कुठेतरी गोम असल्याचा विचार साधिकेच्या मनात येणे त्यानंतर अंगाला खाज येणे आणि संतांनी पूर्वी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे श्लोक म्हटल्यावर काही वेळाने कपड्यांमध्ये असलेली गोम सापडणे
१. रात्री झोपतांना साधिकेला कुठेतरी गोम असल्याचा विचार मनात आल्याने आश्चर्य वाटणे आणि अंगाला खाज येऊन झोप न येणे
‘२९.३.२०१९ या दिवशी मला दिवसभर अंतर्मुख रहाता आले होते. त्यामुळे दिवसभर माझे मन सकारात्मक होते. मी सद्गुरु राजेंद्र शिंदे आणि सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांचे ‘ध्यास म्हणजे काय ?’, या विषयावर वाचलेले विचार माझ्या मनात येत होते. रात्री १ वाजता मी झोपण्यासाठी खोलीत गेले. रात्री मला झोप येत नव्हती. तेव्हा अकस्मात् ‘कुठेतरी गोम आली आहे’, असा विचार माझ्या मनात येऊ लागला. तेव्हा ‘माझ्या मनात हा विचार का आला असावा ?’, असे मला वाटले.
थोड्या वेळाने माझ्या अंगाला खाज येऊ लागली. ‘दिवसभराच्या प्रवासाने अंगाला खाज येत असेल’, असा विचार करून मी भ्रमणभाषवरील विजेरीच्या उजेडाने खणातून खोबरेल तेल घेतले आणि अंगाला लावले. तेव्हा रात्रीचे दीड वाजले होते.
२. बराच वेळ झोप न येणे आणि सनातनचे संत पू. रमेश गडकरी यांनी सूक्ष्मातून सुचवल्याप्रमाणे झोपेसाठी असलेला मंत्रजप म्हटल्यावर लगेचच झोप लागणे
मला काही केल्या झोप येत नव्हती. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘पू. गडकरीकाकांना (साधिकेचे पती पू. रमेश गडकरी यांना) संपर्क करावा का ?’; परंतु मनाने नकार दर्शवला. नंतर मी देवाशी बोलू लागले. ‘देवा (परात्पर गुरु डॉक्टर), पू. गडकरीकाकांना मी मला झोप येत नसल्याचे सांगितले, तर ते मला काय म्हणतील ?’ तेव्हा सूक्ष्मातून पू. गडकरीकाकांचा स्वर माझ्या कानांवर पडला, ‘अगं झोप येत नाही, तर देवीचा श्लोक (झोपेसाठी असलेला मंत्रजप) म्हण ना !’ तोपर्यंत मला तो श्लोक म्हणण्याचे लक्षात आले नव्हते. नंतर मी झोपेसाठी असलेला ‘या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।।’ हा देवीचा श्लोक जेमतेम ४ वेळा म्हटला आणि मला लगेच झोप लागली. तेव्हा रात्रीचे २.३० वाजले असावेत.
३. एक घंट्याने जाग आल्यावर उठतांना कपड्यातून गोम खाली पडून वळवळत असल्याचे दिसणे
रात्री ३.३० वाजता लघुशंकेला जाण्यासाठी मला जाग आली. मी उठले आणि माझे कपडे झटकले. तेव्हा काहीतरी जड असे भूमीवर पडून वळवळत असलेले मला दिसले. ‘दिवा लावावा कि नको ?’, या विचाराच्या संभ्रमातच मी दिवा लावला. तेव्हा एक फार मोठी गोम मला माझ्या कपड्यामधून खाली पडलेली दिसली आणि माझी झोपच उडाली. खोलीतील साधिकाही जाग्या झाल्या. नंतर मी ती गोम मारली.’
– सौ. नीला रमेश गडकरी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३०.३.२०१९)
|