सांगली येथील श्री. रमेश लुकतुके (वय ७२ वर्षे) यांची साधकांना जाणवलेली वैशिष्ट्ये आणि त्यांच्यामध्ये जाणवलेले पालट

६२ टक्के आध्यात्मिक पातळी असणारे सांगली येथील श्री. रमेश लुकतुके (वय ७२ वर्षे) यांची साधकांना जाणवलेली वैशिष्ट्ये आणि त्यांच्यामध्ये जाणवलेले पालट

सांगली जिल्ह्यातील साधकांना ६२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. रमेश लुकतुकेकाका यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यामध्ये जाणवलेले पालट येथे दिले आहेत.

श्री. रमेश लुकतुके

१. गुणवैशिष्ट्ये

१ अ. अपघात झाल्यावर दुखापत होऊनही स्थिर आणि शांत राहून प्रसंग हाताळणे

१ अ १. अपघात झाल्यावर ‘गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे’, हे लक्षात आल्यावर स्थिर राहून आश्रमात संपर्क करून सांगणे : ‘श्री. लुकतुकेकाका सेवेनिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी जातात. कोणतीही सेवा परिपूर्ण करण्यासाठी ते सतत प्रयत्नरत असतात. काही मासांपूर्वी श्री. लुकतुकेकाका सांगली बसस्थानकावर बसमधून उतरल्यानंतर एका दुकानासमोरील लोखंडी गजात पाय अडकून पडले. त्यांनी साधकांना दूरध्वनी करून सांगितले, ‘‘मी बसस्थानकावर पडलो आहे. ‘माझ्या गुडघ्याची वाटी तुटली आहे’, असे मला वाटत आहे. मला कुणी न्यायला येऊ शकते का ?’’ त्या वेळी बोलतांना काका पुष्कळ स्थिर वाटत होते. साधकांनी काकांना रुग्णालयात नेल्यावर ‘त्यांच्या पायाला मोठी दुखापत झाली आहे’, हे लक्षात आले; परंतु काकांच्या तोंडवळ्यावर कुठेही त्रागा किंवा त्रास दिसत नव्हता. ते अधिकािधक प्रार्थना आणि नामजप करत होते.’ – श्री. योगेश जोशी, सनातन आश्रम, मिरज आणि सौ. कल्पना थोरात, सांगली

१ अ २. बसस्थानकात पडल्यावर लोकांचे साहाय्य घेणे : श्री. लुकतुकेकाका पडले तेव्हा त्यांनी स्वतःहून सभोवतालच्या लोकांना हाक मारून त्यांचे साहाय्य घेतले. त्याच वेळी मी एका सेवेसाठी काकांना दूरभाष केला होता. तेव्हा काकांनी शांतपणे सांगितले, ‘‘मला लागले आहे आणि मी याविषयी आश्रमात कळवले आहे.’’

१ अ ३. अपघात झाल्यावर साधकांना कल्पना देऊन रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेणे : काकांनी उभे रहाण्याचा प्रयत्न केला; मात्र ते उभे राहू शकत नव्हते. ‘उभे का राहू शकत नाही ?’, हे कळण्यासाठी त्यांनी त्यांचा दुखापत झालेला गुडघा दाबून पाहिला. तेव्हा ‘गुडघ्याची वाटी जवळ येत नाही’, हे त्यांच्या लक्षात आले. याही स्थितीत काका स्थिर होते.’ – सौ. अर्पिता देशपांडे, सनातन आश्रम, मिरज.

१ आ. शस्त्रकर्म झाल्यावरही आनंदी असणे आणि ‘आश्रमात रहायला मिळणार’, या विचाराने कृतज्ञता वाटणे : ‘काकांच्या गुडघ्याचे शस्त्रकर्म झाल्यानंतर रुग्णालयातही काका आनंदी दिसत होते. काकांना ‘आश्रमात रहायला मिळणार’, या विचाराने पुष्कळ आनंद झाला होता. त्यांच्या बोलण्यातून गुरुदेवांविषयी पुष्कळ कृतज्ञता जाणवत होती. ‘काकांनी त्यांच्यावर आलेला प्रसंग आनंदाने स्वीकारल्यामुळे त्यांना देवाने लवकरात लवकर या दुखण्यातून बाहेर काढले’, असे जाणवले.’ – श्री. योगेश जोशी, सनातन आश्रम, मिरज आणि सौ. कल्पना थोरात, सांगली

१ इ. गुरुदेवांवरील श्रद्धा आणि पाय बरा होण्याची तळमळ यांमुळे शस्त्रकर्म झाल्यानंतर काही दिवसांतच प्रयत्न करून त्यांनी पायर्‍या चढ-उतार करण्यास आरंभ करणे अन् त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होणे : ‘आश्रमात चढ-उतार करायला काकांना त्रास होऊ नये; म्हणून त्यांची रहाण्याची व्यवस्था खालच्या माळ्यावरच्या कक्षात केली होती. शस्त्रकर्म झाल्यानंतर काही दिवसांतच प्रयत्न करून त्यांनी पायर्‍या चढ-उतार करायला आरंभ केला. खरेतर काकांचे वय आणि शरीरप्रकृती पहाता त्यांना ‘आता परत पूर्वीसारखे चालणे जमेल का ?’, असे वाटत होते; पण त्यांची गुरुदेवांवरील श्रद्धा आणि पाय बरा होण्याची तळमळ यांमुळे ते लवकर बरे झाले.’ – सौ. कल्पना थोरात, सांगली

१ ई. अपघातानंतरही कोणतीही सेवा तत्परतेने आणि तळमळीने करणे : रुग्णालयातून आश्रमात आल्यानंतर त्यांनी लगेच सेवेला आरंभ केला. पायाला दुखापत झालेली असूनसुद्धा काका आश्रमात कुठलीही सेवा करण्यास तत्परतेने पुढाकार घेतात.’ – श्री. योगेश जोशी, सनातन आश्रम, मिरज.

१ उ. अपघात झाल्यावरही घरच्यांकडून कोणतीही अपेक्षा न करता ‘गुरु माझ्याकडून सर्व कृती करवून घेणारच आहेत’, हा भाव ठेवल्याने काही कालावधीतच त्यांना सर्व दैनंदिन कृती करता येणे : ‘काकांचा अपघात झाल्यावर ८ दिवस ते त्यांचा मुलगा श्री. श्रीरामदादा यांच्या समवेत राहिले. श्रीरामदादांना अध्यात्मप्रसाराच्या अन्य सेवा असल्यामुळे त्यांना अधिक काळ थांबणे शक्य नव्हते. काकूंचाही हात दुखत असल्यामुळे त्या काकांना जमेल, तसे साहाय्य करत होत्या. काही दिवसांनी काकूंचा हात पुष्कळ दुखू लागल्यामुळे त्या उपचारांसाठी मुलीकडे गेल्या. रुग्णाईत असतांना काका मिरज आश्रमात एकटेच होते, तरीही काकांनी घरच्यांकडून कोणतीही अपेक्षा केली नाही. हळूहळू काकांनी स्वतःचे कपडे स्वतःच धुणे, ते रहात असलेली खोली आवरणे, तेथील स्वच्छता करणे, स्वागतकक्षातील सेवा करणे, महाप्रसादासाठी स्वयंपाकघरात जाणे, ध्यानमंदिरात जाणे, पूजा करणे आदी करणे साध्य केले. ‘गुरुदेवांनी माझ्यासाठी आतापर्यंत पुष्कळ केले आहे आणि अजूनही करत आहेत. मला गुरुदेवांची सेवा करायची आहे आणि ते माझ्याकडून करवून घेणारच आहेत’, असा त्यांचा भाव असतो.

