आर्यन खान याच्या सुटकेचे वृत्तसंकलन करण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची आर्थर रोड कारागृहाबाहेर झुंबड

  • अमली पदार्थ बाळगल्याचे प्रकरण

  • प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची पहाटे ५ वाजल्यापासूनच गर्दी !

  • २८ दिवस आर्यन खान याच्याविषयीच्या निरर्थक बातम्यांना वृत्तवाहिन्यांकडून अमाप प्रसिद्धी !

  • काळ्या पाण्याची शिक्षा भोगणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकर यांना खलनायक ठरवणार्‍या वाहिन्या अमली पदार्थांशी संबंधित आरोप असलेल्या व्यक्तीच्या सुटकेची वृत्ते दिवसभर दाखवून टी.आर्.पी.साठी (सर्वाधिक प्रमाणात पाहिली जाणारी वाहिनी किंवा कार्यक्रम यांची नोंद ठेवण्याची व्यवस्था) त्यांचे उदात्तीकरण करतात, हे लक्षात घ्या ! – संपादक 
  • अपप्रवृत्तीचे उद्दात्तीकरण करणारा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ जेव्हा राष्ट्रहिताचे कार्य करणार्‍यांचा गौरव करेल, तेव्हा खरे सुराज्य असेल ! – संपादक 
  • अशा व्यक्ती देशातील तरुणांचे ‘आदर्श’ असतील, तर ही पिढी उद्या अमली पदार्थांची भावी ग्राहक नसेल कशावरून ? – संपादक 
आर्यन खान याची ३० ऑक्टोबर या दिवशी जामिनावर सुटका

मुंबई, ३० ऑक्टोबर (वार्ता.) – अमली पदार्थ बाळगल्याच्या प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खान याची ३० ऑक्टोबर या दिवशी जामिनावर सुटका झाली. सकाळी ११.३० वाजता आर्यन खान याला कारागृहाच्या बाहेर सोडण्यात आले; मात्र त्याच्या सुटकेचे वृत्तसंकलन करण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पहाटे ५ वाजल्यापासून आर्थर रोड कारागृहाच्या बाहेर गर्दी केली होती. त्यामुळे प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि अभिनेते शाहरुख खान यांचे चाहते यांना थोपवण्यासाठी कारागृहाबाहेर पोलिसांचा पहारा वाढवण्याची वेळ आली. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि शाहरुख खान यांचे चाहते यांनी केलेल्या गर्दीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. यामध्ये युवकांचा भरणा अधिक होता. (वेळ वाया घालवणारी भारताची युवा पिढी ! – संपादक) आर्यन याची सुटका होताच त्याच्या घराबाहेर चाहत्यांनी फटाकेही फोडले. खान यांचा बंगला आणि कारागृह यांच्याबाहेर २९ अन् ३० ऑक्टोबर या दिवशी झालेल्या गर्दीचा अपलाभ उठवत भुरट्या चोरांनी पत्रकारांसह अनेकांचे भ्रमणभाष आणि पैशांची पाकिटे चोरली. यांपैकी ३ चोरांना पकडण्यात आले आहे.

राज्यातील समस्या संपल्याप्रमाणे प्रसारमाध्यमांकडून २८ दिवस आर्यन खान याच्या वृत्ताला सर्वाधिक प्रसिद्धी !

गेले २८ दिवस राज्यातील विविध समस्या मांडण्याऐवजी वृत्तवाहिन्यांनी आर्यन खान याच्या अटकेविषयी त्याच त्याच बातम्यांना प्रसिद्धी दिली. ‘आर्यन खान कारागृहात काय खातो आहे ?’, ‘आर्यन खान याला पाहून शाहरुख खान याला गहिवरून आले’, ‘आर्यन खान याला आणखी १ दिवस कारागृहातच रहावे लागणार’, ‘आर्यन खान याची दिवाळी कारागृहातच जाणार का ?’, आदी निरर्थक बातम्या वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात आल्या. यामुळे समाजाला काही दिशा तर मिळाली नाहीच; उलट या खान पिता-पुत्रांना प्रसिद्धी मिळाली आणि अमली पदार्थ बाळगणारे किंवा घेणारे यांचे उदात्तीकरण झाले. यातून समाजात चुकीचा संदेश गेला. कही वर्षांपूर्वी असाच प्रकार अभिनेते संजय दत्त यांच्या अटकेच्या संदर्भातही दिसून आला होता.