केदारनाथमध्ये आदि शंकराचार्यांच्या पुतळ्याचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अनावरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी आदि शंकराचार्यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर

केदारनाथ (उत्तराखंड) – येथील आदि शंकराचार्यांच्या समाधीस्थळाजवळ स्थापन करण्यात आलेल्या त्यांच्या मूर्तीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. शंकराचार्यांची ही मूर्ती १२ फूट उंच आहे, तर तिचे वजन ३५ टन आहे. या वेळी पंतप्रधानांनी शंकराचार्यांच्या समाधीस्थळाचेही लोकार्पण केले. हे समाधीस्थळ वर्ष २०१३ मधील जलप्रलयात उद्ध्वस्त झाले होते. केरळमध्ये जन्मलेल्या आदि शंकराचार्यांनीच केदारनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. पंतप्रधान मोदी यांनी या वेळी केदारनाथ मंदिरात पूजा-अर्चा आणि रुद्राभिषेक केला. या वेळी उत्तराखंड राज्याचे राज्यपाल (निवृत्त) लेफ्टनंट जनरल गरुमीत सिंह आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी उपस्थित होते.

मी स्वतःच्या डोळ्यांनी विध्वंस पाहिला ! – पंतप्रधान मोदी

या वेळी पंतप्रधान मोदी उपस्थितांना संबोधित करतांना म्हणाले की, वर्ष २०१३ मध्ये जेव्हा येथे जलप्रलय झाला, तेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. त्या वेळी मला स्वतःला सावरता आले नाही. मी इकडे धावत आलो. मी माझ्या डोळ्यांनी येथील विध्वंस पाहिला. त्या वेदना सहन केल्या होत्या. येथे येणार्‍या लोकांना वाटायचे की, हे आमचे केदारधाम पुन्हा उभे राहील कि नाही ? पण माझा आतला आवाज सांगत होता की, हे पूर्वीपेक्षा अधिक अभिमानाने उभे राहील. आदि शंकराचार्यांच्या समाधीची पुनर्स्थापना तुम्ही सर्व जण पहात आहात. भारताच्या आध्यात्मिक समृद्धी आणि वारसा यांचे हे एक अथांग दृश्य आहे.