प्रगल्भ विचारांचा, शिकण्याची वृत्ती असलेला आणि स्वभावदोष निर्मूलनासाठी बालवयापासून प्रयत्न करणारा ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचा मिरज येथील कु. अवधूत संजय जगताप (वय ८ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. अवधूत जगताप हा एक आहे !

कु. अवधूत जगताप

६५ टक्के आध्यात्मिक पातळीचा मिरज येथील कु. अवधूत जगताप याची त्याच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सौ. वेदिका संजय जगताप (कु. अवधूतची आई), मिरज, जि. सांगली.

सौ. वेदिका जगताप

१. ‘अवधूतच्या बोलण्यात गोडवा असून ‘त्याचे बोलणे ऐकत रहावे’, असे वाटते.’

२. शिकण्याची वृत्ती

‘अवधूतला नवीन गोष्टी शिकून त्या स्वतः करायला आवडतात. मी स्वयंपाकघरात काम करत असतांना ‘मी काय करत आहे ?’, हे पाहून तो तशी कृती करतो, उदा. तो स्वतः पोळी लाटून बघण्याचा प्रयत्न करतो. पोळी लाटायला जमल्यावर त्याला पुष्कळ आनंद होतो.

३. स्वभावदोष निर्मूलनासाठी अवधूतकडून केले जाणारे प्रयत्न

३ अ. स्वभावदोषांची सारणी लिहिण्यास शिकणे : एक दिवस मी स्वभावदोष सारणी लिहित असतांना अवधूतशी पुढील संभाषण झाले.

अवधूत : आई, तू काय लिहितेस ?

मी : मी स्वभावदोष सारणी लिहिते.

अवधूत : हे कशासाठी लिहायचे असते ?

मी : ‘आपल्याकडून पुन्हा चुका होऊ नयेत’, यासाठी प्रतिदिन झालेल्या चुका सारणीत लिहायच्या असतात आणि ‘त्या चुका आपल्यातील कुठल्या स्वभावदोषांमुळे होतात ?’, हे लिहून त्यावर स्वयंसूचनाही लिहायच्या असतात.

अवधूत : मलाही सारणी लिहायला शिकव. मीही प्रतिदिन सारणी लिहिणार आहे.

अवधूतला अजून नीट वाक्यरचना करता येत नाही. तो त्याच्याकडून झालेल्या चुका मला पाटीवर लिहायला सांगतो आणि ते लिखाण बघून तो सारणी लिहितो. यातून ‘त्याला सारणी लिहायची पुष्कळ ओढ लागली आहे’, हे माझ्या लक्षात आले.

३ आ. झालेल्या चुकांचे चिंतन करून चुकीसाठी क्षमा मागणे : आता तो चुकीवर चिंतन करून ‘चूक काय झाली ? ती कोणत्या स्वभावदोषामुळे झाली ? आणि योग्य कृती कोणती ?’, हे मला सांगतो. यावरून त्याची आकलनक्षमता पुष्कळ चांगली असून ‘त्याला एकदा सांगितले की, परत सांगावे लागत नाही’, असे माझ्या लक्षात आले. त्याच्याकडून काही चूक झाल्यास तो निर्मळपणे आमची क्षमा मागतो.

३ इ. अवधूत प्रतिदिन त्याला लक्षात आलेल्या माझ्या चुका सांगून मला सारणी लिखाणासाठी साहाय्य करतो.

४. कलाकुसरीच्या वस्तू बनवणे

‘घरातील टाकाऊ वस्तूंतील कुठल्या गोष्टीपासून काय बनवता येईल ?’, हे त्याच्या लक्षात येते आणि त्यापासून तो कलाकुसरीच्या वस्तू सिद्ध करतो.

५. उत्तम स्मरणशक्ती

अ. अवधूत त्याच्या लहानपणी घडलेले प्रसंग स्थळ आणि वेळ यांसह सांगतो.

आ. शाळेत बाईंनी अभ्यास आणि काही सूचना सांगितल्या असतील, तर तो घरी आल्यावर आम्हाला सर्व व्यवस्थित सांगतो.

