राज्यातील अमली पदार्थ प्रकरणाच्या ५ महत्त्वाच्या गुन्ह्यांचे अन्वेषण केंद्र करणार !

केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथक

मुंबई – राज्य सरकारच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईतील ५ महत्त्वाच्या गुन्ह्यांचे अन्वेषण केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाकडे सोपवण्याचा आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला आहे. या संदर्भात राज्याच्या महासंचालकांना पत्र पाठवण्यात आले आहे.

याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आक्षेप घेतला आहे. केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाचा पैसे उकळण्याचा धंदा चालू असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. यामध्ये ‘केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने कारवाई केलेले छोटे गुन्हे आहेत कि राज्याच्या युनिटने हस्तगत केलेल्या ३ टन अमली पदार्थांचे मोठे गुन्हे आहेत’, अशी विचारणा केंद्र सरकारला केली आहे. केंद्रीय अमली पदार्थविरोधी विभाग खरंच काम करत असेल, तर तुम्हाला जी २६ बोगस प्रकरणे पाठवली आहेत, त्यांची चौकशी करा. ‘हे गुन्हे त्यांच्याकडे कशाला हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत, याचे उत्तर केंद्र सरकारने द्यावे’, अशी मागणी मलिक यांनी केली आहे.