उत्तराखंड राज्यातील अनेक गावांतील भयाण शांतता आणि निर्मनुष्य स्थिती यांवर ‘सुनपट’ चित्रपटातून प्रकाशझोत !

गावातील लोक शहरांत निघून गेल्याने गावांची स्थिती भयाण होत असल्याचे कथानक

चित्रपटाचे पोस्टर

पणजी – आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सुनपट’ या हिंदी चित्रपटातून भारतातील उत्तराखंड राज्यात गावांतील लोक गाव सोडून शहरांकडे जात असल्यामुळे गावांत किती भयाण शांतता पसरत आहे, यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

याविषयी चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल रावत म्हणाले, ‘‘गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी संधी मिळत नसल्याने येथील लोक गावांतून शहरांत पलायन करत आहेत. यामुळे उत्तराखंड राज्यात अंदाजे १ सहस्र ५०० गावे निर्मनुष्य झाली असून या ठिकाणी भयाण शांतता पसरली आहे. जवळपास ४ सहस्रांहून अधिक गावांत अत्यल्प लोक रहात असून या गावांत समाज, संस्कृती आणि परंपरा काळानुसार लुप्त होण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. मी या चित्रपटाद्वारे लोकांना सांगू इच्छितो की, येथील लोक गाव सोडून गेल्याने राज्याचा कशा प्रकारे विनाश होत आहे.’’ हा चित्रपट बनवतांना रावत यांनी संपूर्ण राज्यातील विविध लोकांशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा केली, तसेच काही जणांच्या मुलाखतीही घेतल्या. या चित्रपटातील वरील समस्या एका प्रेमकहाणीद्वारे मांडण्यात आली आहे.