६. प्रेमभाव

अवधूतमध्ये पुष्कळ प्रेमभाव आहे. त्याला काही खाऊ दिला, तर तो सर्वांना वाटून नंतर स्वतः खातो. आमच्या घराजवळ कुत्री आणि मांजरी येतात. काही वेळा मी त्यांना हाकलण्यासाठी मारते. त्या वेळी तो म्हणतो, ‘‘आई, त्यांना मारायचे नाही. आपल्याला पाप लागते आणि देवबाप्पा शिक्षा करतो.’’ यावरून त्याच्यातील प्रेमभाव आणि समज लक्षात येते.

७. असात्त्विक गोष्टी न आवडणे

अवधूतला सात्त्विक आणि असात्त्विक वस्तू किंवा कपडे ओळखता येतात. एखादी वस्तू किंवा कपडे असात्त्विक असतील, तर तो लगेच सांगतो. एकदा मी एक साडी नेसले होते. ती साडी पाहिल्यावर अवधूत मला म्हणाला, ‘‘आई, ही साडी तू नेसू नकोस. ती चांगली वाटत नाही.’’ त्याने मला दुसरी सात्त्विक साडी दाखवली आणि ‘ही साडी चांगली वाटते. ती नेस’, असे सांगितले. यावरून ‘त्याला सात्त्विक गोष्टी ओळखता येतात’, हे माझ्या लक्षात आले.

८. तो प्रतिदिन शाळेत जातांना अत्तर आणि कापूर यांचे उपाय करतो. नंतर परात्पर गुरु डॉक्टर आणि योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या छायाचित्रांना नमस्कार अन् प्रार्थना करतो आणि विभूती लावून शाळेत जातो.

९. दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि सनातनची उत्पादने यांप्रती भाव

अवधूत घरात पुष्कळ वस्तू इकडे तिकडे टाकतो; पण दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि सनातनची उत्पादने व्यवस्थित ठेवतो. दैनिक ‘सनातन प्रभात’ कुठे पडला असेल, तर तो उचलून लगेच व्यवस्थित ठेवतो.’ (३०.८.२०१९)

 

रामनाथी आश्रमातील चैतन्यामुळे अवधूतमध्ये झालेले पालट

सनातन आश्रम, रामनाथी

१. परात्पर गुरु डॉक्टर अन् आश्रमातील चैतन्य यांमुळे अवधूतमध्ये नामजपाची ओढ निर्माण झाल्याचे लक्षात येणे

१८.८.२०१९ या दिवशी आम्ही रामनाथी आश्रमात गेलो होतो. पहिल्या दिवशी सायंकाळी आम्ही आरतीसाठी ध्यानमंदिरात गेलो. आरती झाल्यानंतर मी आणि अवधूत नामजपासाठी तेथे बसलो. आम्ही बराच वेळ नामजप करत होतो. अवधूतला तेथे चांगले वाटत होते. दुसर्‍या दिवशी सकाळी अंघोळ झाल्यावर मी त्याला म्हणाले, ‘‘आता आपण अल्पाहार करूया.’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘नको. आधी आपण ध्यानमंदिरात जाऊन नामजप करूया आणि नंतर अल्पाहार करूया.’’ परात्पर गुरु डॉक्टर आणि आश्रमातील चैतन्य यांमुळे त्याच्या मनात आपोआप नामजपाची आवड निर्माण झाली.

२. रामनाथी आश्रमात जाऊन आल्यावर अवधूतचे दृष्टीकोन प्रगल्भ होऊन त्याच्या वाणीत चैतन्य जाणवू लागणे

आम्ही रामनाथी आश्रमात जाऊन आल्यापासून अवधूतमध्ये पुष्कळ पालट झाले आहेत. तो समजूतदारपणे वागतो. त्याच्या वाणीमध्ये कधी कधी वेगळ्या प्रकारचे चैतन्य जाणवते. तो एवढे चांगले आध्यात्मिक दृष्टीकोन देतो की, ‘एवढ्या लहान वयात त्याला हे दृष्टीकोन सुचतात कसे ?’, याचे आम्हाला आश्चर्य वाटते. तो बोलत असतांना आमची भावजागृती होते.

‘हे विष्णुस्वरूप गुरुमाऊली, तुम्हीच हे लिखाण माझ्याकडून लिहून घेतले. तुमच्याच कृपेमुळे अवधूतमध्ये वैशिष्ट्यपूर्ण पालट झाले आहेत. ‘तुमची कृपादृष्टी आमच्यावर सदोदित राहू दे’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’

– सौ. वेदिका संजय जगताप (कु. अवधूतची आई), मिरज, सांगली. (३०.८.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक