मिरज, २० नोव्हेंबर (वार्ता.) – विशालसिंग राजपूत मित्रमंडळ आणि शिवसेना शाखा क्रमांक १ च्या वतीने दीपावलीनिमित्त घेतलेल्या किल्ला स्पर्धांचे पारितोषिक वितरण नुकतेच पार पडले. यात सांगलीवाडी येथील शिवभारत मित्रमंडळ (अटक किल्ला) यांना प्रथम क्रमांक, बामनोळी येथील शिवराज कदम (जंजिरा पद्मदुर्ग) आणि बामनोळी येथील सिद्धीविनायक गणेशोत्सव मंडळ (किल्ला कुलाबा) यांना द्वितीय, तर मिरज येथील रणझुंझार गणेशोत्सव मंडळ, विजय मराठा चौक मंडळ अन् छत्रपती क्रीडा मंडळ यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. सहभागी झालेल्यांना स्मृतीचिन्ह दिले.
शिवसेनेचे कुबेरसिंग राजपूत म्हणाले, ‘‘सध्याचे युग हे भ्रमणभाषचे युग झाले असून लहान मुलांना किल्ल्याकडे वळवण्यासाठी, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास रुजवण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे मार्गदर्शक आणि शिवसेना संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील, शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख आनंदराव पवार आणि संजय विभूते असून यापुढे ही स्पर्धा मोठ्या प्रमाणात घेण्यात येणार आहे.’’ या वेळी शिवसेना मिरज तालुकाप्रमुख विशालसिंग राजपूत, शिवसेना मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख तानाजी सातपुते, बबन कोळी, विजय शिंदे, अमितसिंग राजपूत, महेश लोंढे यांसह अन्य उपस्थित होते.