रस्त्याच्या कामात अपप्रकार झाल्याचे प्रकरण
वाशिम – यवतमाळ-वाशिम येथील शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांचे निकटवर्तीय सईद खान यांच्याशी संबंधित ठेकेदारी अंतर्गत कामाची चौकशी करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाचे (‘ईडी’)चे अधिकारी १२ ऑक्टोबर या दिवशी येथील सार्वजनिक बांधकाम विभागात आले. खासदार भावना गवळी यांच्या संस्थेमध्ये झालेल्या अपव्यवहार प्रकरणी ‘ईडी’कडून ही चौकशी चालू आहे.
‘वाशिम जिल्ह्यात चालू असलेल्या रस्त्याच्या कामात अपप्रकार झाला आहे’, अशी याचिका हरीश सारडा यांनी उच्च न्यायालयात प्रविष्ट केली आहे. शहरातील रस्त्याच्या कामासाठी दिलेल्या ५ पैकी २ निविदा अनधिकृतरीत्या अपात्र ठरवण्यात आल्या होत्या. उर्वरित ३ निविदा ‘अजयदीप इन्फ्राकॉन प्रा.लि. संभाजीनगर’ या आस्थापनाच्या होत्या. ‘या आस्थापनाने १३ टक्के अधिक दराने हे काम घेतले आहे’, असा आरोप हरीश सारडा यांनी याचिकेत केला आहे. या रस्त्याचे काम या आस्थापनाकडून नंतर सईद खान यांच्या ‘भूमी कन्स्ट्रक्शन आस्थापना’ला देण्यात आले आहे. यावरून वाशिम येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात ‘ईडी’च्या पथकाकडून चौकशी चालू आहे.