जयपूर (राजस्थान) – सैन्याच्या २ जनरलनी सांगितले की, शेतकरी आंदोलन भारतीय सैन्यदलांवरही परिणाम करत आहे. त्यामुळे काहीही होऊ शकते. आज तुम्ही सत्तेच्या खुर्चीवर आहात आणि अहंकारात काहीही करत आहात; मात्र याचे काय पडसाद उमटतील, हे तुम्हाला ठाऊक नाही, असे विधान मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी येथील जागतिक जाट संमेलनात केले.
१. सत्यपाल मलिक पुढे म्हणाले की, कारगिलमध्ये सरकारने केलेल्या चुकीची किंमत शेतकर्यांच्या मुलांना चुकवावी लागली. कारगिल युद्ध झाले, तेव्हा शेतकर्यांची २० वर्षांची मुले पर्वतावर चढली. शत्रू कारगिलमध्ये घुसला, ही सरकारची चूक होती, असे मला वाटते; मात्र याची किंमत शेतकर्यांच्या सैनिक असलेल्या मुलांना युद्धांत प्राण देऊन चुकवावी लागली. हा अन्याय शेतकर्यांसमवेतच होत आहे. लोक यावर प्रतिक्रिया देत आहेत; मात्र एक दिवस यावर शेतकर्यांची तीव्र प्रतिक्रिया उमटू नये, असे मला वाटते. आतापर्यंत शेतकर्यांनी दगड उचललेला नाही.
२. शेतकरी आंदोलनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतल्याचे सत्यपाल मलिक यांनी सांगितले. मलिक म्हणाले, ‘‘मी पुष्कळ दुखावलो होतो आणि रागावलो होतो. मी पंतप्रधान मोदी यांना भेटलो आणि त्यांना ते परिस्थितीचे चुकीचे आकलन करत असल्याचे सांगितले. शीख किंवा जाट यांना पराभूत करता येणार नाही. तुम्हाला वाटते हे शेतकरी सहजपणे निघून जातील; पण तसे होणार नाही. त्यांच्या मागण्या मान्य करा.’’
३. मलिक म्हणाले की, एक-दोन व्यक्तींच्या डोक्यात सत्तेची धुंदी इतकी गेली आहे की, त्यांना भूमीच दिसत नाही; मात्र गावाकडे सांगितले जाते की, रावणदेखील अहंकारी होता. एक दिवस यांनाही (सत्ताधार्यांना) कळेल की, ते चुकीचे आहेत. मला वाटते तो दिवस लवकरच येईल.
४. मलिक यांनी शिखांनी रागातून केलेल्या कृत्यांची काही ऐतिहासिक उदाहरणेही नमूद केली. ते म्हणाले की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुवर्ण मंदिरात खलिस्तानवाद्यांच्या विरोधात सैनिकी कारवाई केली. यामुळे शीख समुदाय दुखावला. याची किंमत इंदिरा गांधी यांना जीव देऊन चुकवावी लागली. सैन्यदलप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांचीदेखील निवृत्तीनंतर पुण्यात हत्या झाली. (स्वातंत्र्यपूर्व काळात) जालियनवाला बाग हत्याकांड घडवणारा जनरल डायर याचीही लंडनमध्ये हत्या झाली.