१ ऊ. सदैव उत्साही असणे : काकांचे वय ७२ वर्षे आहे, तरी काकांमध्ये ‘तरुणांना लाजवेल’, असा उत्साह असतो. काकांची वजन उचलायची आणि पायी चालून सेवा करण्याची सिद्धता असते. ‘काका थकल्यामुळे झोपले आहेत’, असे मी कधीही पाहिले नाही. काका सतत उत्साही असतात.’ – सौ. अर्पिता देशपांडे, सनातन आश्रम, मिरज.

१ ए. सेवा गुरूंना अपेक्षित अशी आणि परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे

१. ‘श्री. लुकतुकेकाका कोणतीही सेवा तळमळीने करतात आणि ती सेवा पूर्ण होण्यासाठी शेवटपर्यंत साधकांचा पाठपुरावा करतात.’ – कु. प्रतिभा तावरे, सांगली

२. ‘काका सर्व अहवाल बारकाव्यानिशी पडताळतात. कोणताही अहवाल करतांना तो परिपूर्ण करण्यासाठी काकांचा प्रयत्न असतो.’ – सौ. अर्पिता देशपांडे, सनातन आश्रम, मिरज आणि कु. प्रतिभा तावरे, सांगली

३. ‘काका प्रत्येकच कृती परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी वापरलेली चाकाची आसंदी सरळ आहे ना ? तिच्या चाकांची दिशा व्यवस्थित आहे ना ?’, यांसारख्या गोष्टींकडेही त्यांचे लक्ष असते.’ – श्री. नितीन पांडे, सनातन आश्रम, मिरज.

१ ऐ. साधकांच्या अडचणी सोडवण्यास साहाय्य करत असल्यामुळे साधकांना त्यांचा आधार वाटणे

१. ‘श्री. लुकतुकेकाका त्यांच्या संपर्कातील सर्वांनाच त्यांच्या सेवेतील अडचणी सोडवण्यासाठी साहाय्य करतात. त्यामुळे त्यांना कुठल्याही स्तरावरील अडचण विचारता येते.’ – कु. प्रतिभा तावरे, सांगली आणि श्री. नितीन पांडे, सनातन आश्रम, मिरज.

२. ‘देयकांच्या मांडणीत चूक झाल्यावरही काका प्रेमाने अन् वेळ प्रसंगी प्रत्यक्ष देयकाची व्यवस्थित मांडणी करून समजावून सांगतात. त्यामुळे काकांचा पुष्कळ आधार वाटतो.’ – सौ. अर्पिता देशपांडे आणि श्री. नितीन पांडे, सनातन आश्रम, मिरज.

२. साधकांना श्री. लुकतुकेकाकांमध्ये जाणवलेले पालट

२ अ. बोलण्यातील कठोरपणा आणि अट्टहास न्यून होणे

१. ‘पूर्वी काका एखाद्या सूत्रावर पुष्कळ अडून रहात असत; परंतु आता ते इतरांना समजून घेऊन ‘त्यांना साहाय्य कसे करता येईल ?’, याकडे अधिक लक्ष देतात.

२. पूर्वी जिल्ह्यामध्ये होणार्‍या नोंदींच्या संदर्भात साधकांकडून काही चुका झाल्या, तर काका पुष्कळ चिडचिड करायचे आणि त्यांना एखादे सूत्र सांगतांनाही काकांचा अट्टहास असायचा. आता काका इतरांच्या लक्षात आलेल्या चुका त्या साधकांकडून पुन्हा होऊ नयेत, यासाठी त्यांना समजून घेऊन ‘काय अपेक्षित आहे’, ते सांगण्याचा प्रयत्न करतात.

३. काकांच्या बोलण्यात आता पुष्कळ नम्रपणा जाणवतो.’ – श्री. योगेश जोशी, सनातन आश्रम, मिरज.

२ आ. अलिप्तपणा न्यून होऊन प्रेमभाव वाढणे

१. ‘पूर्वी काका सेवा असेल, तरच साधकांशी बोलत असत; परंतु आता ते साधकांशी आपणहून अनौपचारिक बोलून जवळीक साधण्यासाठी प्रयत्न करतात आणि साधकांमध्ये मिसळतात. आता काकांमधील प्रेमभाव वाढल्याचे जाणवते.

२. पूर्वी काकांना साधकांच्या चुका सांगता येत नव्हत्या किंवा चुका सांगितल्या, तर त्या प्रतिक्रियात्मक पद्धतीने सांगत असत. आता काका साधकांना शांतपणे चुका सांगून त्या दुरुस्त करण्यासाठी साधकांना साहाय्य करतात. काकांचे प्रतिक्रियात्मक पद्धतीने बोलणे न्यून झाले आहे.’ – सौ. अर्पिता देशपांडे, सनातन आश्रम, मिरज

३. ‘काकांमधील प्रेमभावात पुष्कळ वाढ झाली आहे. काही वेळा माझ्याकडून ध्यानमंदिराच्या स्वच्छतेला उशीर झाल्यास काका स्वतःहून स्वच्छतेला आरंभ करून मला आधार देत असत.’ – श्री. नितीन पांडे, सनातन आश्रम, मिरज

२ इ. घरची ओढ न्यून होऊन आश्रमाची ओढ वाढणे : ‘पूर्वी काकांना त्यांच्या घरी जाण्याची ओढ अधिक असायची. ‘घरात असलेल्या झाडांची काळजी घ्यावी, घराकडे लक्ष द्यावे’, असे त्यांना वाटायचे; परंतु आता त्यांची घरी जाण्याची ओढ अल्प झाली असून आश्रमात रहाण्याची ओढ वाढली आहे.

२ ई. परिस्थिती स्वीकारणे : पूर्वी काकांच्या ठरलेल्या नियोजनाच्या व्यतिरिक्त अन्य सेवा आल्यास त्या त्यांना स्वीकारल्या जात नव्हत्या; परंतु आता मात्र कधी कधी काकांना ऐनवेळी वेगवेगळ्या सेवा आल्यास ते त्या स्वीकारून त्यात आनंदाने सहभागी होतात.

२ उ. काका त्यांच्याशी संबंधित असलेल्या साधकांना स्वतःच्या चुका विचारून त्यांचे साहाय्य घेतात.’ – सौ. अर्पिता देशपांडे, सनातन आश्रम, मिरज.

२ ऊ. ईश्वराप्रतीचा भाव वाढल्याचे जाणवणे

१. सद्गुरूंनी सांगितलेले व्यष्टी साधनेचे प्रयत्न मनापासून करणे आणि त्यामुळे कृतज्ञताभाव अन् व्यष्टी साधनेची तळमळ वाढली असल्याचे अन्यांच्या लक्षात येणे : ‘सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी आम्हा साधकांना व्यष्टी साधनेचे काही प्रयत्न करायला सांगितले होते. त्यांनी सांगितलेले साधनेचे सर्व प्रयत्न श्री. लुकतुकेकाका मनापासून करत आहेत. काकांमध्ये ‘कृतज्ञताभाव, चुकांची खंत, व्यष्टी साधनेची तळमळ वाढली आहे’, असे लक्षात आले. ते व्यष्टी साधनेचा आढावा देत असतांना ‘त्यांचे प्रयत्न ऐकत रहावे’, असे वाटतात. ‘काकांची आध्यात्मिक प्रगती जलद गतीने होत आहे’, हे लक्षात येते.’ – सौ. अर्पिता देशपांडे, सनातन आश्रम, मिरज.

२. ‘सध्या नियमित चालू असलेल्या व्यष्टी आढाव्यामुळे काकांचा भाव पुष्कळ वाढला आहे’, असे जाणवते.’ – सौ. कल्पना थोरात, सांगली

३. ‘मागील काही दिवसांपासून श्री. लुकतुकेकाकांचे भाववृद्धीचे प्रयत्न वाढले आहेत. ध्यानमंदिरात पूजा करतांना ते प्रत्येक कृती परिपूर्ण अन् भावपूर्ण करायचे.’

– श्री. नितीन पांडे, सनातन आश्रम, मिरज. (लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक (५.३.२०२०)