भारतातील हस्त कारागिरांच्या कलेला नष्ट करण्यासाठी कारागिरांचे अंगठे कापून षड्यंत्रकारी इंग्रजांनी दाखवलेले भयानक क्रौर्य !

‘राणी एलिझाबेथ (प्रथम) हिच्या शासन काळात वर्ष १६०० मध्ये एक आस्थापन (कंपनी) निर्माण करण्यात आले होते. त्याचे पूर्ण नाव ‘द गव्हर्नर अँड कंपनी ऑन मर्चेन्ट्स ऑन लंडन, ट्रेनिंग विद द ईस्ट इंडीज’ संक्षिप्त रूपात ‘ईस्ट इंडिया कंपनी’ असे होते. डच, पोर्तुगाल, फ्रान्स या सर्व देशांच्या व्यापारी संस्थांना टक्कर देत झुंजत चलाख ब्रिटिशांची ही कंपनी हळूहळू मोठ्या क्षेत्रात आणि पुन्हा मोठमोठ्या नवीन प्रदेशाच्या व्यापाराची अन् प्रशासनाची स्वामिनी बनली होती.

वर्ष १६८२ पर्यंत या कंपनीच्या नफ्याची स्थिती अशी होती की, एका समभागावर (‘शेअर’वर) ५० टक्के लाभांश आणि १०० टक्के सानुग्रह अनुदान (बोनस) वाटले जात होते. वर्ष १६८३ मध्ये त्याचा लाभ १०० पाऊंड प्रति समभागापेक्षा जास्त ३६० पाऊंड प्रति समभाग घोषित केला होता. हा सर्व लाभ आणि भांडवल यांची उत्तरोत्तर वाढ जास्तीत जास्त होतच राहिली.

इंग्लंडकडून एका भयावह आर्थिक षड्यंत्राचा प्रारंभ

ईस्ट इंडिया कंपनी निर्माण झाली होती, ती मुख्यत: मसाल्याच्या व्यापार्‍याच्या दृष्टीने; पण त्यांनी पाहिले की, अन्य सामग्रीची निर्यात केली, तर आणखी लाभ कमवू शकतो. तेव्हापासून त्यांनी भारतातून कापड एम्ब्रॉयडरीचे सामान आणि अन्य सज्ज माल खरेदी करून इंग्लंडमध्ये विकणे चालू केले. कंपनीचा लाभ तर वाढला; पण त्याच वेळी ब्रिटनच्या सरकारने पाहिले की, इंग्लंडचे धन खेचून भारताकडे जात आहे. खरी स्थिती ही आहे की, १७ व्या शताब्दीमध्ये मागास आणि पराधीन भारत विश्वाच्या सर्वाधिक श्रीमंत देशांमध्ये गणला जात होता; परंतु आपल्याला तर शिकवले गेले आहे की, भारत नेहमी गरिबांचा, साधूंचा आणि सापांचा देश आहे.

इंग्लंडच्या शासकांनी जेव्हा पाहिले की, भारतात बनलेल्या वस्तूंसाठी विशेषत: कपड्यांसाठी लोक वेडे होतात आणि त्यामुळे ब्रिटीश कारखान्यांच्या व्यापारावर वाईट प्रभाव पडत आहे. त्यामुळे त्यांनी भारतीय सामुग्रीच्या आयातीवर जास्त कर आकारले आणि त्या सामुग्रीला इंग्लंडमध्ये येण्यापासून थांबवले. दुसर्‍या बाजूने ईस्ट इंडिया कंपनीला आदेश दिला की, त्यांनी भारतात सिद्ध केलेला माल खरेदी करू नये, त्याऐवजी कच्चा माल खरेदी करून इंग्लंडमध्ये पाठवावा.

जवळजवळ १०० वर्षांपर्यंत प्रयत्नपूर्वक ब्रिटीश साम्राज्यवाद्यांनी अशा आर्थिक नीतीचा विकास केला की, ज्यामुळे भारत हा इंग्लंडने सिद्ध केलेल्या मालाचा विक्री बाजार बनायला हवा. १८०० शतकाच्या शेवटी ईस्ट इंडिया कंपनीचे सर्व व्यापारी अधिकार इंग्लंडच्या सरकारजवळ गेले आणि तेव्हापासून एका भयावह आर्थिक षड्यंत्राचा प्रारंभ झाला.

इंग्रजांनी केलेले भयानक कुकृत्य

ढाका आणि मुर्शिदाबाद येथील विणकरांच्या हाताचे अंगठे इंग्रजांनी कापून टाकले, जेणेकरून ते अत्यंत तलम (सुपरफाईन) कापडच विणू शकणार नाहीत. देशवासियांना हे ठाऊक आहे का ? ज्या प्रकारे देशातील विणकर हाताने अत्यंत तलम कापड सिद्ध करत असत, तसे कापड इंग्लंडमधील गिरण्या विणू शकत नव्हत्या. त्यांनी आपल्या गिरण्या चालवण्यासाठी भारतातील श्रमिकांचे अंगठे कापले होते.

(संदर्भ : पाक्षिक ‘पाथेय कण’, १ जुलै २०१४)