगातून तरून जाण्यासाठी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांची विहंगम गतीने आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी गुरुकृपायोगानुसार साधना सांगितली. हा सर्वांत सोपा साधनामार्ग आहे. गुरुकृपायोगात ध्यानयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग आणि कर्मयोग या सर्व योगांचे मीलन आहे. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार, कौशल्यानुसार त्याला सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रत्येक साधकाचे सेवेचे क्षेत्र आणि कौशल्य निराळे असले, तरी आपले ध्येय एकच आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी आपण साधनेला जोमाने आरंभ करतो; मात्र एका टप्प्यावर प्रयत्न अल्प होऊन ठराविक घंटे सेवा आणि व्यष्टी साधनेचे ठराविक प्रयत्न करणे, एवढ्यावरच अल्पसंतुष्ट होतो. आपल्या अल्प बुद्धीला जे गवसले, त्यानुसार आपण प्रयत्न करतो. प्रत्यक्षात साधना म्हणजे काय ? तर २४ घंटे ईश्वराला अपेक्षित अशी कृती करणे !
२. साधनेचे सर्व दृष्टीकोन सर्व ठिकाणी कृतीत आणता येण्यासाठी प्रयत्न करणे, हे खरे अध्यात्म जगणे !
सेवा आणि व्यष्टी साधना यांसाठी केवळ वरवरचे प्रयत्न करणे परात्पर गुरुदेवांना अपेक्षित नाही. ‘व्यष्टी आणि समष्टी साधना करतांना स्वतःत जे परिवर्तन घडणे ईश्वराला अपेक्षित आहे, ते घडत आहे ना ?, स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांची तीव्रता अल्प होत आहे ना ?, ईश्वराप्रतीचा भाव, भक्ती, श्रद्धा अधिकाधिक दृढ होत आहे ना ?’, याचे चिंतन करणारा साधक साधनेत शीघ्रतेने प्रगती करतो. साधनेचे सर्व दृष्टीकोन सर्व ठिकाणी, सर्व परिस्थितींत अन् २४ घंटे कृतीत आणता येण्यासाठी प्रयत्न करणे, हे खरे अध्यात्म जगणे आहे.
३. अंतर्मनापासून साधनेचे प्रयत्न करणार्या साधकांचे वर्तन कुटुंबीय आणि साधक सर्वांशी सारखेच असते !
व्यावहारिक जीवनात शाळा, महाविद्यालय येथे आपण शिक्षण घेतले की, आपल्याला किती ग्रहण झाले, ते कळण्यासाठी परीक्षा घेतली जाते. परीक्षेतून कळते की, शिकलेली सूत्रे आपल्याला किती आकलन झाली आहेत ! त्याचप्रमाणे साधना करतांना ‘आपण साधनेचे दृष्टीकोन किती आत्मसात केले आहेत ?’, याची खरी परीक्षा आपण कुटुंबियांसमवेत असतांना होत असते. त्यांच्याशी आपली वर्तणूक कशी असते, यावरून आपल्या लक्षात येते की, आपण साधनेत जे शिकलो, ते बाह्यमनाच्या स्तरावर आहे कि ते अंतर्मनात गेले आहे म्हणजे आत्मसात केले आहे ? आपले साधनेचे प्रयत्न बाह्यमनाच्या स्तरावर; म्हणजेच वरवरचे असतील, तर कुटुंबियांशी वागणे वेगळे आणि बाहेर किंवा साधकांशी वागणे वेगळे, असे होते. साधना ज्याच्या वृत्तीतच आली आहे, अंतर्मनापासून साधनेचे प्रयत्न होत आहेत, तो सर्वत्र एकसारखेच आणि सहजतेने वर्तन करतो.
साधक कुटुंबातही काही जण एकमेकांना मानसिक स्तरावर सांभाळतात. स्वतः साधनेच्या स्तरावर न रहाता कुटुंबातील सदस्यांनाही साधनेत साहाय्य करणे टाळतात. अशाने स्वतःसह कुटुंबियांचीही आध्यात्मिक हानी होते. काही साधकांना असेही वाटते की, ‘मला कुटुंबीय माझ्या चुका सांगत नाहीत.’ अशा साधकांनी चिंतन करावे की, ‘कुटुंबीय मला चुका का सांगत नाहीत ? मी स्वत:मध्ये काय पालट करायला हवा ?’ सर्व साधक कुटुंबियांनी साधनेच्या स्तरावर एकमेकांना हाताळता येण्यासाठी स्वतःचे साधनेचे प्रयत्न वाढवावेत. ‘कुटुंबियांच्या सहवासात साधनेचे प्रयत्न करणे जमू लागणे’, हे साधकत्वाचे लक्षण आहे ! साधनेचे प्रयत्न अंतर्मनापासून केल्यानंतर कुटुंबियांशी आध्यात्मिक स्तरावरील जवळीक साध्य होऊ शकते.
४. ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ या उक्तीनुसार हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रथम स्वतःमध्ये पालट घडवा !
परात्पर गुरुदेवांनी आपल्याला हिंदु राष्ट्राच्या निर्मितीचे ध्येय दिले आहे. ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ या उक्तीनुसार आपल्या मनात हिंदु राष्ट्र साकार झाल्यास (म्हणजेच स्वतःत साधकत्व रुजल्यास) ते समष्टीमध्ये साकार होऊ शकते. याचा प्रारंभ कौटुंबिक स्तरावर साधनेचे प्रयत्न करून करायचा आहे. कौटुंबिक स्तरावर हे साध्य झाले की, सहसाधक, तसेच समाजातील व्यक्तींशीही जवळीक साधता येते. अशाच प्रयत्नांतून पुढे ‘वसुधैव कुटुम्बकम्’, म्हणजे ‘संपूर्ण पृथ्वी हे एक कुटुंबच आहे’ या उक्तीची अनुभूती येते.
स्ववृत्तीत पालट घडवण्यासाठी जीव ओतून प्रयत्न करणे, हीच श्रीगुरूंप्रतीची खरी कृतज्ञता आहे. कुटुंब, व्यक्तीगत जीवन, प्रसार आणि आश्रम अशा सर्व ठिकाणी प्रामाणिकपणे, तळमळीने अन् पारदर्शक राहून साधनेचे प्रयत्न करणे, हीच व्यक्तीगत आध्यात्मिक उन्नतीचे व्यष्टी ध्येय आणि हिंदु राष्ट्र स्थापनेचे समष्टी ध्येय साध्य करण्याची गुरुकिल्ली आहे ! आपण एवढे झोकून देऊन प्रयत्न करूया की, भगवंताला वाटायला हवे, ‘साधक हिंदु राष्ट्रासाठी पात्र आहेत !’ तेव्हाच तो हिंदु राष्ट्र देईल !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी