माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

बारचालकांकडून १०० कोटी रुपयांची खंडणी वसुलीच्या आरोपाचे प्रकरण

माजी गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई – मुंबईतील बारचालकांकडून १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीच्या आरोपाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली.

अंमलबजावणी संचालनालयाने ५ वेळा नोटीस पाठवूनही अनिल देशमुख चौकशीसाठी उपस्थित राहिले नव्हते; मात्र ५ दिवसांपूर्वी ते स्वत: अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात उपस्थित राहिले. यानंतर न्यायालयाने देशमुख यांना अंमलबजावणी संचालनालयाचा कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. ६ नोव्हेंबरला झालेल्या सुनावणीच्या वेळी अंमलबजावणी संचालनालयाने अनिल देशमुख यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती; परंतु न्यायालयाने ती फेटाळून लावत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. देशमुख यांच्यावर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह मात्र अद्याप फरार आहेत.