छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन आदर्शवत् काम करूया ! – धैर्यशील माने, खासदार, शिवसेना

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून सर्वांना समवेत घेऊन आदर्शवत् काम करूया, असे आवाहन शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी केले. इचलकरंजी नगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि परिसर यांचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. दसर्‍याच्या दिवशी याचे लोकार्पण करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी लेझीम, हलगी, ढोल-ताशा यांच्या निनादाने वातावरण शिवमय झाले होते. सायंकाळी शिवतीर्थावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. या वेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी ‘मध्यवर्ती बसस्थानकाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव द्यावे आणि नगरपालिकेने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचा ठराव करावा’, अशा मागण्या केल्या.

विशेष 

१. सकाळी छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला.

२. आमदार प्रकाश आवाडे, नगराध्यक्षा अलका स्वामी, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या उपस्थितीत शिवतीर्थावर भगवा ध्वज फडकवण्यात आला.

३. कार्यक्रमस्थळी भगवे फेटे परिधान केलेले शिवभक्त, मर्दानी खेळ यांमुळे हा लोकार्पण सोहळा अविस्मरणीय ठरला.