संभाजीनगर येथे लहान मुलीला कपाटात कोंडणार्‍या व्यक्तीला जमावाकडून मारहाण !

विकृत मनोवृत्तीचा कहर !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

संभाजीनगर – २ वर्षांच्या मुलीला मारहाण करत लाकडी कपाटात कोंडणार्‍या विकृत व्यक्तीला जमावाने बेदम मारहाण केली. औषधी भवन येथे २७ नोव्हेंबरच्या रात्री ९.३० वाजता हा प्रकार घडला. आरोपीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी क्रांती चौक पोलीस ठाण्यासमोर मोठा जमाव जमला होता. रात्री विलंबापर्यंत आरोपीवर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू होती. दलालवाडी भागातील २ वर्षांची लहान मुलगी सापडत नसल्याने तिच्या कुटुंबासह या भागात रहाणार्‍या सर्वांनीच तिचा शोध घेतला. तेव्हा नुकताच भाड्याने रहाण्यास आलेल्या ४० वर्षीय व्यक्तीच्या घरातून मुलीच्या रडण्याचा आवाज आला. त्यामुळे लोकांनी दरवाजा तोडून कपाटात कोंडलेल्या मुलीला बाहेर काढले. तिच्या नाकातून रक्तस्राव चालू होता. घरमालकाच्या साहाय्याने त्या व्यक्तीचा शोध घेऊन लोकांनी त्याला चोप दिला.