सहनशील, सेवेची तळमळ असणारे आणि सनातन संस्थेप्रती भाव असलेले ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे जोधपूर (राजस्थान) येथील कै. बंकटलाल मोदी (वय ७५ वर्षे) !

‘जोधपूर (राजस्थान) येथील सनातनचे साधक श्री. बंकटलाल मोदी (बाबूजी) (वय ७५ वर्षे) यांचे आषाढ शुद्ध पक्ष त्रयोदशी (२२.७.२०२१) या दिवशी अल्पशा आजाराने पहाटे ४.३० वाजता रहात्या घरी निधन झाले. त्यांचे तिसरे मासिक श्राद्ध (१८.१०.२०२१) या दिवशी आहे. त्या निमित्ताने त्यांच्याविषयी त्यांच्या पत्नी पू. (श्रीमती) सुशीला मोदी (सनातन संस्थेच्या ६३ व्या समष्टी संत) (वय ७१ वर्षे) यांना त्यांच्या यजमानांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

१. यजमानांवर आर्य समाजाचा प्रभाव असूनही त्यांनी सनातन संस्थेने सांगितल्याप्रमाणे स्वीकारून विविध नामजप करणे

‘आमच्या विवाहाच्या वेळी माझ्या सासरी आर्य समाजाचा प्रभाव होता. त्यामुळे घरात ‘देवपूजा करणे आणि मंदिरात जाणे’, असे होते नसे. एकदा आमच्या व्यवसायात मोठी हानी झाली. या घटनेच्या काही काळ आधीच आम्ही सनातन संस्थेच्या संपर्कात आलो होतो. संस्थेत सांगितल्यानुसार आम्ही ‘कुलदेवता’ आणि ‘दत्त’ यांचा नामजप करायला प्रारंभ केला. त्यानंतर काळानुसार विविध नामजप सांगण्यात आले; पण आर्य समाजाचा प्रभाव असूनही यजमानांनी नामजप करणे स्वीकारून विविध नामजप केले.

यज्ञामध्ये दिसत असलेले त्रिशूळ (त्रिशूळाचा आकार गोलात दाखवला आहे.)

२. सहनशीलता

त्यांना अनेक शारीरिक त्रास होते. एका रोगावर उपाय केला की, दुसर्‍या रोगावर त्याचा परिणाम होत असे; परंतु यजमानांचे कधीही त्याविषयी गार्‍हाणे नसायचे. ते म्हणायचे, ‘हे विष्णु, वाचव.’ तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘हे विष्णु शरण घे’, असे म्हणा.’’ त्यांच्या शेवटच्या आजारपणात ते असेच म्हणायचे. ‘शेवटच्या वेळी त्यांना काही यातना झाल्या नाहीत’, ही गुरुकृपाच होती.

३. सेवेची तळमळ

सोजत (राजस्थान) येथे साधनेविषयी शिबिर झाले. तेव्हा त्यांनी स्वतःच्या प्रकृतीचा विचार न करता ५ दिवस सतत सेवा केली.

४. सनातन संस्थेप्रती भाव

अ. सनातन संस्था आणि साधक यांच्यावर त्यांची नितांत श्रद्धा होती. कधीही कोणत्याही साधकाला कशाचीही आवश्यकता असल्यास, उदा. ‘प्रसारासाठी चारचाकी वाहनाची आवश्यकता असल्यास त्यांनी कधी ‘नाही’, म्हटले नाही.

आ. कधी ‘सनातन प्रभात’ अथवा ग्रंथ यांसाठी विज्ञापनाची आवश्यकता असेल, तर ते लगेच म्हणायचे, ‘‘माझ्याकडून घे.’’ मग त्याचे विज्ञापनाचे मूल्य कितीही असू दे.

इ. एकदा ते मला म्हणाले होते, ‘‘माझी एक भूमी आहे. ती विकल्यावर त्याचे पैसे मी संस्थेला अर्पण करीन.’’

५. निधनापूर्वी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा सत्संग मिळणे आणि त्यांच्या सांगण्यानुसार प्रतिदिन ‘इंद्राक्षी स्तोत्र’ म्हणणे

१२.७.२०२१ या दिवशी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे अकस्मात् जोधपूरला येण्याचे नियोजन झाले. त्या वेळी यजमानांना चालल्यावर दम लागत होता; पण तरीही ते श्रीचित्शक्ति (सौ.) अंजलीताई यांच्या समवेत हवन आणि स्तोत्रपठण करतांना तिथे बसले अन् त्यांच्या सांगण्यानुसार प्रतिदिन ‘इंद्राक्षी स्तोत्र’ म्हणत होते.

‘यजमानांकडून नामजप आणि त्याग होणे, आजाररूपी प्रारब्ध सहन करण्याची शक्ती मिळणे आणि अखेर सहजतेने प्राण सोडणे’, हे सर्वकाही गुरुकृपेनेच शक्य झाले. त्याबद्दल परात्पर गुरुदेवांच्या प्रती कृतज्ञता !

६. यजमानांच्या निधनानंतर आलेल्या अनुभूती

अ. यजमानांच्या निधनानंतर आर्य समाजाच्या पद्धतीप्रमाणे घरात यज्ञ करण्यात आला. त्या यज्ञात पुष्कळ वेळ मोरपंखी ज्वाळा दिसत होत्या. (त्यांना मोरपंख विशेष आवडायचे आणि ते आश्रमातील साधकांना वाटण्यासाठी मोरपंख आणून त्याला खालच्या बाजूने कापड लावून ते भेट देण्यासाठी सिद्ध करायचे.)

आ. निधनानंतरच्या १२ व्या दिवशी झालेल्या यज्ञात त्रिशूळाचे दर्शन झाले, तसेच श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे दर्शन यज्ञात झाले.

इ. निधनानंतर यजमानांचे घरात ठेवलेले छायाचित्र १२ व्या दिवसानंतर जिवंत झाल्याचे सर्वांना जाणवले.

ई. एक दिवस श्राद्धविधी झाल्यानंतर कावळ्यांसाठी ठेवायचे अन्न बाहेर ठेवतांना पाऊस येत होता. तेव्हा माझ्या मनात ‘पान बाहेर कसे ठेवू ?’, असा विचार आला. प्रार्थना केल्यावर पाऊस थांबला आणि सर्व कावळे एकत्र आले. प्रतिदिन कावळ्यांनी त्यांच्यासाठी ठेवलेले अन्न ग्रहण केले.

या दुःखद घटनेनंतर संपूर्ण कुटुंब शांत आणि स्थिर आहे. त्यामुळे साधनेचे महत्त्व लक्षात आले. गुरुदेवांनी साधना करवून घेतली आणि साधनेचा संस्कार सर्वांच्या मनात केला. अशा श्रीविष्णुस्वरूप गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– पू. (श्रीमती) सुशीला मोदी (वय ७१ वर्षे), जोधपूर, राजस्थान. (२०.९.२०२१)

यजमानांच्या मृत्यूसारख्या कठीण प्रसंगीही अत्यंत स्थिर राहून अध्यात्मप्रसार करणार्‍या सनातनच्या संत पू. (श्रीमती) सुशीला मोदीभाभी !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

‘श्री. बंकटलाल मोदी यांच्या निधनानंतर मी त्यांची पत्नी पू. मोदीभाभी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याशी भ्रमणभाषद्वारे संवाद साधला. त्या वेळी लक्षात आले की, यजमानांच्या निधनासारख्या कठीण प्रसंगीही पू. भाभी अत्यंत स्थिर होत्या. त्या वेळी त्यांच्यात थोडीही भावनिकता नव्हती. पू. भाभींनी ‘त्या प्रसंगात क्षणोक्षणी परात्पर गुरुदेवांची कृपा कशी अनुभवली’, हेच सांगितले. त्यातून त्यांचा कृतज्ञताभाव जाणवत होता. अशा प्रसंगात इतके स्थिर आणि आध्यात्मिक स्तरावर रहाणे कौतुकास्पद आहे. एवढ्या वर्षांत असे उदाहरण मी प्रथमच अनुभवले !

पू. भाभी केवळ स्वतः स्थिर राहिल्या, असे नाही, तर त्यांनी सर्व कुटुंबियांनाही आध्यात्मिक स्तरावर ठेवले. यजमानांच्या निधनानंतर भेटायला येणार्‍या नातेवाइकांना पू. भाभींनी नामजप आणि साधना यांचे महत्त्व सांगितले. ११ व्या आणि १२ व्या दिवशी आलेल्या नातेवाईकांचा सत्संग घेतला, तसेच त्यांना सनातनचा ग्रंथ भेट देऊन अध्यात्मप्रसारही केला. यातून अध्यात्मप्रसाराची तीव्र तळमळ असलेल्या पू. भाभींचे संतत्व लक्षात येते !

कठीण प्रसंगालाही संपूर्णपणे आध्यात्मिक स्तरावर सामोरे जाणार्‍या पू. मोदीभाभी अन् सर्वांसमोर आदर्श निर्माण करणारे असे संत घडवणारे मोक्षगुरु परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता !’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (१६.१०.२०२१)