शेतकर्‍यांच्या मृत्यूची कोणतीही नोंद नसल्याने हानी भरपाई देण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही ! – केंद्रीय कृषीमंत्र्यांची स्पष्टोक्ती

शेतकर्‍यांच्या आंदोलनात मृत्यू पावलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबियांनी हानी भरपाई देण्याची मागणी

नवी देहली – कृषीविषयक कायदे मागे घेण्याच्या आंदोलनात शेतकर्‍यांच्या झालेल्या मृत्यूच्या प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांना हानी भरपाई देण्यात यावी, या मागणीविषयी केंद्र सरकारने संसदेत स्पष्टीकरण दिले आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी सांगितले की, सरकारकडे शेतकरी आंदोलनामुळे मृत झालेल्यांची कोणतीही माहिती नाही. कृषी मंत्रालयाकडे अशा प्रकारची कोणतीही नोंद नाही. त्यामुळे त्यांच्या नातेवाइकांना हानी भरपाई देण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही.

गदारोळामुळे संसदेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित

संसदेत गदारोळ करून कामकाज होऊ न देणार्‍या खासदारांना निलंबित करण्यासह त्यांच्याकडून वाया गेलेल्या वेळेची हानी भरपाई वसूल करा ! – संपादक 

संसदेच्या हिवाळी अधिवेशनच्या तिसर्‍या, म्हणजे १ डिसेंबर या दिवशी दोन्ही सभागृहांत कामकाजाचा प्रारंभ गदारोळात चालू झाला. पावसाळी अधिवेशनात गदारोळ करणार्‍या विरोधी पक्षांच्या १२ खासदारांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यावरून विरोधी पक्षांकडून गदरोळ करण्यात येत होता. यामुळे दोन्ही सभागृहे दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली. सदस्यांचे निलंबन रहित करण्याची मागणी विरोधकांकडून होत आहे, तर ‘निलंबित खासदारांनी क्षमा मागावी’ असे सभापतींकडून सांगण्यात येत आहे. विरोधी पक्षांनी ‘खासदार क्षमा मागणार नाहीत’, असे सांगितले आहे.