|
मुंबई – भयपट (हॉरर मूव्ही) पहाणार्यांना त्याचा स्वतःवर किती प्रमाणात परिणाम होतो, हे लक्षात येत नाही. जसे चांगल्याकडे चांगले आणि वाईटाकडे वाईट आकर्षित होते, तसे पुष्कळ प्रमाणात नकारात्मकता असलेल्या भयपटाचा ‘सेट’, त्यात भूतबाधा झालेल्याची भूमिका करणारा अभिनेता किंवा असा भयपट पहाणारे प्रेक्षक यांकडे मोठ्या प्रमाणात नकारात्मक शक्ती आकर्षित होते. परिणामी संहिता लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता यांच्या माध्यमातून अधिकाधिक नकारात्मकता प्रक्षेपित करणार्या चित्रपटाची निर्मिती होते आणि असे चित्रपट समाजात नकारात्मकता पसरवतात, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शॉन क्लार्क यांनी केले. ते इस्तंबुल, तुर्कस्तान येथे आयोजित केलेल्या ‘सिक्स्थ इंटरनॅशनल इंटरडिसप्लिनरी कॉन्फरन्स ऑन मेमरी अँड द पास्ट’ या परिषदेत बोलत होते. त्यांनी ‘भयपट स्वतःवर आध्यात्मिक स्तरावर परिणाम करतो का ?’, हा शोधनिबंध ‘ऑनलाईन’ सादर केला. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक, तर श्री. शॉन क्लार्क सहलेखक आहेत.
श्री. क्लार्क यांनी ‘प्रभावळ आणि ऊर्जा मापक यंत्र’ (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)), बायोवेल (Biowell) आणि सूक्ष्म परीक्षण यांच्या माध्यमातून भयपटांचे होणारे सूक्ष्म परिणाम अभ्यासण्यासाठी केलेल्या संशोधनातील निष्कर्ष सादर केले.
‘यू.ए.एस्.’ चाचणी
या चाचणीच्या अंतर्गत प्रयोगशाळेतील स्टुडिओमध्ये भयपट पाहिलेल्या १७ व्यक्तींच्या नकारात्मकतेत सरासरी १०७ टक्के वाढ झाली. काहींमध्ये ती वाढ ३७५ टक्के इतकी होती. प्रयोगापूर्वी ज्या व्यक्तींमध्ये सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ (ऑरा) होती, त्यात ६० टक्के घट आढळली, तर काहींची सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ समूळ नष्ट झालेली आढळली.
‘बायोवेल’द्वारे केलेला अभ्यास
चित्रपट पहाण्यापूर्वी एका व्यक्तीच्या केलेल्या चाचणीत तिची सर्व षटचक्रे सर्वसाधारण रेषेत होती. त्यांचा आकारही पुष्कळ मोठा होता. याचा अर्थ ती व्यक्ती स्थिर आणि ऊर्जावान होती. चित्रपट पाहिल्यानंतर मात्र तिची चक्रे अव्यवस्थित दिसली, त्यांचा आकारही लहान झाला होता, म्हणजे ती व्यक्ती अस्थिर आणि तिची सर्वसाधारण क्षमता न्यून झालेली दिसली.
निष्कर्ष
या संशोधनाद्वारे हेच जाणवते की, ‘भयपट’ पाहिल्याने केवळ भावनात्मक परिणाम होत नसून सूक्ष्म स्पंदनांच्या स्तरावरील होणार्या भयंकर परिणामांची आपल्याला जाणीवही नसते. सूर्यास्तानंतर अनिष्ट शक्तींचा प्रभाव वातावरणावर अधिक असतो. त्यामुळे त्या वेळी असे चित्रपट पहाणे अधिक धोकादायक असते.