समाजाच्या प्रत्येक घटकासाठी आवश्यक अशा सनातनच्या सर्वांगस्पर्शी ग्रंथसंपदेचा लाभ घ्या ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

उत्तर भारतामध्ये सनातन संस्थेच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’चे उद्घाटन !

‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’चे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करतांना पू. नीलेश सिंगबाळ

वाराणसी (उत्तरप्रदेश) – सनातन संस्थेने अध्यात्मशास्त्र, धर्माचरण, दैनंदिन आचरणाशी संबंधित कृती, भारतीय संस्कृती आदी अनेक विषयांवर अनमोल आणि सर्वांगस्पर्शी ग्रंथ प्रकाशित केले आहेत. सनातनच्या ग्रंथांचे दिव्य ज्ञान समाजापर्यंत पोचवण्यासाठी संस्थेच्या वतीने संपूर्ण भारतात ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ चालवण्यात येत आहे. हे ग्रंथ समाजातील प्रत्येक जिज्ञासू, मुमुक्षू, साधक इत्यादींपर्यंत पोहोचून त्यांच्या जीवनाचे कल्याण व्हावे, यासाठी या अभियानास आरंभ करण्यात आले आहे. विद्यार्थी, शिक्षक, पालक, गृहिणी, अधिवक्ता, वैद्य, आधुनिक वैद्य, पत्रकार, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, उद्योगपती, राष्ट्रप्रेमी यांसह सर्वच क्षेत्रांतील अधिकाधिक जिज्ञासूंनी या ग्रंथांचा लाभ घ्यावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांनी केले.

१० ऑक्टोबरच्या सकाळी आयोजित केलेल्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या ऑनलाईन उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. ‘सनातन संस्थे’च्या यू ट्यूब चॅनेलद्वारे या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. पू. सिंगबाळ यांच्या मंगलहस्ते दीपप्रज्वलन करून ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’चे उद्घाटन करण्यात आले.

या वेळी पू. सिंगबाळ यांनी सांगितले की, सनातनने ‘बालसंस्कार’, ‘धर्मशास्त्र असे का सांगते ?’, ‘आचारधर्म’, ‘देवतांची उपासना’, ‘आयुर्वेद’, ‘धार्मिक आणि सामाजिक कृती यांच्याशी संबंधित ग्रंथ’, याखेरीज ‘नैसर्गिक आपत्तीच्या वेळी स्वत:चे रक्षण कसे करावे ?’ इत्यादी अनेक विषयांवरील ३४७ ग्रंथ प्रकाशित केले आहेत. हे ग्रंथ मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड, तमिळ, मल्ल्याळम्, इंग्रजी इत्यादी १७ भाषांमध्ये उपलब्ध आहेत. आतापर्यंत या ग्रंथांच्या ८२ लाख ४८ सहस्र प्रती प्रकाशित झाल्या आहेत.

या अभियानाच्या निमित्ताने संपूर्ण देशात ग्रंथप्रदर्शन, संपर्क अभियान, ग्रंथांचे महत्त्व सांगणारी हस्तपत्रके, डिजिटल पुस्तिका, वृत्तवाहिन्यांवर विशेष कार्यक्रम, ‘सोशल मीडिया’ इत्यादींच्या माध्यमांतून सनातनच्या ग्रंथांचा व्यापक प्रसार करण्यात येत आहे. यासंदर्भात संतांचे आशीर्वाद आणि मान्यवरांच्या शुभेच्छा भेटी घेण्यात येत आहेत. ‘सनातनचे ग्रंथ स्वत: खरेदी करा’, ‘विविध मंगलप्रसंगी भेट द्या’, ‘मित्र परिवार, नातेवाईक यांना या ग्रंथांची माहिती द्या’, ‘विद्यालये, महाविद्यालये, ग्रंथालय इत्यादी ठिकाणी हे ग्रंथ प्रायोजित करा’, असे सनातन संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.