गोव्यातील ५२ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धेसाठी १५ चित्रपटांची सूची प्रसिद्ध

सूचीमध्ये ‘गोदावरी’, ‘मी वसंतराव’ आणि ‘सेमखोर’ या ३ भारतीय चित्रपटांचा समावेश

पणजी, ११ नोव्हेंबर (वार्ता.) – गोव्यात २० ते २८ नोव्हेंबर या कालावधीत होणार्‍या ५२ व्या ‘आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ (‘आंचिम’मध्ये) आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धेसाठी १५ चित्रपटांची सूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. या सूचीमध्ये ‘गोदावरी’, ‘मी वसंतराव’ आणि ‘सेमखोर’ या भारतीय चित्रपटांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धेसाठी वैशिष्ट्यपूर्ण कथेवर आधारित जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट निवडले जातात. हे चित्रपट पुढे ‘सुवर्ण मयुर’ आणि इतर पुरस्कारांच्या स्पर्धेत समाविष्ट केले जातात.

कोकणी प्रिमियर विभागासाठी ४ चित्रपट असणे बंधनकारक असल्याची अट त्वरित रहित करा ! – ‘गोवा फॉरवर्ड’

भाजपला कोकणी चित्रपट संपवायचे आहेत, असा आरोप ‘गोवा फॉरवर्ड’चे महासचिव दुर्गादास कामत यांनी केला. ते पुढे म्हणाले, ‘‘आंचिम’मध्ये गोव्यातील कोकणी प्रिमियर विभागासाठी ४ चित्रपट असणे बंधनकारक असल्याची अट आहे. कोरोना महामारीमुळे राज्यात केवळ दोनच कोकणी चित्रपट सिद्ध झालेले आहेत. ‘आंचिम’चे आयोजक असलेली ‘गोवा मनोरंजन सोसायटी’ आता कोकणी प्रिमियर विभागासाठी ४ चित्रपट असणे बंधनकारक असल्याचे म्हणत आहे. हा कोकणी भाषेवर आणि कोकणी कलाकारांवर अन्याय आहे. भाजप शासनाला कोकणी चित्रपटांऐवजी केवळ हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांना वाव द्यायचा आहे का ? शासनाने कोकणी प्रिमियर विभागासाठी ४ चित्रपट असणे बंधनकारक असल्याची अट त्वरित रहित करावी.’’