यजमान रवींद्र देशपांडे यांचे निधन झाल्यावर श्री गुरुकृपेने स्थिर राहून परिस्थिती स्वीकारणार्‍या यवतमाळ येथील श्रीमती धनश्री देशपांडे !

‘२०.५.२०२१ या दिवशी यवतमाळ येथील माझे जावई रवींद्र देशपांडे यांचे कोरोनामुळे निधन झाले. तेव्हापासून त्यांचे मृत्यूत्तर विधी होईपर्यंत माझ्या मुलीने (धनश्रीने) प्रत्येक प्रसंगात पदोपदी श्री गुरूंची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) कृपा अनुभवली. त्या संपूर्ण प्रसंगात धनश्री आणि तिची दोन्ही मुले कु. सायली (वय १२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) आणि कु. श्रीनिवास (वय १० वर्षे, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांना केवळ श्री गुरूंच्या कृपेनेच स्थिर रहाता आले. या कालावधीत माझी मुलगी श्रीमती धनश्री हिच्याविषयी मला जाणवलेली सूत्रे कृतज्ञतापुष्पांच्या रूपांत मी श्री गुरूंच्या चरणी अर्पण करत आहे.

श्रीमती धनश्री देशपांडे

१. यजमानांचे निधन आणि नंतरची परिस्थिती स्थिर राहून स्वीकारण्याचा प्रयत्न करणारी धनश्री !

धनश्रीच्या जीवनात पतीनिधनाचा प्रसंग अतिशय कठीण होता; परंतु धनश्रीने धिराने परिस्थिती स्वीकारली. तिच्या यजमानांचे निधन झाल्याचे तिने रुग्णालयातूनच मला भ्रमणभाषवरून सांगितले. तेव्हा मला ती भावनाविवश झाल्याचे जाणवले नाही. त्यानंतर ‘कसे घडले ?’, हे सांगतांना तिला हुंदका आला; पण त्याही स्थितीत ती मला म्हणाली, ‘‘श्री गुरु माझ्या समवेत आहेत. तू माझी काळजी करू नकोस. हे माझे प्रारब्ध आहे. ते मला भोगायलाच हवे. तू तुझ्या प्रकृतीची काळजी घे.’’

२. ‘यजमानांचे निधन झाल्याचे कुणाला कळवायला हवे ?’, हे आईला सांगून रुग्णालयातून स्वतःच दुचाकी चालवत घरी जाणारी धीरोदात्त धनश्री !

त्यानंतर ‘इकडच्या अन्य कुणाला संपर्क करून कळवायचे ?’, हे तिने मला त्याच वेळी सांगितले. तिने अतिशय अल्प वेळेत मला परिस्थितीची जाणीव करून दिली आणि ती पुढील सिद्धतेला लागली. अशाही स्थितीत ती स्वतः दुचाकी चालवत रुग्णालयातून घरी गेली. यातून तिच्यातील ‘समयसूचकता, इतरांचा विचार करणे, वर्तमानकाळात रहाणे आणि स्थिरता’, हे गुण माझ्या लक्षात आले.

श्रीमती मेघना वाघमारे

३. ‘धनश्रीची श्री गुरूंप्रतीची दृढ श्रद्धा तिला कठीण प्रसंगातून तारून नेत आहे’, असे जाणवणे

तिच्या कुटुंबियांशी भ्रमणभाषवरून बोलतांना ‘धनश्री आणि तिचे कुटुंबीय यांच्याभोवती श्री गुरूंचे भक्कम कवच आहे’, असे मला जाणवले. ‘तिची श्री गुरूंप्रती दृढ श्रद्धाच तिला यातून तारून नेत आहे’, याची मला जाणीव झाली. दळणवळण बंदीमुळे मी स्थुलातून तिच्या जवळ पोचू शकत नव्हते; मात्र ‘श्री गुरु सूक्ष्मातून तिच्या समवेत सतत आहेत’, या जाणिवेमुळे माझ्या मनाला भक्कम आधार वाटला. ‘आपत्काळातील कठीण प्रसंगी श्री गुरूंप्रतीची श्रद्धाच आपल्याला तारून नेणार आहे’, हे भाववृद्धी सत्संगात सांगितलेले सूत्र श्री गुरूंच्या कृपेने मला अनुभवायला आले.

४. ‘काहीतरी विपरीत घडणार आहे’, असे लक्षात आल्यावर धनश्रीने श्री गुरूंना कळवळून प्रार्थना करणे आणि त्यामुळे तिला परिस्थिती स्वीकारण्याचे बळ मिळणे

नंतर तिने मला सांगितले, ‘‘त्या दिवशी सकाळी ६ वाजताच चहा देण्यासाठी रुग्णालयात जाण्याचा विचार माझ्या मनात आला. मी यजमानांजवळ असलेल्या नातेवाईकांना संपर्क केला. त्याच वेळी माझ्या मनाला ‘काही तरी विपरीत घडणार आहे’, याची चाहूल लागली होती. त्यामुळे रुग्णालयात चहा घेऊन निघतांनाच मी श्री गुरूंना ‘मी रुग्णालयात जात आहे. तुम्ही सतत माझ्या समवेत रहा. प्रत्येक क्षणी मला वर्तमानकाळात रहाता येऊ दे आणि प्रत्येक क्षण अन् प्रत्येक परिस्थिती मला साधना म्हणून स्वीकारण्याचे बळ द्या’, अशी कळवळून प्रार्थना केली. ‘ते सतत माझ्या समवेत आहेत’, अशी जाणीवही मला होत होती.’’

पतीनिधनाला ३ मास पूर्ण झाल्यानंतर ती रामनाथी आश्रमात आली. त्या वेळीही ती सावरलेली आणि पुष्कळच स्थिर होती.’

– श्रीमती मेघना वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.५.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक