सौ. अंजली यशवंत कणगलेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. ‘आई नव्हे, तर संतच येणार आहेत’, या भावाने पूर्वसिद्धता करणे
‘आई आश्रमात येणार होती, तेव्हा ‘एखाद्या संतांच्या आगमनाचे वृत्त समजल्यावर ज्या भावाने आपण सेवा करतो’, तसा भाव मी अनुभवत होते. मी खोलीची स्वच्छता करून आईची झोपण्याची व्यवस्था इत्यादी करतांना ‘मी संतांची सेवा करत आहे’, असेच मला जाणवत होते. आई आश्रमात आल्यानंतरही त्याच भावाने आमच्याकडून सेवा होत आहे.
२. आईला पाहून साधकांना आनंद होत आहे.
३. एका साधकाने आईला नमस्कार केल्यावर त्या साधकाचा दत्ताचा नामजप चालू होणे
एकदा आम्ही श्री. अनिरुद्ध राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांच्याकडे गेलो होतो. तेव्हा आमच्या समवेत आईही त्यांच्याकडे आली होती. आम्ही तेथून निघण्यापूर्वी सर्वांनी आईला नमस्कार केला. तेव्हा श्री. राजंदेकर यांचा दत्ताचा नामजप चालू झाला. त्यांनी आईला विचारले, ‘‘तुम्ही दत्ताचा नामजप करता का ?’’ तेव्हा तिने ‘हो’, असे सांगितले. त्या वेळी ‘आई किती नामजप करते !’, हे आमच्या लक्षात आले.
४. संतांच्या सत्संगाचा लाभ होणे
४ अ. ‘आईला घेऊन संतांच्या सत्संगात उपस्थित रहायचे आहे’, असे मला समजले. त्या वेळी ‘एका संतांना घेऊन सत्संगासाठी जायचे आहे’, असाच माझा भाव होता. मी याच भावाने आईची सिद्धता करण्यात तिला साहाय्य केले.
४ आ. सत्संगात घेतलेल्या सूक्ष्मातील प्रयोगाच्या वेळी आईला जाणवलेली सूत्रे
१. सत्संगात आरंभी ‘सनातनच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका कु. मधुरा भोसले यांच्या पूजेतील शिवाच्या चित्राकडे पाहून काय जाणवते ?’, याविषयी प्रयोग करवून घेतला. तेव्हा आईला जाणवले, ‘शिवाचे डोळे अर्धोन्मीलित असले, तरी त्यात जिवंतपणा आहे. शिव संपूर्ण विश्वाकडे पहात आहे. शिव चांगल्या-वाईट सर्व घडामोडी पहात आहे. शिवाची सुष्ट आणि दुष्ट या सर्वांवर दृष्टी असून दुष्टांचा संहार करण्यासाठी तो प्रत्यक्ष कृतीही करत आहे.’
२. आईला जाणवलेली सूत्रे संतांना सांगितल्यावर त्यांनी आईला विचारले, ‘‘शिव नुसतेच दुष्टांकडे पहात आहे कि काही करणार आहे ?’’ तेव्हा आईने सांगितले, ‘‘शिव दुष्टांचा संहार करण्यासाठी प्रत्यक्ष कृतीही नक्कीच करणार आहे.’’ तिचे बोलणे ऐकून संत हसले.
४ इ. आईने संतांना ‘शेवटच्या क्षणापर्यंत माझा नामजप चालू रहावा आणि गुरूंच्या चरणी मला शेवटचा श्वास घेता यावा’, असे सांगणे : संतांनी आईला ‘तुम्हाला काय सांगायचे आहे ?’, असे विचारल्यावर आईने सांगितले, ‘‘शेवटच्या क्षणापर्यंत माझा नामजप चालू रहावा आणि गुरूंच्या चरणी मला शेवटचा श्वास घेता यावा.’’ ते ऐकून त्यांना आनंद होऊन ते म्हणाले, ‘‘हेच महत्त्वाचे आहे. हेच सर्वांना शिकायचे आहे.’’
