‘नीट’ची काऊन्सिलिंग प्रक्रिया जलदगतीने होण्यासाठी संपात सहभाग
मुंबई – ‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा) – पीजी (पोस्ट ग्रॅज्युएशन) साठीची काऊन्सिलिंग प्रक्रिया जलदगतीने व्हावी, यासाठी राज्यातील निवासी आधुनिक वैद्य ६ डिसेंबरपासून संपावर गेले आहेत. शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाबाहेर निवासी आधुनिक वैद्यांनी आंदोलन केले. रुग्णालयांमध्ये आधुनिक वैद्यांची संख्या अल्प आहे. त्यामुळे सध्या कर्तव्यावर असलेल्या आधुनिक वैद्यांवर अधिक ताण येत आहे. केंद्र सरकारला याचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी संपावर जात असल्याचे आधुनिक वैद्यांनी स्पष्ट केले आहे. रुग्णांचे हाल होऊ नयेत, यासाठी प्राध्यापक वर्ग आणि इतर आधुनिक वैद्य कामावर असल्याचे स्पष्ट केले आहे.
देशात आधुनिक वैद्यांच्या एकूण ५० सहस्र जागा आहेत. राज्यात ५ सहस्र ५०० निवासी आधुनिक वैद्य सध्या कार्यरत आहेत. निवासी आधुनिक वैद्यांच्या राज्यात पहिल्या वर्षाच्या २ सहस्र ५०० जागा आहेत; मात्र पीजी-नीटच्या जागा अद्याप न भरल्याने निवासी आधुनिक वैद्यांवर अधिक ताण आला आहे.