आरतीच्या वेळी शंखनाद केल्यावर मुरलीधर श्रीकृष्णाच्या मूर्तीच्या हातातील बासरी उडून खाली पडण्याच्या घटनेचे केलेले सूक्ष्म परीक्षण !

सनातनच्या रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात आरतीच्या वेळी शंखनाद केल्यावर तेथील मुरलीधर श्रीकृष्णाच्या मूर्तीच्या हातातील बासरी उडून खाली पडण्याच्या घटनेचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘२३.४.२०१९ या दिवशी सायं. ६.३० वाजता सनातनच्या रामनाथी येथील आश्रमातील ध्यानमंदिरात नेहमीप्रमाणे आरती करण्यात आली. सनातनचे साधक श्री. सुनील पवार यांनी आरती करण्यापूर्वी तीन वेळा शंखनाद केला. एका संतांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दिलेली रूपेरी रंगाची धातूची मुरलीधर श्रीकृष्णाची मूर्ती ध्यानमंदिरात ठेवली आहे. तिच्या हातात रूपेरी रंगाची बासरी आहे. श्री. सुनील पवार यांनी पहिल्यांदा शंखनाद केल्यावर मुरलीधर श्रीकृष्णाच्या मूर्तीच्या हातातील सुमारे एक वीतभर लांबीची बासरी उडून ४ – ५ फूट लांब पडली. ही घटना झाल्यावर थोड्या वेळाने मला सौ. प्रियांका राजहंस (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के) यांनी या घटनेचे सूक्ष्म परीक्षण करण्यास सांगितले. तेव्हा देवाच्या कृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण पुढील प्रमाणे आहे.

कु. मधुरा भोसले

१. सनातनच्या रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरातील मुरलीधर श्रीकृष्णाच्या मूर्तीचे सूक्ष्म परीक्षण

१ अ. शंखनादातून निर्गुण चैतन्य आणि नादशक्ती वातावरणात प्रक्षेपित होणे, नादशक्तीच्या लहरींचा मुरलीधर श्रीकृष्णाच्या मूर्तीला सूक्ष्मातून स्पर्श होऊन तिची सूर्यनाडी चालू होणे आणि तिच्यामध्ये मारक तत्त्व कार्यरत होणे : हे सूक्ष्म परीक्षण करत असतांना देवाने मला काही क्षण भूतकाळात नेले आणि ‘जेव्हा साधकाने शंखनाद केला’, तो क्षण मी अनुभवू लागले. तेव्हा मला असे जाणवले की, शंखनादातून निर्गुण चैतन्य आणि नादशक्ती यांचे संपूर्ण वातावरणात प्रक्षेपण झाले आणि नादशक्तीच्या लहरींचा मुरलीधर श्रीकृष्णाच्या मूर्तीला सूक्ष्मातून स्पर्श झाला. त्यामुळे श्रीकृष्णाच्या मूर्तीची सूर्यनाडी चालू होऊन तिच्यामध्ये मारक तत्त्व कार्यरत होऊन त्याची मारक शक्ती प्रगट झाली. मारक शक्ती प्रगट होऊन ती श्रीकृष्णाच्या दोन्ही हातांतून वेगाने प्रवाहित झाल्यामुळे त्याच्या हाताला विजेसारखा धक्का लागला आणि त्याच्या हातातील बासरी एकदम दूर फेकली गेली.

१ आ. श्रीकृष्णाचे तारक रूप लुप्त झाल्याने त्याने बासरीचा त्याग करणे आणि काळानुसार मारक रूप धारण करण्यासाठी हातामध्ये सुदर्शनचक्र घेणे : या घटनेतून श्रीकृष्णाने साधकांना संदेश दिला आहे, ‘आता संपत काळ संपल्यामुळे बासरी वाजवण्याची वेळ निघून गेली. आता आपत्काळ आल्यामुळे काळानुरूप मारक रूप धारण करणे आवश्यक आहे. त्यामुळे माझे तारक रूप आता लुप्त झाले आहे; म्हणून मी माझ्या बासरीचा त्याग करून माझे प्रिय सुदर्शनचक्र धारण करत आहे. सुदर्शनचक्र धारण केल्यावर माझे मारक रूप पूर्णपणे प्रगट होईल.’

१ इ. श्रीकृष्णाच्या मूर्तीमध्ये पुष्कळ प्रमाणात मारक तत्त्व कार्यरत होणे : श्रीकृष्णाच्या मूर्तीमध्ये पुष्कळ प्रमाणात मारक तत्त्व कार्यरत झालेले जाणवले. त्यामुळे साधकांना त्रास देणार्‍या सूक्ष्मातील वाईट शक्तींच्या विनाशाची प्रक्रिया वेगाने चालू झाल्याचे जाणवले.

१ ई. भगवान श्रीकृष्ण धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी सक्रीय झाल्याची प्रचीती येणे : मूर्तीमध्ये केशरी रंगाच्या धर्मशक्तीच्या लहरी विजेप्रमाणे तळपतांना दिसल्या. यावरून भगवान श्रीकृष्ण धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी सक्रीय झाल्याची प्रचीती मिळाली.

२. भूमीवर पडलेल्या बासरीचे सूक्ष्म परीक्षण

भूमीवर पडलेली बासरी पाहिल्यावर तिचे स्थुलातील कार्य संपल्यामुळे मला तिच्यातील कृष्णतत्त्व लुप्त झाल्याचे जाणवले. तिच्यामध्ये श्रीविष्णूचे निर्गुण तत्त्व आणि चैतन्य कार्यरत असल्याचे जाणवले. तिला श्रीकृष्णाचा वियोग झाल्याचे किंचित दु:ख वाटले; परंतु श्रीकृष्णाने समष्टीच्या कल्याणासाठी मारक रूप धारण केल्याचे पाहून तिला अधिक आनंद झाला. यावरून बासरीमध्ये संकुचित स्तरावरील व्यष्टी भाव नसून व्यापक स्तरावरील समष्टीभाव असल्याचे जाणवले.

३. बासरीच्या अनुभूतीतून श्रीकृष्णाने दिलेली शिकवण

वरील प्रसंगांवरून ‘भगवंत त्याच्या भक्तांना दिलेल्या वचनांची पूर्ती करण्यासाठी सदैव कटीबद्ध असतो’, याची जाणीव झाली. महाभारताच्या युद्धात जेव्हा अर्जुन भीष्माचार्यांचा वध करत नव्हता, तेव्हा श्रीकृष्णाने ‘मी युद्धात शस्त्र धरणार नाही’, ही प्रतिज्ञा मोडून हातामध्ये सुदर्शनचक्र धारण केले होते. त्याचप्रमाणे आता कलियुगातही सनातनच्या साधकांना होणार्‍या वाईट शक्तींच्या त्रासाकडे भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवत साक्षीभावाने पहाणार नसून, तो सुदर्शनचक्र धारण करून वाईट शक्तींचा समूळ नाश करून धर्मसंस्थापना करणार आहे’, याची ग्वाही वरील अनुभूतीतून मिळते.

४. कृतज्ञता

ही अनुभूती दिल्याबद्दल मी भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे अंशावतार परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पावन चरणी समस्त साधकांच्या वतीने कृतज्ञतापुष्पे अर्पण करते. ‘तुमची कृपादृष्टी आम्हा पामरांवर अशीच राहू दे’, हीच तुमच्या चरणी विनम्र प्रार्थना आहे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(२३.४.२०१९)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक