देहलीत बंदी असतांनाही मोठ्या प्रमाणावर फटाके फोडण्यात आल्याने प्रचंड प्रदूषण !

लोकांना श्‍वास घेणेही झाले कठीण !

  • अशा वेळी पोलीस काय करत असतात ? ते आंधळे आणि बहिरे झाले होते का ? जर फटाक्यांवर बंदी घालूनही ते फोडले जात असतील, तर हा बंदीचा फार्सच म्हणावा लागेल ! – संपादक
  • जनतेला फटाक्यांमुळे होणारे दुष्परिणाम आणि हानी यांची महत्त्व पटवून देण्यास शासनकर्ते अपयशी ठरले आहेत, हेच यावरून स्पष्ट होते ! – संपादक
  • जर फटाके फोडण्यावर बंदी घातली होती, तर देहलीमध्ये फटाके विकण्यावर बंदी का घातली गेली नाही ? जर सर्वसामान्य जनतेला फटाकेच उपलब्ध झाले नसते, तर ते फोडण्यावरही आळा बसला असता, हे शासनकर्त्यांना कसे समजत नाही ? – संपादक
प्रातिनिधिक छायाचित्र

नवी देहली – राजधानी देहलीमध्ये ४ नोव्हेंबरला रात्री दिवाळीत फटाके फोडल्यामुळे प्रदूषणात प्रचंड वाढ होऊन लोकांना श्‍वास घेणेही कठीण झाले आहे. दिवाळीत प्रदूषणकारी फटाके फोडण्यावर बंदी घातली होती; मात्र तरीही देहलीत अनेक ठिकाणी प्रदूषण करणारे फटाके फोडण्यात आले. त्यामुळे हवेची गुणवत्ता आणखी खालावून ती वाईट श्रेणींमध्ये आली आहे. येत्या काही दिवसांत ती आणखी खालावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ५ नोव्हेंबरला सकाळी फटाक्यांच्या धुरामुळे धुक्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. समोर २०० मीटर अंतरावरील भागही अंधूक दिसत होता.

१. देहलीतील जनपथ भागातील ‘हवा गुणवत्ता निर्देशांक’ (ए.क्यू.आय.) ‘धोकादायक श्रेणीत’ पोचला. संपूर्ण देहलीचा ‘हवा गुणवत्ता निर्देशांक’ ४४६ सह ‘गंभीर श्रेणीत’ पोचला. त्याचवेळी नोएडा आणि गाझियाबाद येतील परिस्थितीही अत्यंत बिकट होती. शहरातील अनेक लोकांनी त्यांचा घसा खवखवण्याची आणि डोळ्यांत पाणी येण्याची तक्रार केली.

२. केंद्र सरकारच्या अनुमानानुसार ७ नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होणार नाही.