एस्.टी.च्या संपातून आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांची माघार !

डावीकडून गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत

मुंबई – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने आझाद मैदानातील आंदोलन तात्पुरते स्थगित करत आहोत, असे आमदार सदाभाऊ खोत यांनी २५ नोव्हेंबर या दिवशीच्या पत्रकार परिषदेत घोषित केले आहे.

सदाभाऊ खोत म्हणाले की, महामंडळाच्या कर्मचार्‍यांचे तुटपुंज्या वेतनात भागत नाही. त्यामुळे त्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिला होता. शेवटी १६ दिवसांनंतर सरकारला जाग आली. हे आंदोलन कर्मचार्‍यांनी उभे केले होते, आता त्यांनी निर्णय घ्यावा की, हे आंदोलन पुढे किती दिवस चालू ठेवायचे आहे ? आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत.

गोपीचंद पडळकर म्हणाले, ‘‘विलीनीकरणाची भूमिका आमची आहे; परंतु आता मार्ग काढला पाहिजे. न्यायालयात विलीनीकरणाचे सूत्र प्रलंबित आहे; म्हणून सारासार विचार केला. सरकारला नमते घ्यावे लागले. कर्मचार्‍यांवर अन्याय होणार नाही, असे वचन सरकारने दिले. आमचा कर्मचार्‍यांवर दबाव नाही. तेही आम्हाला बांधील नाहीत.’’

कामावर उपस्थित न रहाणार्‍यांवर कडक कारवाई करणार ! – अनिल परब, परिवहनमंत्री

अनिल परब, परिवहनमंत्री

मुंबई – २६ नोव्हेंबर या दिवशी कामावर उपस्थित न रहाणार्‍या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली आहे. ‘सरकारने वेतनवाढीचा निर्णय दिला आहे. ज्या कामगारांना हा निर्णय संमत असेल, ते कामगार कामावर येतील. ज्यांना संमत नसेल, त्यांना कडक कारवाईला सामोरे जावे लागेल.

कामगारांनी कोणाचे नेतृत्व स्वीकारावे ?  हा त्यांचा प्रश्न आहे. तुटेपर्यंत ताणू नये. एकदा तुटले, तर जोडणार नाही’, असेही   परब यांनी सांगितले.