१. ‘मनापासून केलेली प्रत्येक कृती परात्पर गुरुदेवांच्या चरणी पोचते’, याची आलेली प्रचीती !
१ अ. दसर्याच्या दिवशी सकाळी उठल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सूक्ष्मातून आपट्याचे पान देण्याचा विचार येणे आणि तसे केल्यावर मनाला वेगळाच उत्साह अन् आनंद जाणवणे : ‘२५.१०.२०२०, म्हणजे दसर्याच्या दिवशी सकाळी उठल्यावर माझ्या मनात पहिला विचार आला, ‘आज परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आपट्याचे पान देऊन त्यांचा कृपाप्रसाद ग्रहण करूया.’ त्याप्रमाणे मी लगेचच परात्पर गुरुदेवांना सूक्ष्मातून आपट्याचे पान अर्पण केले आणि सेवेला आरंभ केला. परात्पर गुरु डॉक्टरांना सूक्ष्मातून आपट्याचे पान दिल्यानंतर मनाला वेगळाच उत्साह आणि आनंद वाटत होता.
१ आ. परात्पर गुरुदेवांनी प्रथमच वेदपाठशाळेतील विद्यार्थ्यांना आपट्याचे पान देणे, त्या वेळी पुष्कळ कृतज्ञता वाटणे आणि ‘मनापासून केलेली प्रत्येक कृती गुरुचरणी पोचतेच’, याची जाणीव होणे : त्या दिवशी संध्याकाळी परात्पर गुरुदेवांनी वेदपाठशाळेतील विद्यार्थ्यांना आपट्याचे पान दिले. ‘परात्पर गुरुदेवांनी वेदपाठशाळेतील विद्यार्थ्यांना आपट्याचे पान पाठवून दिले’, असा हा पहिलाच दसरा होता. त्या वेळी मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. मी सकाळी परात्पर गुरुदेवांना सूक्ष्मातून आपट्याचे पान दिले आणि त्यांनी लगेचच संध्याकाळी आम्हाला प्रसाद अन् आपट्याचे पान दिले. ‘परात्पर गुरुदेव आपले मन जाणतात. आपण मनापासून केलेली प्रत्येक कृती त्यांच्या चरणी पोचतेच’, याची मला या प्रसंगातून जाणीव झाली.
२. सप्तशती शिकत असतांना जाणवलेले सूत्र
२ अ. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने भक्तांना दिलेल्या वचनाप्रमाणे सप्तशतीमध्ये देवीने भक्तांना वचन देणे : श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने भक्तांना वचन दिले आहे, ‘यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ४, श्लोक ७) म्हणजे ‘जेव्हा जेव्हा धर्माचा र्हास आणि अधर्माची वाढ होत असते, तेव्हा तेव्हा मी साकाररूपाने लोकांसमोर प्रगट होतो.’ त्याचप्रमाणे सप्तशतीमध्ये देवीनेही भक्तांना पुढील वचन दिले आहे,
इत्थं यदा यदा बाधा दानवोत्था भविष्यति ।
तदा तदाऽवतीर्याहं करिष्याम्यरिसंक्षयम् ।। – श्रीदुर्गासप्तशति, अध्याय ११, श्लोक ५५
अर्थ : जेव्हा जेव्हा दानव बाधा (भक्तांच्या साधनेत) निर्माण करतील, तेव्हा तेव्हा मी अवतार घेऊन शत्रूंचा नाश करीन.
२ आ. श्रीकृष्णाचे धर्माच्या पुनःर्स्थापनेचे अवतारी कार्य परात्पर गुरुदेवांच्या रूपातून चालू असणे, त्याचप्रमाणे देवीचे भक्तरक्षणाचे कार्य श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या माध्यमातून चालू असणे, आता साधकांनी केवळ त्यांचे भक्त बनणे आवश्यक असणे : भगवंत आणि देवी यांच्या या वचनांचा विचार करतांना ‘श्रीकृष्णाने दिलेल्या वचनानुसार त्याने परात्पर गुरुदेवांच्या रूपात अवतार घेतला असून धर्माची पुनःर्स्थापना करण्यासाठी त्याचे अवतारी कार्य चालू केले आहे. त्याचप्रमाणे साधकांच्या रक्षणासाठी देवीने श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या रूपात अवतार घेतला असून त्या यज्ञयाग करून साधकांचे रक्षण करत आहेत. यज्ञाच्या माध्यमातून सूक्ष्म स्तरावरील वाईट शक्ती नष्ट होत आहेत. धर्मसंस्थापना आणि आपत्काळात भक्तांचे रक्षण यांसाठी श्रीकृष्ण अन् देवी यांनी भक्तांना दिलेल्या वचनाप्रमाणे त्यांचे अवतारी कार्य चालू झाले आहे. केवळ आपणच देवाचे भक्त होणे आवश्यक आहे’, असे देवाने माझ्या लक्षात आणून दिले.
