मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांनी केलेल्या कानउघाडणीनंतर ‘दैनिक लोकपत्र’च्या कार्यकारी संपादकांकडून जाहीर क्षमापत्र प्रसिद्ध

‘दैनिक लोकपत्र’मधून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी अश्‍लाघ्य लिखाण केल्याचे प्रकरण

(डावीकडे) मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे (उजवीकडे) ‘दैनिक लोकपत्र’चे कार्यकारी संपादक रवींद्र तहकीक यांची कानउघाडणी करताना

संभाजीनगर –  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाची बातमी प्रसिद्ध करतांना ‘दैनिक लोकपत्र’मधून पुरंदरे यांच्याविषयी अतिशय अश्‍लाघ्य आणि बाबासाहेबांचा एकेरी उल्लेख करत लिखाण करण्यात आले होते. या बातमीमध्ये त्यांच्या वैयक्तिक जीवनातील प्रसंगांचा उल्लेख करत त्यांच्या नातेवाईकांचीही अपकीर्ती करण्यात आली होती. ही बातमी सामाजिक माध्यमांवर प्रसिद्ध होताच समस्त शिवप्रेमींनी याचा निषेध केला. येथील मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांनी ‘दैनिक लोकपत्र’चे कार्यकारी संपादक रवींद्र तहकीक यांची पोलिसांसमोर प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची कानउघाडणी केली. यानंतर ‘लोकपत्र’कडून १६ नोव्हेंबर या दिवशी जाहीर क्षमापत्र प्रसिद्ध करण्यात आले. (अश्‍लाघ्य भाषेत वार्तांकन करून जात्यंध मानसिकतेने विकृत बातमी प्रसिद्ध करणारे दैनिक ‘लोकपत्र’ म्हणजे पीत पत्रकारितेचे उत्तम उदाहरण होय ! याविषयी तत्परतेने कृती करून क्षमापत्र द्यायला भाग पाडणारे  मनसेचे श्री. सुहास दशरथे यांचे अभिनंदन !  संपादक)