श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी श्रीसत्‌शक्ति, श्रीचित्‌‌शक्ति आणि आनंद यांचे केलेले विश्लेषण !

श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

‘सत्-चित्-आनंद ही परमात्मा परब्रह्माची स्वरूप लक्षणे आहेत. जो सत्घन, चित्घन आणि आनंदघन आहे, अशा त्या परब्रह्म परमात्मा शक्तीला आमचा नमस्कार असो. या तिन्हींपैकी एकाला जरी हटवले, तरी त्याच्या स्वरूपात न्यूनता येऊ शकते. सृष्टीचा रचनाकार, पालनकर्ता आणि संहारकर्ता असा परमात्मा सत्चिदानंद स्वरूप आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे एकमात्र कारण म्हणजे परमात्मा परब्रह्मच आहे. या परब्रह्म परमात्म्यानेच प्रकृतीचे चालणारे सर्व नियम घालून दिलेले आहेत.

आनंदस्वरूप भगवंताच्या दोन शक्ती आहेत, त्या म्हणजे श्रीसत्‌शक्ति आणि श्रीचित्‌‌शक्ति. सत् म्हणजे शाश्वत, नित्य आणि चित् म्हणजे ज्ञान. भगवंत नित्यही आहे आणि ज्ञानीही आहे.

१. श्रीसत्‌शक्ति

सत् म्हणजे शाश्वत, नित्य. भगवंत नित्य आहे. तो सत्य आहे. श्रीसत्‌शक्ति शाश्वत आणि त्रिकालाबाधित सत्याशी संबंधित आहे. ही शक्ती अपरिवर्तनीय आहे, तसेच या शक्तीला मूळ, मध्य आणि अंतही नाही. ही शक्ती भ्रम आणि माया यांच्या पलीकडची आहे. ती तत्त्वनिष्ठ आहे. सत्याला कधीच मरण नसते. श्रीसत्‌शक्ति अजरामर आहे. आम्ही नश्वर आहोत; कारण पंचतत्त्वांनी बनलेले आमचे शरीर एक दिवस पंचतत्त्वांत विलीन होते; पण श्रीसत्‌शक्तिसहित असलेला परमात्मा अखंड आहे. तो सर्वांमध्ये व्याप्त आहे. तो सर्वत्र भरून राहिला आहे.

२. श्रीचित्‌‌शक्ति

चित् म्हणजे प्रकाश. परमात्म्याचे दुसरे नाव प्रकाश आहे. प्रकाश असेल, तरच परमात्म्याचे स्वरूप स्पष्ट होते. परमात्मा स्वतःच ज्ञानघन आहे. श्रीचित्‌‌शक्ति म्हणजे ज्ञानशक्ती. श्रीचित्‌‌शक्तिमुळे आपल्याला ब्रह्मांडाचे ज्ञान होते, तसेच प्रत्येक कृतीमागील कार्यकारणभाव कळतो. भगवंत स्वतः ज्ञानमय आहे. ज्ञानाविना पूर्ण विश्वाला कुणीच जाणू शकत नाही. देवाला जाणले, तर आपण त्याची अनुभूती घेऊ शकतो. देवाला जाणणारी चेतनामय प्रकाशमय शक्ती म्हणजेच चित्शक्ति.

३. आनंद

स्वतः परब्रह्म परमात्मा आनंदस्वरूप आहे. तो स्वतःच शिवस्वरूप आहे. सूर्याचे तेज आणि चंद्रातील चैतन्य त्याच्यामुळे आहे, तसेच मंदिरातील सुगंधही त्याच्यामुळे आहे.

सत्य उलट केले की, असत्य होते. प्रकाशाच्या उलट अंधार असतो; परंतु आनंदाला कुणीच पालटू शकत नाही. तो स्थिर आहे. निरानंद, ब्रह्मानंद, परमानंद असे काहीही म्हटले, तरी यातील आनंद आपण पालटू शकत नाही.’

– श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (२९.४.२०२०)