‘आध्यात्मिक त्रास असलेल्या काही साधकांचे त्रास नामजपादी उपाय करूनही लवकर अल्प होत नाहीत किंवा काही साधक पुष्कळ सेवा करतात, तरीही त्यांची आध्यात्मिक प्रगती होत नाही. अशा साधकांच्या मनात काही वेळा ‘गुरूंचे (परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे) माझ्याकडे लक्ष नाही, त्यांची इतर साधकांवर प्रीती आहे; पण माझ्यावर नाही’, अशासारखे नकारात्मक विचार येतात. अशा साधकांनी पुढील दृष्टीकोन लक्षात घ्यावेत.
१. गेल्या काही वर्षांपासून स्थुलातील आणि सूक्ष्मातील आपत्काळ चालू असून आता लवकरच स्थुलातील महाभीषण आपत्काळ चालू होणार आहे. आतापर्यंत या आपत्काळात परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपाकवचामुळे साधकांच्या जिवाचे रक्षण झाले आहे आणि पुढेही होणार आहे. हीच परात्पर गुरु डॉक्टरांची साधकांवरील केवढी मोठी प्रीती आहे ! याविषयी साधकांच्या मनात परात्पर गुरु डॉक्टरांविषयी सतत कृतज्ञताभाव असला पाहिजे.
२. ‘नाना नाती दावियली ती ।
त्या सर्वावरी तव सम प्रीती ।।’,
या प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनपंक्तीनुसार ‘परात्पर गुरु डॉक्टरांची प्रीती सर्व साधकांवर सारखीच आहे.’
३. ‘मनात कोणतीही अपेक्षा न ठेवता साधना करणे’, ही खरी साधना आहे.
४. आध्यात्मिक त्रास लवकर अल्प न होणार्या साधकांनी किंवा पुष्कळ सेवा करूनही आध्यात्मिक प्रगती न होणार्या साधकांनी ‘असे का घडते ?’, याचे चिंतन करावे, म्हणजे त्यांना यामागील कारणे लक्षात येऊन योग्य उपाययोजना काढता येईल. आवश्यकता असल्यास त्यांना यासंदर्भात दायित्व असलेले साधक किंवा संत यांना विचारता येईल.’
– (पू.) श्री. संदीप आळशी (१८.११.२०२१)