भारत आणि बांगलादेश येथे चाललेल्या हिंदूंच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ भाजपचा ठाणे येथे मूक मोर्चा !

बांगलादेशातील हिंसाचाराविरोधात भारतातील हिंदूंचे संघटन होणे हे हिंदु राष्ट्रासाठी आशादायी ! – संपादक 

ठाणे, २३ ऑक्टोबर (वार्ता.) – भारत आणि बांगलादेश येथे होणार्‍या हिंदूंच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ भाजपच्या कामगार आघाडीच्या वतीने ठाणे येथे मूक मोर्चा काढण्यात आला. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोचून निषेध व्यक्त व्हावा, या उद्देशाने २३ ऑक्टोबर या दिवशी दुपारी ३.३० वाजता या मूक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मोर्च्यामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी हातात निषेधाचे फलक धरले होते. तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून निघालेल्या या मूक मोर्च्याची सांगता शासकीय विश्रामगृहाजवळ करण्यात आली. मोर्च्यामध्ये आमदार आणि ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर आणि भाजप कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश ताठे आदी मान्यवर आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.


निपाणी (कर्नाटक) येथे बांगलादेशात हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांच्या निषेधार्थ निदर्शने ! 

छत्रपती संभाजीराजे चौक येथे आंदोलन करतांना हिंदुत्वनिष्ठ आणि भाविक

निपाणी (कर्नाटक) – बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या आक्रमणांच्या निषेधार्थ निपाणी येथील छत्रपती संभाजीराजे चौक येथे ‘इस्कॉन’, हिंदुत्वनिष्ठ संघटना, विरुपाक्षलिंग समाधी मठ यांच्या वतीने २१ ऑक्टोबर या दिवशी निदर्शने करण्यात आली. या वेळी हिंदूंवर हिंसक आक्रमणे करणार्‍या, मूर्तींचे भंजन करणार्‍या, दुर्गापूजा मंडप उद्ध्वस्त करणार्‍या धर्मांधांना शोधून काढून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. या निदर्शनात ‘विरुपाक्षलिंग समाधी मठा’चे पू. प्राणलिंग स्वामीजी, ‘इस्कॉन’चे श्री. अनिल खांडके, अधिवक्ता सुषमा बेंद्रे, विश्व हिंदु परिषदेच्या सुचित्राताई कुलकर्णी, श्रीराम सेनेचे श्री. अमोल चेंडके यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. प्रास्ताविक सागर श्रीखंडे यांनी केले, तर आभार बबन निर्मळे यांनी व्यक्त केले.


निगडी (जिल्हा पुणे) येथेही आंदोलन !

पिंपरी, २४ ऑक्टोबर (वार्ता.) – निगडी येथील इस्कॉन मंदिराच्या वतीने बांगलादेशात हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात २१ ऑक्टोबर या दिवशी आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. बांगलादेशमध्ये इस्कॉन मंदिराचा परिसर उद्ध्वस्त करून समाजकंटकांनी धार्मिक ग्रंथांची जाळपोळ केली. अनेक भक्त आणि हिंदू यांना मारहाण केली. काहींची घरेही जाळली. घडलेल्या प्रकाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलन करण्यात आले.