केरळ येथील साधकांनी दीपोत्सवाच्या वेळी घेतली चैतन्य आणि शांती यांची अनुभूती

‘महर्षींनी वर्ष २०२० मध्ये दीपावलीच्या काळात सनातनचे आश्रम आणि सेवाकेंद्रे यांत दीपोत्सव साजरा करायला सांगितला होता. महर्षींनी मातीच्या पणत्यांची ॐ, श्रीयंत्र आणि सुदर्शनचक्र यांच्या आकाराची रचना करायला सांगितली होती. केरळ सेवाकेंद्रातही १३ ते १६.११.२०२० या कालावधीत रात्री दीपोत्सव साजरा केला. त्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

केरळ सेवाकेंद्रात केलेले यमदीपदान

१. श्री. बालकृष्ण नायका

श्री. बालकृष्ण नायका

अ. दीपावलीच्या पहिल्या दिवशी पणत्यांची रचना ‘ॐ’ च्या आकाराची केली होती. ‘त्या रात्री तेवत असलेल्या पणत्यांतून शांती आणि चैतन्य यांचे प्रक्षेपण होत आहे अन् यमदीपदानाचा विधी ब्रह्मदेवापर्यंत पोचला आहे’, असे मला जाणवले.

आ. दुसर्‍या दिवशी श्रीयंत्र आणि सुदर्शनचक्र यांच्या आकाराची पणत्यांची रचना केली होती. ‘त्या पणत्यांतून पुष्कळ शक्ती आणि तेज यांचे प्रक्षेपण होत आहे’, असे मला जाणवले. मला त्या तेजाची प्रभावळ १५ फुटांपर्यंत जाणवत होती. ‘सेवाकेंद्र त्या तेजाच्या कवचामुळे सुरक्षित आहे’, असे मला जाणवत होते. माझ्या शरिरात पुष्कळ उष्णता वाढल्याचे जाणवले.

इ. तिसर्‍या दिवशीही पणत्यांची श्रीयंत्र आणि सुदर्शनचक्र यांच्या आकाराची रचना केली होती. एका साधकाने मला पणत्यांजवळ बसून नामजप करायला सांगितला. मी जप करतांना ‘ज्योतीतून शांती आणि चैतन्य मिळत आहे’, असे मला जाणवले. माझा ‘श्री श्री’ असा जप आपोआप चालू झाला.

ई. ‘पहिल्या दिवशी मला पुष्कळ तेज आणि उष्णता जाणवत होती, तर नंतरच्या दिवशी साधकांना आवश्यक असलेले चैतन्य मिळत होते’, याची मला जाणीव झाली. ‘पहिल्या दिवशी तेजामुळे सेवाकेंद्रातील साधकांचा त्रास उणावला आणि नंतर साधकांना हिंदु राष्ट्रासाठी चैतन्य मिळत होते’, असे मला वाटले.

२. श्री. नंदकुमार कैमल

श्री. नंदकुमार कैमल

अ. १३.११.२०२० या दिवशी रात्री यमदीपदान विधीपूर्वी मला पुष्कळ थकवा जाणवत होता. मला पूर्ण गळून गेल्यासारखे झाले होते; (मला यमदीपदान हा विधी करायची सेवा होती.) पण पूजा चालू झाल्यावर मला असलेल्या थकव्याचे प्रमाण न्यून झाले आणि मला ताजेतवाने वाटू लागले.

आ. पूजेच्या शेवटी मला परात्पर गुरुदेवांचे भव्य रूप दिसले. ‘सर्व साधक त्यांच्या चरणांशी बसले आहेत आणि त्यांना शरणागतीने प्रार्थना करत आहेत’, असे मला दिसले. नंतर दिवे लावल्यानंतर ‘दिव्याकडून माझ्याकडे थंड लहरी येत आहेत आणि त्यांचा माझ्यावर वर्षाव होत आहे’, असे मला जाणवत होते. एवढ्यात सहसाधकाने मला दिव्याच्या छायाचित्रातील दिव्याच्या आतील आणि त्याच्या भोवती असलेली प्रभावळ दाखवली.

इ. १६.११.२०२० या दिवशी यमद्वितीयेला पूजा होण्यापूर्वी माझ्या मनात पुष्कळ विचार येऊन मन अस्थिर झाले; पण पूजा चालू झाल्यावर माझे मन शांत आणि स्थिर होऊन मला असलेला थकवा उणावला.

३. कु. रश्मी परमेश्वरन्

कु. रश्मी परमेश्वरन्

अ. १५.११.२०२० या दिवशी रात्री मी पणत्यांच्या रचनेकडे पहात उभी होते. मला तेथे पुष्कळ चैतन्य जाणवले. तेव्हा मी तेथे बसून नामजप करू लागले.

आ. तेथील चैतन्यामुळे मी ध्यानावस्थेत गेले आणि मला होत असलेला त्रास न्यून होऊन मला प्रसन्न वाटू लागले.

४. सौ. सुमा पुथलत

सौ. सुमा पुथलत

अ. ‘१३.११.२०२० या दिवशी मला यमदीपदानासाठी दीप बनवण्याची सेवा मिळाली. तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला.

आ. मला यमदेव, श्री गणेश आणि हनुमान यांच्याविषयी विशेष प्रेम आहे. मला ते माझ्या बंधुंसारखे वाटतात. ‘ते सतत माझ्या समवेत असतात’, असा माझा भाव असतो. ‘यमदेव सेवाकेंद्रात येणार आणि मी त्याच्यासाठी दीप लावणार’, याचा मला पुष्कळ आनंद झाला.

इ. पूजा चालू झाल्यावर वातावरण शांत आणि चैतन्यमय होते. पूजास्थळाचे छायाचित्र काढल्यावर मला दिव्याभोवती २ वलये दिसली. मी पणत्यांची ‘ॐ’च्या आकाराची रचना करत असतांना ‘हे या पूर्वीच करून झाले आहे आणि मी आज केवळ ही कृती करत आहे’, असे मला वाटले.

ई. १६.११.२०२० या भाऊबिजेच्या दिवशी यमदीपदान विधी चालू होता. आम्ही सर्व साधक सभोवती बसलो होतो. तेव्हा ‘यमदेव आला आहे’, असे मला वाटले. मला त्याचे चरण स्पष्ट दिसत होते. मी त्याच्या चरणांवर पाणी घातले आणि त्याचे स्वागत करून त्याला आत बोलावले. परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळेच मला यमदेवाचे सूक्ष्मातून दर्शन झाले आणि मला आनंद मिळाला.

उ. ‘यमदेवासाठी ठेवलेले दिवे आणि श्रीयंत्र अन् सुदर्शनचक्र यांच्या आकारात केलेल्या पणत्यांच्या रचना’ यांच्या काढलेल्या छायाचित्रात मला सर्वांभोवती वलय दिसत होते.

५. श्री. श्रीराम लुकतुके

श्री. श्रीराम लुकतुके

अ. १३ आणि १४.११.२०२० या दिवशी रात्री दीपोत्सवाच्या ठिकाणी मला उष्णता अधिक जाणवत होती.

आ. १५.११.२०२० या दिवशी सर्व पणत्या प्रज्वलित करून झाल्यावर उष्णता अल्प असल्याचे वाटले; म्हणून सहजच मी एका पणतीच्या ज्योतीपासून अनुमाने २ सेंटीमीटर दूर हात धरून पाहिला असता माझ्या हाताला चटका बसला नाही.

इ. १६.११.२०२० या दिवशी तापमान अल्प होते आणि मी ज्योतीवर हात धरल्यावर मला उष्णता विशेष जाणवली नाही. तेव्हा देवाने विचार दिला, ‘पहिले दोन दिवस मारक तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत होते. साधकांचा आध्यात्मिक त्रास उणावल्यावर तारक तत्त्व कार्यरत झाले. त्यामुळे उष्णता जाणवली नाही.’

प्रत्यक्षातही मला दिवाळीच्या पहिल्या दिवशी उत्साह अल्प जाणवत होता. नंतर प्रतिदिन दीपोत्सव साजरा होत असतांना मला होत असलेले मानसिक आणि आध्यात्मिक त्रास उणावले अन् मला आनंद अनुभवता आला. (२१.११.२०२०)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक