उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! चि. दूर्वा भिसे हे या पिढीतील आहेत !
पनवेल – सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात ५ डिसेंबर २०२१ या दिवशी एका सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी सनातनचे साधक श्री. नित्यानंद आणि सौ. भक्ती भिसे, (चि. दुर्वा भिसे हिचे वडील आणि आई), तसेच श्रीमती सुनंदा काते (सौ. भक्ती भिसे यांच्या आई) त्यांना येणार्या अनुभूती सांगत होत्या. त्याच वेळी सनातनच्या संत पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार म्हणाल्या, ‘‘कातेआजी साधना करत असल्यामुळे त्यांच्या दोन्ही मुलीही साधनारत आहेत आणि ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ या उक्तीप्रमाणे त्यांच्या कुटुंबात चि. दूर्वा उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आली अन् तिने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून | महर्लाेकात स्थान मिळवले आहे !’’ पू. (सौ.) अश्विनीताई यांनी ही घोषणा करताच सत्संगाचा उद्देश सर्वांना लक्षात आला आणि उपस्थित सर्वांच्या मुखमंडलावर भावरूपी स्मितहास्य फुलले !
या वेळी पू. (सौ.) अश्विनीताई पुढे म्हणाल्या, ‘‘परात्पर गुरु डॉक्टरांचे ‘हिंदु राष्ट्र कोण चालवणार ?’ याविषयीचे नियोजन किती योग्य आहे पहा. प्रगल्भ विचारप्रक्रिया असलेली दैवी बालके योग्य त्या वेळी देव पृथ्वीवर जन्माला घालत आहे. त्यांपैकीच चि. दुर्वा एक आहे. चि. दुर्वामध्ये भाव, चुकांची खंत, चुकांची संवेदनशीलता आदी दैवी बालकांची गुणवैशिष्ट्ये आहेत. तिची गुणवैशिष्ट्ये वाचतांना आनंद आणि कृतज्ञता वाटून भावजागृती झाली.’’
श्री. नित्यानंद भिसे या वेळी म्हणाले, ‘‘चि. दूर्वाला सर्व गोष्टींची माहिती उपजतच आहे. व्यावहारिक, तांत्रिक असा कुठला विषय तिला वर्ज्य नाही. सर्व विषयांवरील प्रश्न ती विचारते. ‘नवीन आलेला विषाणू कसा दिसतो ?’ इथपासून ते ‘चैतन्य, भाव किंवा प्रेमभाव म्हणजे काय ?’ इथपर्यंत विविध प्रश्न ती विचारते. तिचे बोलणे मोठ्यांप्रमाणे आहे.’’
सौ. भक्ती भिसे या वेळी म्हणाल्या, ‘‘सनातन पंचांग’मध्ये तिथीनुसार वाढदिवस असणार्या संतांची छायाचित्रे पाहून चि. दूर्वा म्हणाली की, मीही पुष्कळ नामजप करणार म्हणजे माझेही सनातन पंचांगमध्ये छायाचित्र येईल.’’
कार्तिक शुक्ल पक्ष सप्तमी (११.११.२०२१) या दिवशी देवद (पनवेल) येथील चि. दूर्वा नित्यानंद भिसे हिचा ५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या आई-वडिलांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
चि. दूर्वा नित्यानंद भिसे हिला ५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
‘वर्ष २०१८ मध्ये ‘चि. दूर्वा नित्यानंद भिसे उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ५७ टक्के पातळीची’, असे घोषित करण्यात आले होते. आता तिची पातळी ६१ टक्के झाली आहे. आता तिच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे तिची साधनेत प्रगती होत आहे.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
श्री. नित्यानंद वसंत भिसे (वडील), देवद, पनवेल.
१. प्रेमभाव : ‘माझे आई-बाबा ((कै.) सौ. सुमन भिसे आणि श्री. वसंत भिसे) गावाला रहायचे. वर्षभरापूर्वी आईचे निधन झाल्यावर बाबांच्या जीवनात पोकळी निर्माण झाली. त्यानंतर बाबा माझ्याकडे आल्यावर चि. दूर्वा त्यांना औषध-पाणी द्यायची, तसेच त्यांना काही हवे-नको, ते पहायची. ते बाहेर जात असतांना त्यांना ‘सांभाळून जा, लवकर या, फिरू नका आणि मास्क (मुखपट्टी) लावून जा’, असे सांगायची. तिच्या या स्वभावामुळे माझ्या बाबांना तिचा लळा लागला. त्यामुळे बाबांना माझी आई गेल्याच्या दुःखाचा विसर पडला.
२. समंजस : तिला ‘एखादी कृती करू नकोस’, असे सांगितल्यावर ते न करण्यामागील कारण समजून घेऊन दूर्वा ती कृती करत नाही, तसेच त्याविषयी मैत्रिणींनाही सांगते.
३. तिला स्वतःला समजलेली नवीन गोष्ट इतरांना सांगायला आवडते.
४. दूर्वाला स्वयंपाकघरातील कामे करण्याची पुष्कळ आवड आहे. ती आईला घरकामात साहाय्य करते.
५. जिज्ञासू वृत्ती : दूर्वा ‘कृतज्ञता म्हणजे काय ? भाव म्हणजे काय ? शिक्षापद्धतीचा अवलंब का करायचा आणि त्यामुळे काय होते ?’, असे प्रश्न विचारते. ‘प्रेमभाव, ईश्वर’ इत्यादी शब्दांचा अर्थ समजल्यावर ती प्रसंगानुरूप त्या त्या शब्दांचा बोलण्यात वापर करते. कोणताही सण आला की, ‘हा सण का साजरा करायचा ?’, असे ती मला विचारते.
