पणजी, ९ नोव्हेंबर (वार्ता.) बंगालमध्ये निवडणुकीच्या वेळी महिलांवर अत्याचार करण्यात आले. महिलांवर बलात्कार करण्यात आले. या घटनांवरून मी तृणमूल काँग्रेसचा निषेध करतो, असे विधान गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.
ते पुढे म्हणाले, ‘‘बंगालमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराचे सूत्र मी नुकत्याच झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत उपस्थित केले. बंगालच्या मुख्यमंत्री महिला असूनही तेथे महिलांवर अत्याचार झाले. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकशाही म्हणजे काय ? हे अगोदर शिकून घेतले पाहिजे आणि त्यानंतरच इतर राज्यांचा दौरा केला पाहिजे. गोव्यात कुठलाही राजकीय पक्ष येऊ शकतो; मात्र राजकारणात घराणेशाही रुजवायला देऊ नये. गोव्यात ‘राजकीय पर्यटना’चे स्वागत आहे. बंगालमध्ये महिलांवर झालेले अत्याचार इतर राज्यांत कुठेही होऊ नयेत, अशा आशयाचा ठराव भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला.’’ गोव्यात वर्ष २०२२ मध्ये होणार्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नुकत्याच गोवा दौर्यावर आल्या होत्या.