अमेरिकेत मोठ्या प्रमाणात पुरुष विवाहच करू इच्छित नाहीत ! – सर्वेक्षणाचा निष्कर्ष

भारतात ही संख्या ४२ टक्के असल्याचे आले समोर

नवी देहली – ‘प्यू रिसर्च सेंटर’ने वर्ष २०१९ च्या ‘अमेरिकन कम्युनिटी सर्वे’च्या आधारे दावा केला आहे की, अमेरिकेत मोठ्या प्रमाणात पुरुष विवाहच करू इच्छित नाहीत. अमेरिकेत सद्य:स्थितीत २५ ते ५४ वयोगटातील ३८ टक्के पुरुष असे आहेत की, ज्यांनी विवाहच केलेला नाही आणि विवाह करण्याची त्यांची इच्छाही नाही. वर्ष २००० मध्ये याच वयोगटातील अविवाहित तरुणांची संख्या २९ टक्के होती. ३८ टक्के पुरुषांच्या ४० ते ५४ वयोगटातील २० टक्के पुरुष असे आहेत की, जे अविवाहित आहेत आणि त्यांच्या आई-वडिलांसमवेत रहात आहेत. गेल्या ३० वर्षांत अविवाहित असलेल्या पुरुषांची संख्या अविवाहित महिलांच्या संख्येपेक्षा अधिक असल्याचेही समोर आले आहे.

विवाह न करण्यामागे आर्थिक परिस्थिती हे कारण

विवाह न करण्यामागे सर्वाधिक मोठे कारण हे आर्थिक परिस्थिती आहे. अमेरिकेत अविवाहित रहाणार्‍यांमध्ये अल्प शिक्षण झालेले आणि अल्प उत्पन्न असणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. चांगली नोकरी आणि चांगले आर्थिक उत्पन्न असणारे तरुणच विवाह करण्याची मनीषा बाळगून आहेत. हीच स्थिती भारतातही आहे. प्रतिमास १० सहस्र रुपयांहून अल्प उत्पन्न असलेले ३९ टक्के तरुण विवाह करू इच्छित नाहीत, तर ज्यांचे मासिक उत्पन्न ६० सहस्रांहून अधिक आहे, त्यांतील २१ टक्के तरुण अविवाहितच राहू इच्छितात. अल्प आर्थिक उत्पन्न असल्याने विवाह नाकारणार्‍या पुरुषांची संख्या देशात महिलांपेक्षा अधिक आहे.

भारतात ४२ टक्के तरुण विवाह करू इच्छित नाहीत

वर्ष २०२० मध्ये असेच एक सर्वेक्षण भारतातही झाले होते. त्यात २६ ते ४० वयोगटातील ४२ टक्के तरुणांना विवाह करण्याची आणि मुले जन्माला घालण्याची इच्छा नाही, असे सांगितले आहे. भारतात असा विचार करणार्‍या महिला आणि पुरुषांची संख्या सारखीच आहे.