पुणे, १ नोव्हेंबर (वार्ता.) – प्रतिदिन अग्निहोत्र करणारे आणि अग्निहोत्राचा भारतासह विदेशातही प्रसार करणारे प.पू. स्वामीमय सद्गुरु दादाश्री मोहन जाधव (वय ८० वर्षे) यांनी पुणे येथे २६ ऑक्टोबर २०२१ या रात्री ११ वाजता देहत्याग केला. त्यांनी आयुष्यभर अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांच्या आज्ञेनुसार कार्य केले. त्यांनी वेदानुसार आचरण कसे करावे ?, तसेच पंचसाधन म्हणजे यज्ञ, दान, तप, कर्म, स्वाध्याय आदी सर्वांना शिकवले. ‘सर्व मानवतेला सत्यज्ञानाचा लाभ व्हावा’, अशी त्यांची तळमळ होती.
अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) येथील परम सद्गुरु श्री गजानन महाराज यांचे ते शिष्य होते. प.पू. स्वामीमय सद्गुरु दादाश्री मोहन जाधव यांनी प्रतिदिन सकाळी आणि सायंकाळी ‘अग्निहोत्र’ केले आणि समाजातील लोकांनाही शिकवले. अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) येथील स्वामी समर्थांच्या आज्ञेनुसार प.पू. स्वामीमय सद्गुरु यांचा देह आळंदी येथे भूगर्भात ठेवण्यात आला. या वेळी दादाश्रींचे कुटुंबीय, तसेच अमेरिका आणि भारत येथील अग्निहोत्री उपस्थित होते.