उपचाराच्या वेळी रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्यासाठी डॉक्टरांना दोषी ठरवता येणार नाही ! – सर्वोच्च न्यायालय

नवी देहली – उपचाराच्या वेळी रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्यासाठी डॉक्टरांना दोषी ठरवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. ‘रुग्णांवर उपचार करतांना त्यांच्या आयुष्याची निश्‍चिती कुठलाच डॉक्टर देऊ शकत नाही. ते केवळ त्यांच्या परीने सर्वोत्तम उपचार देण्याचा प्रयत्न करू शकतात’, असे न्यायालयाने या वेळी म्हटले. मुंबई रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन केंद्र यांच्या एका प्रकरणाच्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी ‘राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगा’ने दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला. या आदेशात डॉक्टरांच्या दायित्वशून्यतेमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याने रुग्णाच्या नातेवाइकांना १४ लाख १८ सहस्र रुपयांची हानीभरपाई देण्यास सांगण्यात आले होते.

सध्या रुग्णाचे काही बरे-वाईट झाल्यास, त्याचा सगळा दोष संबंधित डॉक्टरवर ढकलण्याची मानसिकता निर्माण झाली आहे. अनेक प्रकरणांमध्ये रुग्णांचे नातेवाईक रुग्णाचा मृत्यू झाल्याचे स्वीकारण्यास सिद्ध नसतात. कोरोनाच्या साथीच्या काळात दिवसरात्र रुग्णांची सेवा करणार्‍या डॉक्टरांवर आक्रमणाची प्रकरणे वाढत जात असल्याविषयीही न्यायालयाने चिंताही व्यक्त केली.