४ ई. संतांनी आईला संत होण्याविषयी सांगितल्याने मुलीचा कृतज्ञताभाव दाटून येणे : संत आईला म्हणाले, ‘‘तुम्हाला आता लवकर संत व्हायचे आहे !’’ त्यांच्या बोलण्यातून ‘आई संतपदापर्यंत पोचली आहे’, हे लक्षात येऊन माझा कृतज्ञताभाव दाटून आला आणि माझी त्यांच्या चरणी निःशब्द कृतज्ञता व्यक्त झाली.’
होमिओपॅथी वैद्य अंजेश कणगलेकर (पू. (श्रीमती) दीक्षित आजींचा नातू (मुलीचा मुलगा)), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
‘पू. आजोबांच्या (पू. नीलकंठ दीक्षित यांच्या) देहत्यागानंतर आजी वर्षभर कुठे गेली नाही. ती म्हणाली, ‘‘आधी मला रामनाथी आश्रमात जायचे आहे आणि त्यानंतरच अन्यत्र कुठेही जाईन.’’
१. आजीला आश्रमात आणतांना पुष्कळ अडथळे येणे
१ अ. ‘आश्रमात जाण्यापासून एक मोठी शक्ती रोखत आहे’, असे आजीला जाणवणे : पू. आजोबांच्या आजारपणामुळे आजी गेल्या अनेक वर्षांत कुठेही गेली नसल्याने तिला ‘मला प्रवास जमेल का ?’, असे वाटत होते. आजीचा आश्रमात येण्याचा दिवस निश्चित झाल्यावर मी तिला आणण्यासाठी बेळगाव येथे गेलो. मी घरी गेल्यावर आजी मला म्हणाली, ‘‘आश्रमात जाण्यापासून एक मोठी शक्ती मला रोखत आहे’, असे मला जाणवते.’’
१ आ. आश्रमात जाण्यासाठी चारचाकीत बसल्यावर पुष्कळ दाब जाणवणे : आम्ही चारचाकीत बसल्यावर मला पुष्कळ दाब जाणवत होता. माझ्या मनात ‘चारचाकी चालवू शकेन कि नाही’, असा विचार आला. मी चारचाकी चालवतांना मानसरित्या नामजपादी उपाय करत होतो. अधून-मधून मी आजीला ‘तुला काही त्रास होत नाही ना ?’, हे विचारत होतो.
२. आजीला आश्रमात घेऊन जातांना ‘देवानेच संतांच्या स्वागतासाठी पूर्वसिद्धता केली आहे’, असे जाणवणे
२ अ. काही अंतर गेल्यावर मला ‘मी संतांना आश्रमात घेऊन जात आहे’, असे जाणवू लागले.
२ आ. आम्ही प्रवासात असतांना पाऊस पडला. त्या वेळी ‘हा ईश्वरी आशीर्वाद असून शुभसंकेत आहे’, असे मला जाणवले.
२ इ. मार्गावर पडलेल्या फुलांकडे पाहून ‘भगवंतानेच संतांच्या स्वागतासाठी मार्गात फुले पसरली आहेत’, असे जाणवणे : आम्ही आणखी काही अंतर पुढे गेल्यावर मार्गात झेंडूची फुले पडलेली दिसली. आम्ही तेथून जातांना त्या मार्गातून एकही गाडी आली किंवा गेली नाही. त्यामुळे त्या फुलांकडे पाहून ‘भगवंतानेच संतांच्या स्वागतासाठी मार्गात फुले पसरली आहेत’, असे मला जाणवले.’
(सर्व सूत्रांचा दिनांक ८.११.२०२१)
(वरील लिखाण पू. (श्रीमती) विजया दीक्षित या संत होण्यापूर्वीचे असल्यामुळे त्यांचा उल्लेख ‘पू.’ असा केलेला नाही.)