३. देवाचे भक्त होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या मार्गावर चालता येण्यासाठी केलेली कळकळीची प्रार्थना !
आपण सगळ्यांनी भगवती आणि भगवंत यांचे भक्त होण्यासाठी त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून चालण्याची आवश्यकता आहे. त्यासाठीही आपण त्यांनाच शरण जाऊन प्रार्थना करूया.
‘हे सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप गुरुदेव, हे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि हे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, तुम्हीच तुम्हाला अपेक्षित अशी साधना आमच्याकडून करवून घ्या अन् तुमची कृपा संपादन करण्याची पात्रता आमच्यात निर्माण करून आम्हा क्षुद्र जिवांचा उद्धार करा. आम्हाला याच जन्मात आपल्या चरणांशी एकरूप करवून घ्या’, अशी आमची आपल्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे.’
४. अन्य अनुभूती
४ अ. भगवंताने आध्यात्मिक त्रास न्यून होण्यासाठी स्थुलातील भगवंतस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले आणि देवीस्वरूप श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनाच प्रार्थना करण्यास सांगणे : काही दिवसांपूर्वी मला आध्यात्मिक त्रास होत असतांना मी परात्पर गुरु डॉ. आठवले पूर्वी निवासाला असलेल्या खोलीत बसून नामजपादी उपाय करत होतो. त्या वेळी मला पुष्कळ दाब जाणवत होता. त्यामुळे मला पुष्कळ त्रासही होत होता. पुष्कळ प्रयत्न करूनही मला बरे वाटत नव्हते; म्हणून मी भगवंताला सांगितले, ‘हे देवा, कृपा करून माझा त्रास दूर कर.’ तेव्हा भगवंत मला म्हणाला, ‘मला प्रार्थना करण्यापेक्षा स्थुलातील साक्षात् भगवंतस्वरूप तुमचे गुरु आणि देवीस्वरूप श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना प्रार्थना कर, म्हणजे तुझा त्रास लगेच न्यून होईल.’
४ आ. तीन गुरूंना प्रार्थना केल्यावर सूक्ष्मातून श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे दर्शन होऊन त्यांनी ‘भगवंतस्वरूप परात्पर गुरुदेवांच्या दैवी अस्तित्वाचा लाभ करून घेऊया’, असे सांगणे : भगवंताच्या सांगण्यावरून मी तिन्ही गुरूंना, म्हणजे परात्पर गुरुदेव आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना प्रार्थना केली. तेव्हा क्षणार्धात माझा त्रास न्यून झाला. त्या वेळी मला सूक्ष्मातून श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे दर्शन झाले आणि त्या मला म्हणाल्या, ‘श्रीकृष्ण प्रत्यक्ष स्थुलातून होता, त्या वेळी त्याची प्रचीती अर्जुनासारख्या काही भक्तांनीच घेतली. श्रीरामाचे देवत्व केवळ हनुमानासारख्यांनीच जाणले. त्याचप्रमाणे आता त्याच राम आणि कृष्ण यांनी परात्पर गुरुदेवांच्या रूपात अवतार घेतला आहे. त्यांची महती आपल्याला कळली आहे. मग त्यांचा लाभ करून घेण्यासाठी आपण मागे कशाला रहायचे ? ज्या वेळी आध्यात्मिक त्रास होईल, त्या वेळी या स्थुलातील भगवंताचे स्मरण करून आपल्या त्रासाचे क्षणार्धात निवारण करूया.’ ते ऐकून माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि मला पुष्कळ आनंद मिळाला.
(‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचे अंशावतार आहेत आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या दोघी महालक्ष्मीस्वरूप आहेत’, असे महर्षींनी सप्तर्षी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सांगितले आहे. त्यांनी कधीही ‘मी अवतार आहे’, असे म्हटलेले नाही.’ – संकलक)
– श्री. ईशान जोशी, सनातन पुरोहित वेदपाठशाळा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.११.२०२०)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |