परळीच्या वैद्यनाथ मंदिरानंतर आता अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील श्री योगेश्‍वरी देवीचे मंदिर उडवून देण्याची पत्राद्वारे धमकी !

महाराष्ट्रातील असुरक्षित मंदिरे ! हिंदूंच्या श्रद्धास्थानांकडे कुणीही वक्रदृष्टीने पहाण्याचे धाडस करणार नाही, असे संघटन हिंदू कधी निर्मार करणार ? – संपादक

अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील श्री योगेश्‍वरी देवीचे मंदिर

अंबाजोगाई (जिल्हा बीड) – परळी येथील वैद्यनाथ मंदिरानंतर आता अंबाजोगाई येथील श्री योगेश्‍वरी मंदिर ‘आरडीएक्स्’ स्फोटकांद्वारे उडवून देण्याच्या धमकीचे पत्र येथील ‘देवल कमिटी’ला २७ नोव्हेंबरच्या रात्री मिळाले. या पत्रात ‘आपण मोठ्या मंदिर संस्थानचे विश्‍वस्त आहात. आतापर्यंत आपल्या मंदिराला भरमसाठ देणगी रूपाने रक्कम प्राप्त झाली आहे. मी मोठा नामी गुंड आणि ड्रग माफिया आहे. मला खासगी आणि महत्त्वाच्या कामांसाठी ५० लाख रुपयांची आवश्यकता आहे. हे पत्र प्राप्त होताच पत्त्यावर रक्कम पोच करावी अन्यथा मी माझ्याकडील ‘आरडीएक्स्’द्वारे योगेश्‍वरी मंदिर उडवीन’, असा मजकूर लिहिलेला आहे. अशा प्रकारचे पत्र महाराष्ट्रातील अनेक मंदिरांना पाठवले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

हे पत्र प्राप्त होताच ‘देवल कमिटी’चे सचिव अधिवक्ता शरद लोमटे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. संस्थानच्या तक्रारीवरून नांदेड जिल्ह्यातील आरोपी प्रभाकर नामदेव पुंड याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. या तक्रारीनंतर पोलिसांनी संपूर्ण मंदिराची पहाणी करून सुरक्षितता राखण्याची सूचना दिली आहे.

नांदेड येथून दोघेे कह्यात !

पोलिसांच्या एका पथकाने नांदेड येथे जाऊन २ आरोपींना कह्यात घेतले. त्यांतील १ व्यक्ती विमा प्रतिनिधी असून एक जण बांधकाम व्यावसायिक आहे. आतंकवादविरोधी पथकाने दोघा संशयितांची चौकशी केली असता दोघांनीही पुढील २ दिवसांत न्यायालयात आमची महत्त्वाची तारीख असून आमच्यासमवेत खोडसाळपणा केला गेल्याचे सांगितले. कुणी तरी जाणीवपूर्वक आमच्या नावाचा वापर करून पत्र लिहिले असल्याचा आरोपही संशयितांनी केला आहे. (खोडसाळपणा करण्यासाठी हिंदूंच्याच मंदिरे कशी सापडतात ? पोलिसांनी या प्रकरणाचे योग्य पद्धतीने अन्वेषण करून खर्‍या गुन्हेगारांना पकडणे आणि त्यांना कठोर शिक्षा देणे आवश्यक ! – संपादक)

प्रभु वैद्यनाथ मंदिराची एक वीटही इकडची तिकडे होणार नाही ! – धनंजय मुंडे, सामाजिक न्यायमंत्री

परळी (जिल्हा बीड) येथील वैद्यनाथ मंदिर ‘आरडीएक्स्’ स्फोटकांद्वारे उडवून देण्याची धमकी मंदिर संस्थानला प्राप्त झाल्यानंतर ‘प्रभु वैद्यनाथ मंदिराची एक वीटही इकडची तिकडे होणार नाही. त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये’, असे आवाहन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्वीटद्वारे केले आहे.