६. धर्माचरणाची आवड : दूर्वाला केस कापलेले मुळीच आवडत नाहीत. ‘केसांच्या दोन वेण्या घालणे, कपाळाला कुंकू लावणे आणि हातात बांगड्या घालणे’, अशा सात्त्विक कृती करण्याचा तिचा आग्रह असतो.
७. शिक्षेचे काटेकोरपणे पालन करणे : एकदा तिने एक गंभीर चूक केली होती. त्यामुळे तिच्या आईने तिला ‘आठवडाभर कोणताही खाऊ खायचा नाही’, अशी शिक्षा दिली होती. त्यानंतर ती माझ्या समवेत बाजारात निघतांनाच मला सांगायची, ‘‘माझ्यासाठी खाऊ घेऊ नका.’’ एकदा आजोबांनी तिला ‘खाऊ घे. काही होत नाही’, असे सांगितले. त्यावर ती लगेच म्हणाली, ‘‘मला खाऊ नको.’’
८. वडिलांकडून झालेल्या चुकीची त्यांना जाणीव करून देणे : एकदा माझा बाबांशी वाद झाला आणि मी त्यांच्याशी मोठ्या आवाजात बोललो. त्यानंतर मला बाबांचा भ्रमणभाष आला. तेव्हा दूर्वा मला म्हणाली, ‘‘आधी बाबांची क्षमा मागा.’’ त्याप्रमाणे मी त्यांची क्षमा मागितली.
९. आश्रमात जाण्याची ओढ असणे : वारंवार ती म्हणते, ‘‘मला देवद आश्रमात जायचे आहे. मला रामनाथी आश्रम पहायचा आहे.’’ रामनाथी आश्रमात जाता यावे; म्हणून ती आम्ही सांगितल्याप्रमाणे प्रयत्न करते.
१०. ती ‘ॐ’ आणि ‘स्वस्तिक’ काढायला शिकली. त्या दिवशी तिला वेगळाच आनंद झाला. तिने संपूर्ण पानभर ‘ॐ’ आणि ‘स्वस्तिक’ काढले अन् ती आम्हाला दाखवत होती.
११. एका संतांनी ३ वर्षांपूर्वी सांगितले होते की, चि. दूर्वाच पुढे तुमच्यावर उपाय करेल. आता दूर्वाची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्यामुळे संतांचे बोल सत्य झाल्याची प्रचीती आली.’
सौ. भक्ती भिसे (आई), देवद, पनवेल.
१. ‘आई-वडिलांना ‘मम्मी-पप्पा’ न म्हणता ‘आई-बाबा’ म्हण’, असे मैत्रिणीला सांगणे : ‘आम्ही ज्या ठिकाणी रहातो, तेथे सर्व मुले आपल्या आई-वडिलांना ‘मम्मी-पप्पा’, असे म्हणतात. एकदा तिने तिच्या मैत्रिणीला सांगितले, ‘‘अगं, ‘आई-बाबा’ म्हणायचे. ते छान वाटते.’’ ती एवढ्यावरच थांबली नाही. जेव्हा तिची मैत्रीण तिच्या आई-वडिलांना ‘मम्मी-पप्पा’ म्हणते, तेव्हा दूर्वा तिला त्याची लगेच जाणीव करून देते.
२. वडिलांना त्यांच्यातील अहंच्या पैलूची जाणीव करून देणे : एकदा तिचे बाबा तिला म्हणाले, ‘‘आम्ही तुला मोठे केले.’’ त्यावर ती लगेच म्हणाली, ‘‘तुम्ही नाही, मला बाप्पाने मोठे केले. (ती श्रीकृष्णाला ‘बाप्पा’ म्हणते.) त्याने तुम्हाला शिकवले.’’
३. कोणताही सण असला, तर तिला पुष्कळ आनंद होतो. ती स्वतःहून सकाळी लवकर उठते. पूजा करायला साहाय्य करते. सणाच्या दिवशी तिला वेगळाच आनंद वाटतो.
४. सूक्ष्मातील कळण्याची क्षमता : एकदा ती मला स्वतःहूनच म्हणाली, ‘‘आई, चैतन्य पिवळ्या रंगाचे असते ना ?’’ मी ‘हो’ म्हटले आणि तिला विचारले, ‘‘तुला कसे ठाऊक ?’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘डॉक्टरबाबांचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) ग्रंथ आहे. त्यामध्ये रामनाथी आश्रमाचे छायाचित्र आहे. मी त्यात चैतन्य पाहिले.’’ (‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथातील शेवटच्या पानावर रामनाथी आश्रमाचे छायाचित्र आहे.)
५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव : आम्ही दूर्वाला पैसे साठवण्यासाठी एक डबा आणून दिला आहे. तिला कुणी खाऊसाठी पैसे दिल्यास ती त्यामध्ये पैसे ठेवते आणि म्हणते, ‘‘मी हे पैसे डॉक्टरबाबांना देणार आहे. यांतून ते साधकांसाठी सामान आणतील.’’ तिला वाटते, ‘तो डबा पटकन भरावा; म्हणजे तो मी डॉक्टरबाबांना लगेच देईन.’
‘परात्पर गुरु डॉक्टर, ‘दूर्वावर संस्कार कसे करायचे ?’, हे आम्हाला कळत नाही. ‘तुम्हीच ते आमच्याकडून करवून घ्या’, हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे.
६. स्वभावदोष : अनावश्यक बोलणे’
या लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक (२७.१०.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |