चार मुसलमान आरोपींना अटक करून त्यांचा छळ केल्याने त्यांना प्रत्येकी १ लाख रुपये हानी भरपाई द्या !

रा.स्व. संघाच्या कार्यालयात गायीचे शीर फेकल्याचे प्रकरण

अनेक प्रकरणात हिंदूंना अटक करून त्यांचा छळ करण्यात येत असतो आणि नंतर ते न्यायालयाकडून निर्दोष मुक्त होतात. अशा किती जणांना मानवाधिकार आयोगाने किंवा संबंधित राज्य सरकारांनी हानीभरपाई दिली आहे ? धर्मांधांविषयी मात्र लगेच अशी हानीभरपाई दिली जाते, हा भेदभाव नव्हे का ? – संपादक

मदुराई (तमिळनाडू) – येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात गायीचे शीर फेकल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या ४ मुसलमान तरुणांना प्रत्येकी १ लाख रुपये हानीभरपाई देण्यात यावी, असा आदेश तमिळनाडू राज्य मानवाधिकार आयोगाने दिला. शीर फेकल्याची घटना वर्ष २०११ मध्ये घडली होती. आरोपींना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाकडून कायदेशीर साहाय्य करण्यात आले होते.

१. आयोगाने म्हटले आहे की, मदुराई पोलिसांनी या तरुणांना अवैधरित्या कह्यात घेऊन त्यांच्यावर अत्याचार केले. या तरुणांनी ते निरपराध असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केल्यानंतरही त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. या प्रकरणी संबंधित पोलिसांवर कारवाई करण्यात यावी, असेही आयोगाने आदेशात म्हटले आहे.

२. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या अहवालात आरोपींवर अत्याचार करण्यात आल्याचे म्हटले होते. आयोगाने आदेश देतांना या अहवालाचा संदर्भ दिला.