‘बालभारती’ची पाठ्यपुस्तकाची योजना देशभरात राबवण्यासाठी शिफारस करणार ! – खासदार विनय सहस्रबुद्धे

भाजपचे खासदार विनय सहस्रबुद्धे

पुणे – विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे अल्प करण्यासाठी महाराष्ट्रात चार मासांच्या पाठ्यपुस्तकाची योजना राबवण्यात येते. ‘बालभारती’ची (महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ म्हणजे ‘बालभारती’) ही योजना देशभरात राबवली जावी म्हणून शिफारस करणार, अशी माहिती संसदेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात नवीन शैक्षणिक धोरणासंबंधी पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी ही माहिती दिली.

खासदार सहस्रबुद्धे पुढे म्हणाले की, देशाच्या इतिहासातील प्रत्येक टप्प्यावरील घडामोडींचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्याचा प्रयत्न असून नवीन शैक्षणिक धोरणाच्या कार्यवाहीसाठी सकारात्मक वातावरण सिद्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ देशांचे लोकप्रतिनिधी भारताच्या लोकशाहीचा अभ्यास करण्यासाठी येणार असून ग्रामपंचायतीपासून ते संसदेपर्यंत देशातील समृद्ध लोकशाहीचा वारसा ते समजून घेतील, अशी माहिती सहस्रबुद्धे यांनी दिली. शैक्षणिक संस्था आणि उद्योगांचा परस्पर सहभाग यांतून संसाधनांच्या सामायिक वापरातून शैक्षणिक सुविधा अधिक कार्यक्षम होतील.