शिवसेनेचा दसरा मेळावा
मुंबई – हिंदुत्वाला धोका आहे. जे इंग्रजांचे शिक्षण घेऊन आणि हिंदुत्वाची शिडी घेऊन वर चढले आहेत, ते मराठा, अमराठी, जाती-पाती यांचा भेदाभेद निर्माण करून हिंदुत्वाला धोका निर्माण करत आहेत. ‘मराठा तितुका मेळवावा, मराठी धर्म वाढवावा’, या प्रमाणे मराठा-मराठी हा भेद गाडून हिंदुतेज आणि हिंदु धर्म वाढवावा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केले. १५ ऑक्टोबर या दिवशी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते.
सायंकाळी ६.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण मेळाव्याला प्रारंभ झाला. या वेळी प्रबोधनकार ठाकरे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, माँसाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शस्त्रपूजन करून एकमेकांना आपट्याची पाने देण्यात आली. ‘हर हर महादेव’ अशी घोषणा देत मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला प्रारंभ झाला.
धर्माचा कडवटपणा घेऊन वाटेत आलात, तर ‘हिंदु’ म्हणून उभे रहाणे, हेच आमचे हिंदुत्व ! – उद्धव ठाकरेमी मुख्यमंत्री आहे आणि ‘हिंदु’ आहे. याविषयी मला लाज वाटत नाही. हिंदुत्व हेच आमचे राष्ट्रीयत्व आहे. प्रथम आपण माणूस म्हणून जन्माला येतो, त्यानंतर जात, पात-धर्म चिकटतो. त्यामुळे घराबाहेर पडतांना प्रत्येकाने स्वत:चा धर्म घरात ठेवावा. घराबाहेर पडतो, तेव्हा ‘देश’ हाच आमचा धर्म आहे; पण आमच्या वाटेत कुणी स्वत:च्या धर्माचा कडवटपणा आणत असेल, तर त्यांच्यापुढे ‘हिंदु’ म्हणून उभे रहाणे, हेच आमचे हिंदुत्व आहे. |