मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) येथे मोहनदास गांधी यांच्या पुतळ्याची अनावरणानंतर काही घंट्यांतच तोडफोड

मोहनदास गांधी यांच्या पुतळ्याची झालेली तोडफोड

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) – ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी भारताच्या स्वातंत्र्यांच्या ७५ वर्षांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात भारताचे महावाणिज्य दूत आणि ऑस्ट्रेलियाचे नेते यांच्या समवेत रॉविल येथील ‘ऑस्ट्रेलियन इंडियन कम्युनिटी सेंटर’मध्ये मोहनदास गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्यानंतर काही घंट्यांनतर या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. हा पुतळा भारत सरकारकडून भेट देण्यात आला होता.

(ही छायाचित्रे छापण्यामागे लोकांच्या भावना दुखावण्याचा उद्देश नसून केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. –  संपादक)

पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ते म्हणाले की, अनादराची ही पातळी पहाणे लज्जास्पद आणि अत्यंत निराशाजनक आहे. या देशातील सांस्कृतिक स्मारकांवर होणारी आक्रमणे सहन केली जाणार नाहीत. यास जे कुणी उत्तरदायी असतील, त्यांनी ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाचा मोठा अपमान केला आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे.

‘फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन ऑफ व्हिक्टोरिया’चे अध्यक्ष सूर्यप्रकाश सोनी म्हणाले की, या प्रकरामुळे भारतीय समुदायाला फार धक्का बसला आहे, तसेच दु:खही झाले आहे. रॉविल सेंटर हे व्हिक्टोरिया राज्यातील पहिले भारतीय समुदाय केंद्र असून ३० वर्षांच्या प्रयत्नानंतर त्याची स्थापना करण्यात आली आहे.