संभाजीनगर येथे ‘ओबीसी जागर मेळावा’
संभाजीनगर – ‘भविष्यात ओबीसी समाजाला सर्व लाभांपासून वंचित ठेवण्यासाठी आरक्षणाच्या आडून षड्यंत्र रचण्याचे काम केले जात आहे; मात्र असा प्रयत्न करून ओबीसींना हक्कांपासून वंचित ठेवण्याचा जे प्रयत्न करतील, त्यांना आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही’, अशी चेतावणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव सौ. पंकजा मुंडे-पालवे यांनी १२ ऑक्टोबर या दिवशी येथे आयोजित केलेल्या ‘ओबीसी जागर मेळाव्या’त दिली. ओबीसी आरक्षणाचा निर्णय घेतल्याविषयी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचे स्वागतही केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे रहित झालेले आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी भाजपच्या वतीने राज्यभर ‘ओबीसी जागर मेळाव्या’चे आयोजन करण्यात येत आहे. पंढरपूर येथून या मेळाव्याला प्रारंभ झाला. या वेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी मंत्री संजय कुटे, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, आमदार अतुल सावे आदींची उपस्थिती होती.
सौ. पंकजा मुंडे पालवे पुढे म्हणाल्या की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना अनेकांनी त्यांची जात काढली; परंतु त्यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिले आणि उच्च न्यायालयात ते टिकवलेही; मात्र आता ओबीसींच्या डोक्यावर आरक्षणाची टांगती तलवार आहे. मराठा समाजाची शिक्षण आणि नोकरीत आरक्षणाची, तर ओबीसींची राजकीय आरक्षणाची मागणी आहे. सरकारने याविषयी आश्वासन दिले आहे; मात्र आरक्षणाचा अध्यादेश टिकवून दाखवला, तर त्यांचे आम्ही स्वागत करू.