शिक्षण संस्थेचे अध्यक्षच लाच घेत असतील, तर विद्यार्थ्यांवर नैतिकतेचे संस्कार कसे होणार ?
पुणे, १७ ऑक्टोबर – शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालयाच्या अध्यक्षा मंगल भुजबळ यांच्यासह तिघांना अडीच लाख रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक िवभागाने अटक केली. अध्यक्षांच्या निवासस्थानी १३ ऑक्टोबर या दिवशी पैसे घेतांना त्यांना सापळा रचून पकडण्यात आले. त्यांना विशेष न्यायालयाने १६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी संमत केली आहे.
या प्रकरणी एका शिपायाच्या मुलाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्रविष्ट केली होती. तक्रारदार तरुणाचे वडील भुजबळ विद्यालयात शिपाई म्हणून नोकरी करतात. त्यांची प्रकृती ठीक नसल्याच्या कारणावरून त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. प्रत्यक्षात त्यांच्या सेवानिवृत्तीला केवळ ३ वर्षे उरली होती, तसेच त्यांनी ससून रुग्णालयातून शारीरिक स्वास्थ्याचे प्रमाणपत्रही दिले होते. नोकरीवरून काढून न टाकण्यासाठी आणि भविष्यात सेवानिवृत्तीचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडे साडेतीन लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती.