मराठी साहित्य संमेलनाच्या गीतात केला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान होणे, राज्याला लज्जास्पद ! – संपादक 

स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर

नाशिक – येथे होणार्‍या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या गीतामधून नाशिकचे भूमीपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा नामोल्लेख टाळल्यामुळे राज्यभरात संतप्त पडसाद उमटले होते. आता संमेलन गीताच्या ओळींत पालट करून ‘स्वातंत्र्यसूर्य सावरकर’ असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.

संमेलनाच्या प्रचार आणि प्रसार यांसाठी संमेलन गीताची निर्मिती करण्यात आली आहे. मिलिंद गांधी यांनी लिहिलेल्या आणि संजय गिते यांनी स्वरबद्ध केलेल्या या गीतात ‘स्वातंत्र्याचे सूर्य उगवले अनंत क्षितिजावरती’ अशी ओळ होती. यातील ‘स्वातंत्र्याचे सूर्य म्हणजे सावरकर’, असे संमेलन भरवणार्‍यांचे म्हणणे होते; मात्र ‘इतर साहित्यिकांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख असतांना सावरकरांचे नाव का नाही ?’, असा प्रश्न सावरकरप्रेमींनी व्यक्त केला होता.

मनसे आणि ‘अभिनव भारत मंदिरा’सह भगूर येथील सावरकरप्रेमींनी सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करत याविषयी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला होता. ११ नोव्हेंबर या दिवशी संमेलन गीताच्या ओळीतील ‘स्वातंत्र्याचे सूर्य’ हा शब्द पालटून ‘स्वातंत्र्यसूर्य सावरकर’, असे नाव घालून नव्याने त्या गीताच्या ऑडिओ आणि व्हिडिओ धारिका सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित करण्यात आल्या आहेत.