इतरांना साहाय्य करण्यास सदैव तत्पर असलेले चि. मनोज कात्रे अन् हसतमुख, प्रेमळ आणि साधनेची तळमळ असलेल्या चि.सौ.कां. सई कुलकर्णी !

इतरांना साहाय्य करण्यास सदैव तत्पर असलेले आणि प्रेमळ स्वभावामुळे सर्वांना जोडून ठेवणारे चि. मनोज कात्रे अन् हसतमुख, प्रेमळ आणि साधनेची तळमळ असलेल्या चि.सौ.कां. सई कुलकर्णी !

उद्या कार्तिक कृष्ण पक्ष द्वादशी (१.१२.२०२१) या दिवशी मूळ कोल्हापूर येथील आणि सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले चि. मनोज कात्रे आणि मूळ मिरज येथील अन् फोंडा (गोवा) येथे वास्तव्यास असलेल्या चि.सौ.कां. सई कुलकर्णी यांचा शुभविवाह आहे. त्या निमित्त चि. मनोज कात्रे आणि चि.सौ.कां. सई कुलकर्णी यांचे कुटुंबीय अन् सहसाधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

श्री. मनोज कात्रे आणि  चि.सौ.कां. सई कुलकर्णी  यांना शुभविवाहानिमित्त

सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

श्री. मनोज कात्रे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१. मृदु आणि प्रांजळ स्वभाव

‘मनोजचा स्वभाव लहानपणापासूनच प्रेमळ आहे. त्यामुळे तो सर्वांना हवाहवासा वाटतो. त्याच्याशी बोलतांना ‘तो मृदु आणि प्रांजळ आहे’, हे प्रकर्षाने जाणवते.

२. साधी रहाणी

लहानपणापासून मनोजची रहाणी साधी आहे. त्याला नीटनेटके आणि व्यवस्थित राहिलेले आवडते. मनोजला त्याचे मित्र आणि त्याच्या कार्यालयातील कर्मचारी म्हणतात, ‘‘तू पुष्कळ साधेपणाने रहातोस. तुझ्या वयाची चाकरी करणारी मुले इतकी साधी रहात नाहीत.’’ खरोखरीच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेनेच मनोजने त्याच्यातील चांगूलपणा बाहेरील जगामध्ये राहूनही जपला आहे. येथे परात्पर गुरुदेवांची त्याच्यावर असलेली अपार कृपा लक्षात येते.

३. देशसेवा करण्याची इच्छा असणे

श्री. मनोज याने शिक्षण पूर्ण केल्यावर एक वर्ष चाकरी केली. त्यानंतर त्याने राष्ट्र आणि धर्म यांसाठी काहीतरी करण्याच्या इच्छेने चाकरी सोडून स्पर्धा परीक्षांची सिद्धता चालू केली. यातून ‘मोठ्या वेतनाची नोकरी मिळवणे’, हे त्याचे ध्येय नव्हते, तर ‘त्यात उत्तीर्ण होऊन देशसेवा करता यावी’, असा त्याचा विचार होता. भौतिक गोष्टींमध्ये भुलून सरसकट तडजोड करणे तो अमान्य करतो. ‘तारतम्याने सर्व गोष्टींची सांगड कशी घालता येईल ?’, असा त्याचा प्रयत्न असतो.

४. सेवा मनापासून करणे

मनोजकडे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अपलोडींगची (दैनिक ‘सनातन प्रभात’ संकेतस्थळावर ठेवणे) सेवा आहे. ही सेवा तो मनापासून करतो. तो सेवेतील नवीन साधकांनाही सोप्या भाषेत आणि चांगल्या प्रकारे शिकवतो.

५. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातन संस्था यांवर नितांत श्रद्धा असणे

मनोजची ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातन संस्था’ यांवर नितांत श्रद्धा आहे. ‘साधनेत आपण अल्प पडतो. साधना अजून पुष्कळ करायला हवी’, अशी त्याला खंत वाटते. ती त्याच्या बोलण्यातून व्यक्त होते.’

– सर्वश्री मोहन पेंढारकर, गणेश पेंढारकर आणि डॉ. रमेश पेंढारकर (मनोजचे सर्व मामा), सौ. प्रीती पेंढारकर (मामी), सावंतवाडी, सौ. हेमांगी पुराणिक (मावशी), श्री. गौरीश पुराणिक (मावसभाऊ), सांगली, सौ. इंद्राणी कुलकर्णी आणि श्री. हृषिकेश कुलकर्णी (मावसबहीण आणि तिचे यजमान), पुणे अन् श्री. राघव कात्रे (धाकटा भाऊ) कोल्हापूर

६. कुटुंबियांची काळजी घेणे

‘मनोजच्या बारावीच्या महत्त्वाच्या शैक्षणिक वर्षात त्याची आई पुष्कळ रुग्णाईत होती. तेव्हा त्याने तिची जमेल, तशी सेवा करून बारावीच्या वार्षिक परीक्षेत उत्तम गुण मिळवले. एप्रिल २०२१ मध्ये मनोजला कोरोनाचा संसर्ग झाला. त्याने एकट्यानेच पुण्यातील त्याच्या वास्तूमध्ये राहून सर्व परिस्थिती सक्षमपणे हाताळली. काही दिवसांनी कोल्हापूर येथे मी, मनोजची आई आणि त्याचा धाकटा भाऊ राघव आम्ही सर्व जण कोरोनाने बाधित झालो. तेव्हा मनोजने कोल्हापूर येथे येऊन आमचे रुग्णालय, औषधे, खाणे-पिणे इत्यादी गोेष्टींचे नियोजन केले.’

– श्री. चंद्रकांत कात्रे, कोल्हापूर (वडील)

७. सर्वांना आधार वाटणे

‘मनोजने अनेक जणांना जोडले आहे. ‘त्याने कधी कोणाला दुखावले किंवा त्याचे कोणाशी पटले नाही’, असे मी पाहिले नाही. मनोज समजूतदार असल्याने त्याचा सर्वांना आधार वाटतो. तो सर्वांशी मिळून मिसळून वागतो.’

– सौ. मीरा कात्रे (आई), कोल्हापूर

८. कठीण प्रसंगी साहाय्य करणे

‘मे २०२१ मध्ये माझ्या आईचे निधन झाले. तेव्हा मनोज नुकताच कोरोनाच्या संसर्गातून बरा झाला होतो. त्याने अंत्यविधीच्या पूर्वसिद्धतेमध्ये साहाय्य केल्याने आम्हाला सर्व अंत्यविधी करणे सुलभ झाले. मनोज कोणत्याही प्रसंगी साहाय्याला तत्पर असतो.’

– श्री. हृषिकेश कुलकर्णी, पुणे (मावसबहिणीचे यजमान)

ज्येष्ठांप्रती आदर असलेले आणि अभ्यासू वृत्तीचे श्री. मनोज कात्रे !

१. ज्येष्ठांप्रती आदर

मनोज त्यांच्या आई-वडिलांचा शब्द डावलत नाहीत. कलियुगात आई-वडिलांना मान देणारी, त्यांच्या मताचा आदर करणारी मुले क्वचितच पहायला मिळतात. घरातील ज्येष्ठांची मते विचारात घेऊन तसे वागण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ‘विवाहासाठी कार्यालय ठरवणे असो कि कपड्यांची खरेदी असो, ते नेहमीच इतरांच्या मताप्रमाणे वागतात’, असे आमच्या लक्षात आले.

२. अभ्यासू वृत्ती

एखादा निर्णय घेतांना सर्वांगीण विचार करणारी मुले सध्याच्या काळात क्वचितच आढळतात. मनोज मात्र याला अपवाद आहेत. ते प्रत्येक गोष्टीच्या संदर्भात परिपूर्ण अभ्यास आणि सारासार विचार करूनच निर्णय घेतात.

३. समजूतदार

प्राप्त परिस्थितीत आनंदी रहाणारे मनोज यांनी अल्पावधीत आमचे मन जिंकले.’ – सौ. सुजाता आणि श्री. मधुसूदन कुलकर्णी (श्री. मनोज यांचे भावी सासू-सासरे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.११.२०२१)

परिपूर्ण कृती करणारे आणि साधनेची तळमळ असलेले पुणे येथील चि. मनोज कात्रे ! 

१. हसतमुख

‘श्री. मनोज कात्रे हे नेहमी हसतमुख आणि आनंदी असतात. त्यांचा कोणत्याही गोष्टीच्या संदर्भात तक्रार करण्याचा स्वभाव नाही. त्यांचा ‘प्राप्त परिस्थितीतून कसा मार्ग काढू शकतो ?’, असा विचार असतो.

२. नम्रता

त्यांच्या वागण्या-बोलण्यात नम्रता जाणवते. घरातील सदस्यांशी असो कि कार्यालयातील कर्मचार्‍यांशी असो, त्यांचे बोलणे एकाच लयीत असते.

३. परिपूर्ण कृती करणे

‘एखादी गोष्ट कशी केल्यास अधिक परिपूर्ण होईल ?’, असा त्यांचा विचार असतो. कोणतीही कृती उरकून टाकण्याची त्यांची वृत्ती नाही. कपड्यांची खरेदी असो कि अन्य गोष्टी त्यातून त्यांची अभ्यासू वृत्ती प्रकर्षाने जाणवते.

४. साधनेची ओढ

‘नोकरी सांभाळून आपल्याकडून सेवा आणि साधनाही व्हायला हवी’, असे त्यांना नेहमी वाटते. ते एकदा मला म्हणाले, ‘‘दैनंदिन जीवन सहजतेने जगता यावे, एवढा पैसा मला मिळाला, तरी पुरे ! भौतिक सुखाच्या मागे लागून मला त्यात अडकायचे नाही. माझ्याकडून साधना होऊन माझी आध्यात्मिक वाटचालही व्हायला हवी.’’

५. सेवेची तळमळ

ते नोकरी सांभाळून प्रतिदिन १ ते दीड घंटा दैनिक संकेतस्थळावर ठेवण्याची (अपलोडिंगची) सेवा घरबसल्या करतात. ‘ते मनापासून आणि प्रामाणिकपणे सेवा करत असल्याने त्यात अचूकता असते’, असे त्यांचे उत्तरदायी साधक सांगतात. सेवेत चुका झाल्यावर त्यांना खंत वाटते.

विवाहाच्या वेळी बरीच सिद्धता असल्याने त्यांना सेवेला प्रतिदिन १ ते दीड घंटा मिळत नसे. त्यामुळे त्यांनी अल्प वेळाची दुसरी सेवा मागून घेतली. यामागे त्यांचा ‘सेवा केल्याने वेगळेच समाधान आणि आनंद मिळतो. त्यामुळे सेवेत खंड पडायला नको’, असा भाव असायचा.

६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी भाव

त्यांच्या मनात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी भाव आहे. ‘आपत्काळाच्या संदर्भात गुरुदेवांचे मार्गदर्शन लाभत आहे’, याविषयी त्यांना कृतज्ञता वाटते. त्यांच्या बोलण्यातून ‘गुरुदेवांना अपेक्षित असे साधनेचे प्रयत्न करायला मी न्यून पडतो’, अशी खंत नेहमी जाणवते.

सात्त्विक, साधकत्व असलेले आणि समजूतदार जोडीदार मला लाभला, यासाठी गुरुदेवांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे ! ‘हे गुरुदेवा, आम्हा उभयतांकडून साधना करून घेऊन आम्हाला या भवसागरातून तारून न्या आणि आमच्यात आध्यात्मिक स्तरावरचे नाते निर्माण होऊ द्या’, अशी आर्तभावाने प्रार्थना आहे !’

– कु. सई कुलकर्णी, सनातन आश्रम, मिरज. (श्री. मनोज कात्रे यांची भावी पत्नी) (१७.११.२०२१)


 चि.सौ.कां. सई कुलकर्णी यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

‘आमची कन्या चि.सौ.कां. सई लहानपणापासून साधनामय वातावरणात वाढली. त्यामुळे तिच्यावर साधनेचे संस्कार झाले. वयाच्या ५ व्या वर्षापासून ती मिरज येथील सनातनच्या आश्रमात रहात होती. नंतर ती गोवा येथील रामनाथी आश्रमात गेली. तिला लहान वयात अनेक संतांचा सत्संग लाभून साधनेचे बाळकडू मिळाले.

१. हसतमुख

सई लहानपणापासूनच हसतमुख असून तिचे हसणे नैसर्गिक आहे. ती सर्वांशी मिळून-मिसळून वागते. घरी कोणीही आले, तर ती त्यांच्याशी सहजतेने संवाद साधते.

२. समजूतदार

ती लहान असतांना आम्ही दोघेही प्रसारसेवेला बाहेर जायचो. त्या वेळी तीसुद्धा आमच्यासह उन्हा-तान्हात यायची. कधी तिला इतर साधकांच्या घरी ठेवून आम्ही सेवेला गेल्यास ती कधीच हट्ट करत नसे. ती साधकांकडे शांतपणे आणि आनंदाने रहायची. ती आणि तिचा मोठा भाऊ सौरभ यांच्यामुळेच आमच्याकडून गुरुसेवा होऊ शकली.

३. समाधानी वृत्ती

तिला लहानपणापासूनच छानछौकीची आवड नाही. आम्ही तिला जे कपडे घेत असू, ते कपडे ती आनंदाने घालायची. ‘मला असेच कपडे हवेत’, असा हट्ट तिने कधीच केला नाही. जे देतील, ते समाधानाने घेणे आणि वापरणे, ही तिची प्रवृत्ती आहे. तिला एखादी गोष्ट आवडली आणि आम्ही तिला नाही म्हणालो, तरी तिने कधीही हट्ट केला नाही.

४. सहनशील

एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली, तरी न बोलता सहन करत रहाणे, हा तिचा स्थायीभाव आहे. यातून तिची कमालीची सहनशीलता दिसून येते.

५. इतरांचा विचार करणे

दुसर्‍याच्या मर्मावर बोट ठेवून बोलणे किंवा इतरांना दुखावणे तिच्या रक्तात नाही. ती नेहमी सर्वांशी प्रेमाने बोलते. समोरच्याला एखादी गोष्ट सांगायची असेल, तर ‘त्याला वाईट वाटू नये’, अशा पद्धतीने ती सांगते.

६. रुग्णाईत आई-वडिलांची सेवा करणे

मागील वर्षी मी (सौ. सुजाता) आगाशीत पाय घसरून पडले. त्यामुळे माझ्या डाव्या हाताला अस्थिभंग झाला होता. तेव्हा सईने माझी प्रेमाने काळजी घेतली.

मला (श्री. मधुसूदन) बरे नसतांनाही ती माझीही काळजी घेते. मे २०२१ मध्ये दीड मास मी रुग्णाईत होतो. तेव्हा सई प्रतिदिन माझ्या पथ्याप्रमाणे स्वयंपाक करून मला वाढत असे. ‘आई जशी माझी काळजी घेईल’, तशा आत्मीयतेने सईने माझी काळजी घेतली.

७. सेवेची तळमळ

ग्रंथ-संकलनाची सेवा असो, आश्रमात अल्पाहार बनवण्याची सेवा असो कि भांडी घासण्याची सेवा असो, सई सर्व प्रकारच्या सेवा नेहमीच मनापासून आणि पूर्ण क्षमतेनिशी करत असे. सेवा करण्यासाठी तिने कधीही टाळाटाळ केली नाही. तिला सेवेमुळे रात्री उशिरापर्यंत जागरण करावे लागत असे. त्या वेळीही ती उत्साहाने सेवा करत असे.

सईला श्रीसत्‌शक्ति बिंदाताई यांचे मार्गदर्शन लाभले. संतांनी दिलेली सेवा ती परिपूर्ण करायची. कितीही वेळ लागला, तरी घाई न करता किंवा न उरकता सेवा अचूक होण्यासाठी प्रयत्न करायची. श्रीसत्‌शक्ति बिंदाताई यांच्या सत्संगामुळे तिच्यात बरेच पालट झाले. व्यवस्थितपणा, हसतमुख रहाणे, समयसूचकता, वेळेत सेवा करणे हे सर्व गुण तिच्यात दिसून येतात.

८. नातेवाइकांच्या विवाहापेक्षा सेवेला प्राधान्य देणे

आमच्या घरी एका नातेवाइकाचा विवाह होता. त्या वेळी सईला संतांसह महत्त्वाच्या सेवा होत्या. त्यामुळे ती आम्हाला म्हणाली, ‘‘मला बर्‍याच सेवा आहेत. त्यामुळे मी लग्नाला येऊ शकणार नाही.’’

मुली जन्मतात, त्यांचा विवाह होतो आणि त्या सासरी निघून जातात. आठवणी तेवढ्या मागे ठेवतात. त्यामुळे आई-वडिलांना वाईट वाटणे साहजिक आहे; पण आपल्या घरीसुद्धा सून येते, तेव्हा ‘ती कोणाचे तरी घर सोडून येते’, हे लक्षात आल्यावर ‘प्रारब्धामुळे विवाह होतो’, याची जाणीव झाली. विवाह हा आपल्याला जीवनामध्ये संतुलित रहायला आणि आध्यात्मिक स्तरावर त्याग करायला शिकवतो, हे नक्की !

सई विवाह करून जेथे जाईल, त्या घरात श्री गुरूंचे संस्कार घेऊन जाईल आणि तेथील वातावरण साधनामय करील, यात शंका नाही ! विवाहोत्तर काळासाठी तिला अनेक शुभेच्छा आणि आशीर्वाद !’

– सौ. सुजाता आणि श्री. मधुसूदन कुलकर्णी (श्री. मधुसूदन कुलकर्णी यांची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के आहे.) (सईचे आई-वडील), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.११.२०२१)


परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा अमूल्य सत्संग लाभणे 

‘मी ३ – ४ वर्षांची असल्यापासून माझे आई-वडील सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. त्यामुळे मला बालपणापासूनच साधनेचे बाळकडू मिळाले. आतापर्यंत मला परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सेवेच्या निमित्ताने श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांचा चैतन्यदायी सत्संग लाभला. त्यांच्याकडून व्यष्टी आणि समष्टी साधनेचे अनेक पैलू शिकायला मिळाले. ‘प्रत्येक क्षणी साधनेच्या दृष्टीकोनातून कसा विचार करायचा ?’, याची अमूल्य शिकवण त्यांनी दिली.

‘साधकांनी व्यष्टी आणि समष्टी साधना तळमळीने करून हिंदु राष्ट्रासाठी पात्र व्हावे’, असा ध्यास असलेले गुरुदेव अन् श्रीसत्‌शक्ति बिंदाताई यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– कु. सई कुलकर्णी, सनातन आश्रम, मिरज. (१७.११.२०२१)


हसतमुख आणि परात्पर गुरु डॉ. आठवले अन् श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याप्रती भाव असलेल्या चि.सौ.का. सई कुलकर्णी !

१. हसतमुख आणि मिळून मिसळून रहाणे

‘सई नेहमी हसतमुख असते. ती अनेक वर्षे आश्रमात राहूनही बाहेर सहजतेने वावरते. ती मनमोकळी असून सर्वांच्यात लगेच मिसळते. त्यामुळे ‘ती सर्वांना आपल्यातीलच एक आहे’, असे वाटते.

२. सकारात्मक रहाणे

सई प्रत्येक गोष्टींविषयी सकारात्मक असते. तिच्याशी बोलतांना काही नकारात्मक बोलल्यास ती त्यावर त्वरीत सकारात्मक दृष्टीकोन सांगते.

३. शिकण्याची वृत्ती

‘सईला कोणतीही नवीन गोष्ट समजल्यावर ती पूर्णपणे शिकावी’, असे तिला वाटते. सतत शिकण्याच्या स्थितीत राहिल्याने तिला नव्या गोष्टींचे दडपण येत नाही.

४. साधनेची तळमळ

‘पुढील जीवनात आपली साधना चांगल्या प्रकारे व्हायला हवी’, अशी तिची तळमळ आहे.

५. अहं अल्प

सई प्रतिष्ठित आणि सुखवस्तू कुटुंबातील असूनही तिच्या वागण्या-बोलण्यात अहं जाणवत नाही. तिच्या साधनेविषयीही हेच जाणवते. सईला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि अनेक संत यांचा लहानपणापासूनच सहवास लाभलेला असूनही तिला त्याचा कोणत्याच प्रकारचा अहं नाही.

६. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याप्रती भाव 

अ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या एका कृपाकटाक्षाने जीवनाला कलाटणी मिळते’, अशी तिची दृढ श्रद्धा आहे.

आ. तिला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंच्या समवेत सेवा करण्याची संधी लाभली. याविषयी तिला पुष्कळ कृतज्ञता वाटते. त्यांच्याविषयी बोलतांनाही तिचा भाव जाणवतो. तिचे बोलणे ऐकतांना आपलाही भाव जागृत होतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला साधिका पत्नी लाभली, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘भावी आयुष्यात साधनेची घडी नीट बसून आम्हा दोघांची साधनेत जलद प्रगती होऊ दे’, अशी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी अनन्यभावाने प्रार्थना आहे.’

– श्री. मनोज कात्रे (सईचे भावी पती), पुणे (१८.११.२०२१)


प्रेमभाव, निर्मळता आणि सर्वांशी जवळीक साधणारी चि.सौ.का. सई कुलकर्णी !

कु. श्रद्धा लोंढे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१. प्रेमभाव : ‘गुरुकुलात असल्यापासून सईमधील प्रेमभाव आम्हा सर्वांनाच अनुभवायला मिळाला. प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस करणे, त्यांना काय हवे नको ते पहाणे, हे सर्व ती आरंभीपासूनच पुष्कळ उत्साहाने आणि निरपेक्षपणे करत असे.

२. तत्त्वनिष्ठता : सईमध्ये प्रेमभावासह तत्त्वनिष्ठताही आहे. आम्ही गुरुकुलात एकत्र असतांना कुणाची काही चूक लक्षात आल्यास ती अत्यंत नम्रतेने साधकांना सांगायची. त्यातूनही तिचा प्रेमभावच दिसून यायचा.

३. पुढाकार घेणे : ‘गुरुकुलात आम्ही एकत्र रहात असतांना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा यायच्या. कधीकधी गुरुकुलातील सर्वांसाठी प्रसारातील साधकांकडून खाऊ यायचा, तर तो वेळेत संपवण्याचे हे दायित्व असायचे. कधी कुठे बाहेर प्रसारात शिकण्यासाठी जायचे असल्यास लगबगीने सिद्धता करायची असायची. अशा सर्व गोष्टी पूर्ण करण्याकडे सई लक्ष द्यायची, तसेच येणार्‍या अनेक सेवा ती स्वतः पुढाकार घेऊन पूर्ण करायची. त्यामुळे अनेक जणांना तिचा आधार वाटायचा.’


कु. प्राजक्ता धोतमल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१. समाजातील लोकांना साधनेचे महत्त्व पटवून देणे : ‘कु. सई आणि आम्ही प्रसाराला समवेत जायचो. तेव्हा सईचे वय साधारण १५ – १६ वर्षांचे होते. त्या वेळी ती समाजातील लोकांना साधनेचे महत्त्व पटवून देऊन त्यांना अर्पण देणे आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ घेणे यांसाठी उद्युक्त करायची. ‘थोडा त्याग केला, तरी भगवंतापर्यंत तो पोचतो’, हे ती समाजातील लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करायची.

२. सईशी बोलतांना निराळाच आनंद मिळून आपलेपणा जाणवणे : आरंभी माझी आणि सईची प्रत्यक्ष ओळख नव्हती. एकदा माझ्या आईने माझ्याशी बोलण्यासाठी तिच्या भ्रमणभाषचा वापर केला. तेव्हा आमची ओळख नसतांनाही सई माझ्याशी पुष्कळ सहजतेने बोलली. त्यानंतर मी पूर्णवेळ झाल्यानंतरही सई जेव्हा जेव्हा बोलते, तेव्हा तिचे बोलणे सहज, दुसर्‍यांविषयी आदर व्यक्त करणारे असते. सईशी बोलतांना निराळाच आनंद मिळून आपलेपणा जाणवतो.

३. निर्मळता : गुरुकुलात असतांना सईशी संपर्क असायचा; परंतु त्यानंतर विविध सेवांमुळे सईशी प्रत्यक्ष असलेला संपर्क अल्प होत गेला; परंतु तरीही सई दिसली की, तिच्याविषयी आतून आम्हाला आपलेपणा जाणवतो. तो तिच्यातील निर्मळतेमुळेच ! भगवंतानेच आम्हा मैत्रिणींना आध्यात्मिक स्तरावर जोडून ठेवले आहे.

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव : कु. सईचा विवाह ठरल्यानंतर आम्ही काही मैत्रिणी पुष्कळ दिवसांनी एकत्र जमलो होतो. त्या वेळी अनौपचारिक बोलता बोलता सई गुरुदेवांविषयी बोलू लागली. त्या वेळी सईची भावजागृती झाली. यावरून अनौपचारिक बोलतांनाही सईचे देवाशी आंतरिक अनुसंधान कसे असते ? आणि तिच्यातील भाव आम्हाला अनुभवता आला.’

‘हे गुरुराया, सईला आपणच आरंभीपासून साधनेच्या दृष्टीने घडवले. तिचा यापुढील साधनाप्रवासही आपणच करवून घ्या. सईमधील सेवाभाव आणि तळमळ हे गुण आपल्या चरणी अर्पण होऊन तिची आध्यात्मिक प्रगती जलद होऊ दे, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे !’


सौ. इंद्राणी कुलकर्णी, हडपसर, पुणे.

१. शिकण्याची वृत्ती : सई स्वतः पुष्कळ हुशार असूनही ती नेहमी इतरांच्याकडून शिकत असते. तिची निरीक्षणक्षमताही चांगली आहे.

२. भाव : सईचा विवाह ठरल्यावर १ – २ वेळा सईशी भ्रमणभाषवर बोलणे झाले. तेव्हा तिचा परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या प्रती असलेला भाव मला जाणवला.

तिच्यामध्ये ‘सहजता आणि सर्वांच्यात मिळून मिसळून राहणे’ हे गुण आहेत.’


श्री. आशिष सावंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

प्रेमाने चुका सांगणे : कु. सई मला माझ्याकडून होणार्‍या चुका सहजतेने आणि प्रेमाने सांगते. त्यामुळे सांगितलेल्या चुका माझ्याकडून सहजतेने स्वीकारल्या जायच्या. अन्य साधकांनाही ती चुका सांगतांना प्रेमानेच सांगते.’


सौ. श्रद्धा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१. सर्वांशी जवळीक साधणे : ‘कु. सई कुलकर्णी सर्वांशी स्वतःहून बोलते, साधकांची प्रेमाने विचारपूस करते. एखादा साधक किंवा साधिका आली नाही, तर ती त्यांच्याविषयी विचारपूस करते. आश्रमातील अन्य साधकांचीही ती प्रेमाने विचारपूस करते. त्यामुळे तिची सर्वांशी जवळीक आहे.

२. सहसाधकांची काळजी घेणे : आश्रम परिसराची स्वच्छता असल्यावर शारीरिक क्षमता अल्प असलेल्या साधकांना अधिक सेवा करावी लागणार नाही, याकडे कु. सई लक्ष देते. तिच्याकडे स्वच्छतेचे नियोजन असले किंवा नसले, तरी तिचा असा भाग प्रत्येक स्वच्छतेच्या वेळी असतो.

३. नेत्वृत्व : एकदा सेवेत एक अडचण परत परत येत होती. त्या वेळी सईने स्वतःहून पुढाकार घेऊन ती अडचण सोडवून त्याविषयी आठवडाभर गांभीर्याने पाठपुरावा घेतला. तिने पुढाकार घेऊन सेवा केल्याने ती अडचण कायमस्वरूपी सुटली.

४. सेवा परिपूर्ण करणे : कु. सई तिच्याकडील लिखाणाची सेवा परिपूर्ण होण्यासाठी तळमळीने प्रयत्न करते. तिला दिलेली सेवा परिपूर्ण होण्यासाठी त्या सेवेतील विषयाचा ती सखोल अभ्यास करते. समोरच्याला विषय सहजतेने समजावा, असा विचार करून ती लिखाणाची धारिका पूर्ण करते.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक २१.११.२०२१)


कुलकर्ण्यांची लेक कात्रे घराण्याची सून होणार ।

कुलकर्ण्यांची लेक कात्रे घराण्याची सून होणार ।
सईबाई आमची गृहस्थाश्रमात प्रवेश करणार ।। १ ।।

लाडकी सई आश्रमात खेळली-बागडली ।
गुरुछायेत मोठी झाली ।। २ ।।

मनोजनामे लाभला साधक-पती ।
त्याच्या समवेत साधना करून होऊ दे उन्नती ।। ३ ।।

संसारात राहून कर साधना ।
प्रसन्न कर श्री गुरूंच्या मना ।। ४ ।।

तुझी पुण्याला केल्यावर बोळवण ।
होईल ना गं तुला आमची आठवण ।। ५ ।।

येशील ना गं लवकर रामनाथी आश्रमी ।
वाट पहात आहे गुरुमाऊली ।। ६ ।।

मनोजसह होऊ दे भवसागर पार ।
हीच प्रार्थना गुरुचरणी अपार ।। ७ ।।

सनातन परिवाराच्या वतीने चि. मनोज कात्रे आणि चि.सौ.कां. सई कुलकर्णी यांच्या भावी वैवाहिक आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा !

– कु. दीपाली होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ऑक्टोबर २०२१)