तुर्कस्तानने उत्तर सीरियामध्ये वितरित केलेल्या पुस्तकातील महंमद पैगंबर यांच्या चित्रामुळे संतप्त नागरिकांकडून पुस्तकाची जाळपोळ !

इस्तंबूल (तुर्कस्तान) – तुर्कस्तानच्या शिक्षण मंत्रालयाने तुर्कस्तानच्या नियंत्रणात असलेल्या उत्तर सीरियामधील काही भागांमध्ये लहान मुलांसाठी महंमद पैगंबर यांचे चित्र असलेल्या पुस्तकाचे वितरण केल्याने तेथील नागरिक संतप्त झाले आहेत. त्यांनी या पुस्तकांची जाळपोळ केली आहे. ‘जर हे पुस्तक मागे घेण्यात आले नाही, तर निदर्शने करण्यात येतील’, अशी चेतावणी स्थानिकांनी दिली आहे.

१. या पुस्तकामध्ये गुलाबी स्वेटर आणि पॅन्ट परिधान केलेली एक दाढीवाली व्यक्ती स्वतःच्या लहान मुलीला उचलून घेऊन शाळेच्या बसमध्ये चढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र प्रकाशित करण्यात आले आहे. या चित्रावर ‘महंमग पैगंबर स्वतःच्या मुलीसमवेत’ असे शीर्षक देण्यात आले आहे. त्यामुळेच वाद निर्माण झाला आहे. इस्लाममध्ये महंमद पैगंबर याचे चित्र प्रसिद्ध करण्यावर अलिखित बंदी आहे.

२. काही वर्षांपूर्वी फ्रान्समध्ये शार्ली हेब्दो नियतकालिकाने महंमद पैगंबर यांचे व्यंगचित्र प्रसिद्ध केल्याने त्याच्या कार्यालयावर जिहादी आतंकवाद्यांनी आक्रमण करून १३ जणांना ठार केले होते. गेल्या वर्षी फ्रान्समध्येच एका शिक्षकाने शाळेत हे चित्र दाखवल्याने त्याची हत्या करण्यात आली होती.