१. कोरोना महामारीमुळे भावी आपत्काळाच्या दृष्टीने उपयुक्त असलेले सनातनच्या ग्रंथांतील ज्ञान समाजापर्यंत पोचवण्यात मर्यादा येणे
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अनेक वर्षांपूर्वी ग्रंथलेखन चालू केले. आपत्काळाचा सामना करण्यासाठी आतापर्यंत सनातन संस्थेच्या वतीने ‘बिंदूदाबन, प्रथमोपचार आणि वनौषधी रोपण’ इत्यादी विषयांवर २० हून अधिक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. काही मासांपूर्वी ‘आपत्काळासाठी सिद्धता कशी करायची ?’, या विषयावर माहिती देणारे २ ग्रंथ प्रकाशित झाले. त्यांचे वितरण समाजात मर्यादित प्रमाणात झाले. कोरोना महामारीमुळे ग्रंथप्रदर्शने लावणे पूर्णतः थांबले आहे. अशा परिस्थितीत ‘आपत्काळाच्या दृष्टीने उपयुक्त ज्ञान सर्व संप्रदायांतील साधक आणि व्यष्टी साधना करणारे साधक यांच्यापर्यंत कसे पोचणार ?’, अशी रुखरुख गेले काही मास माझ्या मनात होती.
२. ‘सर्व्हायव्हल गाइड’ हे ‘ॲप’ उपलब्ध झाल्याने ‘आपत्काळासाठी करावयाची सिद्धता’ हा विषय सर्वांपर्यंत सहजतेने पोचू शकतो’, याची निश्चिती होणे
अशा वेळी गुरुदेवांच्या प्रेरणेमुळे ‘सोशल मिडिया’ची सेवा करणार्या साधकांनी एक सर्वांगसुंदर असे ‘सर्व्हायव्हल गाइड’ हे ‘ॲप’ सिद्ध केले. त्यामुळे आता अंतर आणि भाषा यांचे बंधन संपले आहे. हे ‘ॲप’ ‘मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तमिळ, मल्याळम्, तेलुगु आणि नेपाळी’, या ९ भाषांमध्ये उपलब्ध आहे. ज्यांच्याकडे ‘अँड्रॉइड’ भ्रमणभाष आहे, ते हे ‘ॲप’ सहजतेने ‘डाउनलोड’ करून त्याचा अभ्यास करू शकतात. या ‘ॲप’मध्ये ‘आपत्काळाविषयी भविष्यवाणी’, ‘आपत्काळाचे स्वरूप’, ‘आपत्काळात लागणार्या उपयुक्त वस्तू’, ‘साधनेचे महत्त्व’ आदी विषयांवर उपयुक्त माहिती दिली आहे. या ‘ॲप’चा आधार घेऊन ते स्वतःचे आणि कुटुंबाचे रक्षण करू शकतात.
घोर आपत्काळ, तसेच युद्धकाळ चालू होण्यापूर्वी हे ‘ॲप’ उपलब्ध झाल्याने मला लागलेली रुखरुख नाहीशी झाली आणि माझी गुरुचरणी अपार कृतज्ञता व्यक्त झाली. ‘गुरुदेव काळाला अनुसरून आम्हा साधकांसाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी निर्माण करून त्यांचा पुरवठाही करत आहेत’, याची मला अनुभूती आली.
‘आम्हाला हे ‘ॲप’ भारत, तसेच विदेश येथील सर्व साधकांपर्यंत पोचवण्याची प्रेरणा मिळून तशी कृती करवून घ्या. आपली कृपादृष्टी आम्हा साधकांवर अशीच निरंतर राहू द्या’, अशी गुरुचरणी शरणागतभावाने प्रार्थना !’
– श्री. श्रीराम काणे, फोंडा, गोवा. (६.६.२०२१)