अमरावती येथील हिंसाचारात रझा अकादमीसमवेत भाजप आणि युवासेना यांतील लोकांचाही हात !

पोलिसांनी गृहविभागाला पाठवलेल्या अहवालात उल्लेख !

अमरावती येथील दंगल

मुंबई – अमरावती येथे झालेल्या दंगलीमागे रझा अकादमीसह राजकीय पक्षांचाही, म्हणजे; भाजप, तसेच युवा सेना यांचा हात असल्याचा महाराष्ट्र पोलिसांना संशय आहे. यामुळे केवळ काही मुसलमान संघटनांकडूनच नाही, तर राजकीय पक्षांनीही अमरावतीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग केला होता, असा अहवाल पोलिसांकडून नुकताच गृहविभागाला सादर करण्यात आला आहे. ‘या दंगली भडकावण्यासाठी सामाजिक माध्यमांचा वापर करण्यात आला आहे’, असाही उल्लेख या अहवालात आहे.

अमरावती येथे १९८ जणांना अटक !

अमरावती येथील हिंसाचारानंतर पोलिसांनी ३५ गुन्हे नोंद केले आहेत. आतापर्यंत १९८ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी २४ जण भाजपचे असून त्यातील ३ जण माजी मंत्री आहेत.

नांदेड येथे ६४ जणांना अटक !

नांदेड येथे झालेल्या हिंसेनंतर नांदेडमध्ये ८४ गुन्हे नोंद करण्यात आले असून आतापर्यंत ६४ जणांना अटक करण्यात आली आहे.

दंगलीविषयी पोलिसांच्या अहवालातील माहिती अशी…

१. २९ ऑक्टोबर या दिवशी ‘पी.एफ्.आय’ संघटनेचा सदस्य त्रिपुरातील कथित घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात.

२. १ नोव्हेंबर या दिवशी ‘जय संविधान संघटने’ने अमरावती येथील जिल्हाधिकार्‍यांकडे निषेध नोंदवला.

३. ६ नोव्हेंबर या दिवशी सरताज नावाच्या व्यक्तीचा एक चिथावणीखोर ध्वनीमुद्रित संदेश सामाजिक माध्यमांवरून प्रसारित झाला आहे.

४. १२ नोव्हेंबर या दिवशी रझा अकादमीकडून बंद पुकारण्याचे आवाहन करण्यात आले. सामाजिक माध्यमांवर अनेक संदेश पाठवले.

५. १२ नोव्हेंबर या दिवशी अमरावती येथे हिंसाचार घडला. या घटनांचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्यात आले.

६. १३ नोव्हेंबर या दिवशी अमरावती पुन्हा ‘बंद’ होता. यामागे भाजप, बजरंग दल आणि युवा सेना यांचा हात असल्याची सूत्रांची माहिती आहे.